You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिंजो आबे हत्या : इंदिरा गांधींच्या हत्येमुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेत बदल कसा झाला?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
1967 साली काँग्रेसची प्रचारसभा ओडिशामध्ये सुरू होती. गर्दीतून अचानक मंचाच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. भाषण करणाऱ्या महिलेला एक दगड लागला. नाकातून भळाभळा रक्त वाहायला लागलं. त्यांनी ते रक्त टिपलं आणि भाषण सुरूच ठेवलं.
ती महिला होती तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी. पण त्याच इंदिरा गांधींची पुढे त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली.
पंतप्रधानांची सुरक्षा हा एक गंभीर मुद्दा आहे. काळानुसार ती सुरक्षा वाढत गेलीय. पंतप्रधान मोदींची गाडी पंजाबमध्ये पुलावर अडकून पडल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. त्यामुळेच आपण पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असते आणि त्यासाठी काय काय तयारी केली जाते, हे जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात सारखे सारखे जाताहेत, पण निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या दुसऱ्या राज्यात, पंजाबमध्ये ते पहिल्यांदाच चालले होते. फिरोझपूरमध्ये त्यांनी भली मोठी सभा ठरली होती.
खरं तर पंतप्रधान हेलिकॉप्टरने जाणार होते, पण हवामान खराब असल्यामुळे त्यांनी अखेर रस्त्याने जायचं ठरवलं. पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी सुरक्षेची सगळी पूर्तता झाली असल्याची हमी दिल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा निघाला असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं.
पण वाटेत एके ठिकाणी काही निदर्शकांनी रस्ता अडवून धरला असल्याचं कळलं आणि पंतप्रधानांचा ताफा पुलावरच थांबला. स्थानिक पोलिसांनी त्या निदर्शकांशी चर्चा करून त्यांना तिथून बाजूला केलं.
पाकिस्तानच्या सीमेपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर पंतप्रधानांचा खोळंबा झाला. जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांची गाडी तिथेच अडकून पडली होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेत इतकी मोठी चूक झालीच कशी यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत.
भाजपच्या स्मृती इराणी यांना आरोप केला की काँग्रेसचा 'हत्येचा उद्देश' अयशस्वी ठरला. त्या पुढे जाऊन असंही म्हणाल्या की मोदींचा तिरस्कार करणाऱ्या काँग्रेसमधील लोकांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावताना म्हटलं की, मोदींच्या सभेला गर्दी जमली नव्हती. ती नामुष्की टाळण्यासाठी भाजप काँग्रेस सरकारवर खोटे आरोप करतो आहे.
हा राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा उरतोच. ती कोण पुरवतं? ती जबाबदारी कुणाची? हे समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहावं लागेल.
पंतप्रधान आणि सुरक्षा
1947 मध्ये पंडित नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हा ते उघड्या गाडीतून फिरण्याचे. अर्थात तो काळही वेगळा होता. नेहरू लोकप्रिय नेते असले तरी त्यांनाही निदर्शनं, विरोध या सगळ्याचा सामना करावा लागलाच होता. पुढे 1967 सालच्या दगडफेकीनंतर इंदिरांची सुरक्षा वाढली. पण यात निर्णायक वर्ष ठरलं 1984.
इंदिरा सरकारने पंजाबमध्ये शिखांच्या पवित्र सुवर्णमंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं होतं. 30 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधींनी आपल्या एका भाषणात म्हटलं होतं, "मी आज आहे, उद्या नसेन. पण मी जिवंत असेपर्यंत माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब या देशाला शक्तीशाली बनवण्यासाठी खर्च करेन."
कधीकधी नियती तुमचे शब्द प्रत्यक्षात उतरवत असते. पुढच्याच दिवशी, 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधींच्या संतापलेल्या शीख अंगरक्षकाने इंदिरा गांधींना गोळ्या घातल्या. भारताच्या पंतप्रधानाची राहत्या घरात - सुरक्षित घरात हत्या झाली.
या घटनेनंत राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. दंगली भडकल्या. देशभरात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पुढच्याच वर्षी, म्हणजे 1985 मध्ये Special Protection Group ची स्थापना झाली. 1988 साली संसदेने SPG कायदा संमत केला.
पंतप्रधानांच्या बाजूने तुम्हाला कायम काळे सूट घातलेले, काळे गॉगल्स लावलेले आणि हातात बंदुका, वॉकी टॉकी, इअरपीस घातलेले लोक पाहिले असतील. हे त्यांचे बॉडीगार्ड असतात. हे SPG अधिकारी असतात. त्यांना अनेक प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं असतं.
SPG कडे देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या संरक्षणाची जबाबदारी असते. SPG अधिकारी सतत पंतप्रधानांबरोबर असतात. ते जिथे जातील तिथल्या यंत्रणेबरोबर समन्वय साधून SPG सुरक्षा आखणी करत असतं.
काही काळापूर्वीपर्यंत प्रियांका आणि राहुल गांधींना ही सुरक्षा मिळायची, मोदी सरकारने ती काढून घेतली गेली. भाजप सरकार हे सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. गांधी परिवाराची SPG सुरक्षा काढून घेतल्यानंतर त्यांना सरकारने Z+ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली होती.
राज्य सरकारची भूमिका काय?
अलिकडेच पंतप्रधानांनी 12 कोटींची नवी गाडी घेतल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. सुरक्षेच्या कारणांनी नवीन गाडी घेतल्याचं सरकारकडून सांगितलं गेलं.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा बंदोबस्ताची आखणी कशी होते हे एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
पंतप्रधानांच्या बाजूचं सुरक्षेचं कडं SPG चं असतं. पण बाकीच्या सुरक्षा बंदोबस्ताची जबाबदारी पंतप्रधान ज्या राज्यात असतील त्या राज्याच्या पोलिसांची असते.
दौऱ्यापूर्वीच SPG चं पथक राज्यात दाखल होतं आणि इंटेलिजन्स ब्युरो, पोलीस तसंच स्थानिक प्रशासनाबरोबर मिळून सगळी सुरक्षा व्यवस्था करून ठेवतं.
पोलिसांकडे काय जबाबदारी असते?
1. पंतप्रधान ज्या मार्गाने प्रवास करणार असतील तो मार्ग मोकळा करणे
2. कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त पुरवणे
3. प्रवासाच्या मार्गावर जागोजाग पोलीस पहारा ठेवणे, काही अडथळे आल्यास ते तात्काळ दूर करणे
हा सगळा आराखडा फक्त कागदावर नसतो. त्याची 'मॉक ड्रील' देखील केली जाते. तसंच प्रवासाचा मार्ग, राहण्याचं ठिकाण या सगळ्याची पर्यायी व्यवस्था सुद्धा ठेवली जाते. पंतप्रधान जर हेलिकॉप्टरने प्रवास करणार असतील तर वेळोवेळी हवामानाचे अंदाज घेतले जातात. हे सगळे नियम SPG च्या 'ब्लू बुक'मध्ये घालून दिलेले आहेत. SPG ला वार्षिक 375 कोटींचं बजेट आहे आणि त्यांच्याकडे देशातली अग्रगण्य सुरक्षा यंत्रणा म्हणून पाहिलं जातं.
मोदींच्या सुरक्षेवरून वाद
निदर्शकांनी रस्ता अडवून धरल्यामुळे मोदींच्या गाड्यांचा ताफा हुसैनीवालाला न जाताच परतला. भटिंडा एअरपोर्टवर पोहोचोल्यानंतर मोदींनी तिथल्या पोलिसांना, "तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंत परत पोहोचलो" असं सांगितल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या सगळ्या प्रकारणाबद्दल पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. पंजाब सरकारने आपल्या यंत्रणेने काहीही चूक केली नसल्याचं सांगत चौकशी करण्याचीही घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांना वाटतं की पंजाब पोलिसांनी या सगळ्या प्रकारात गंभीर बेपर्वाई दाखवली.
ते म्हणतात, ''लोक म्हणतायत की पंतप्रधानांनी अचानक मार्ग बदलला. मार्ग अचानकच बदलतो, त्याचीच पूर्वतयारी केलेली असते. निदर्शकही अचानक जमा होत नाहीत, त्यांनीही काहीतरी तयारी केलीच असेल. त्यांना थांबवता आलं असतं पण थांबवलं गेलं नाही.''
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)