You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गांधी कुटुंबाची SPG सुरक्षा काढण्याचा केंद्र सरकारचा निर्णय #5मोठ्याबातम्या
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) गांधी कुटुंबाची SPG सुरक्षा काढण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढण्यात आलीय. आता देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच एसपीजी सुरक्षा असेल. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
गांधी कुटुंबीतील या तिघांनाही आता केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलीय. आयबी आणि रॉ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतर सुरक्षेत कपात करण्चा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला.
याचवर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा काढण्यात आली होती.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जिवाशी मोदी सरकार खेळत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी केला.
2) भारताच्या अर्थव्यवस्थेविषयक मूडीजचा दृष्टिकोन नकारात्मक
भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी 'मूडीज' संस्थेनं 'नकारात्मक' मत नोंदवलंय. मूडीजनं भारताचा गुंतवणूकविषयक दृष्टिकोन खाली खेचत 'स्थिर'वरून 'नकारात्मक' केला आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिलीय.
भारताचा गुंतवणूकविषयक दर्जा कमी केल्यानं आधीच संकटात असलेली देशाची अर्थव्यवस्था आणखी मंदावण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र, फिच आणि एस अँड पी या संस्थांनी भारताचा गुंतवणूकविषयक दर्जा 'स्थिर'च ठेवलाय.
मूडीजनं भारताचा दर्जा 'नकारात्मक' केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, असा दावा भारत सरकारनं केलाय.
भारताची आर्थिक विकासाबाबतची जोखीम वाढली असून, येत्या कालावधीत विकास दर आणखी कमी होण्याची शक्यताही मूडीजनं वर्तवलीय. मात्र, सरकारच्या ठोस उपाययोजनांमधून भारताला संथ अर्थव्यवस्थेतून बाहेर काढता येईल, असंही मूडीजनं म्हटलंय.
3) दुबई, इजिप्तहून कांदा आयात करणार, दर नियंत्रणासाठी प्रयत्न
भारतातील कांद्याचे वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. दुबई, इजिप्त, तुर्कस्थान, इराण आणि अफगाणिस्तानहून कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. या देशांमधून आयात होणारा कांदा 15 नोव्हेंबरपर्यंत भारतात दाखल होईल. 'द हिंदू'नं ही बातमी दिलीय.
दिल्लीत कांद्याची सध्याची किंमत किलोमागे 80 ते 100 रूपये आहे. देशातील इतर भागांमध्येही असेच दर आहेत. भारतात यंदा कांद्याचं उत्पादन 30 ते 40 टक्के घटल्यानं या देशांमधून आयातीचा निर्णय घेतलाय.
वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एमएमटीसी या व्यापारी यंत्रणेनं दुबईतून दोन हजार टन कांदा आयातीची निविदा काढली. दुबईत मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध आहे.
4) 'महा'चक्रीवादळ वादळ निवळलं, आता 'बुलबुल'ची भीती
'महा'चक्रीवादळ गुजरात राज्याच्या दिशेनं येताना निवळलं आहे. मात्र, आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'बुलबुल' चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. 'अॅग्रोवन'नं ही बातमी दिलीय.
ओडिशाच्या परादीपपासून 680 किमी अग्नेय दिशेकडे आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटापासून 780 किमी दक्षिणेकडे हे बुलबुल वादळ घोगावत होतं. हे वादळ अतितीव्र होणार असून, ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागानं स्पष्ट केलंय.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, उर्वरित महाराष्ट्रात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
5) खुल्या प्रवर्गातील जुन्या नियुक्त्य रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती
मराठा आरक्षण लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील जुन्या नियुक्त्या रद्द करण्याच्या अध्यादेशाला बॉम्बे हायकोर्टानं स्थगिती दिलीय. 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कुणालाही कामावरून कमी न करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. 'एबीपी माझा'नं ही बातमी दिलीय.
राज्यातील सध्याची स्थिती अस्थिर आहे. निर्णय घेण्यासाठी सध्या कुणीच उपलब्ध नाहीय. त्यामुळं सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. ही मागणी नाकारत हायकोर्टानं अध्यादेशालाच स्थगिती दिली.
पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोट्यातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुत्या रद्द केल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यानी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)