सँडविच चोरल्यामुळे स्लोवेनियाच्या खासदारांना राजीनामा द्यावा लागला

जगभरामधील अनेक देशांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती जाहीर होत असते. कोट्यवधी डॉलर्सचे भ्रष्टाचार करूनही राजकारणी, अधिकारी सत्तेत आपल्या पदावर कायम राहिलेले असतात. मात्र स्लोवेनियामध्ये मात्र एक वेगळीच घटना घडली आहे.

लुब्लियाना येथील सुपर मार्केटमध्ये सँडविच चोरल्यानंतर स्लोवेनियाच्या एका खासदारांनी राजीनामा दिला आहे.

'सुपरमार्केटमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या भावनेने त्रासून सुपरमार्केटच्या सुरक्षा व्यवस्थेची परीक्षा घेण्यासाठी' आपण हे कृत्य केल्याचे खासदार डॅरिल क्रजॅसिस यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले.

'या चोरीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. नंतर आपण पैसे देण्यासाठी परत आलो', असे क्रजॅसिस यांनी सांगितले. तसेच या 'सामाजिक प्रयोगा'बद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. क्रजॅसिस सत्ताधारी मार्लन सँरेक लिस्ट (एलएमएस) पक्षाचे खासदार आहेत.

घडल्या प्रकाराची माहिती त्यांनी संसदेतील आपल्या सहकाऱ्यांना बुधवारी दिली होती त्यानंतर ही माहिती सर्वत्र पसरली होती.

'मी साधारणपणे तीन मिनिटे काऊंटरवर उभा होतो. मात्र सुपरमार्केटचे तीन कर्मचारी फक्त आपापसात बोलण्यात गुंग होते, त्यांनी आपल्याकडे लक्ष दिले नाही' असे 54 वर्षांच्या क्रजॅसिस यांनी टीव्ही चॅनल पीओपीला सांगितले.

'कधीकधी सुरक्षेची सगळी भिस्त व्हीडिओ कॅमेऱ्यांवर टाकून कर्मचारी निर्धास्त राहातात' असे या खासदारांना सुचवायचे होते.

सॅंडविच घेऊन निघाल्यावर 'कोणीही माझ्यामागे आले नाही किंवा कोणीही ओरडले नाही' असंही त्यांनी सांगितलं.

सुरुवातीला क्रजॅसिस यांच्या प्रयोगाला त्यांचे सहकारी संसदसदस्यांनी हसण्यावारी नेले. मात्र नंतर एलएमएस पक्षाचे संसदीय गटनेते ब्रेन गोलुबोविक यांनी क्रजॅसिस यांच्या कृत्याचा निषेध केला आणि ही अयोग्य असल्याचे सांगितले.

आपल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारून एलएमएस पक्षाच्या तत्वांनुसार क्रजँसिस यांनी राजीनामा दिल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.

क्रजॅसिस गेल्या सप्टेंबर महिन्यात संसदेत निवडून गेले. एलएमएस पक्षाचे मार्लन सँरेक स्लोवेनियाचे पंतप्रधान आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)