खूप मुलं जन्माला घाला, आयकरात सूट मिळवा: हंगेरीच्या पंतप्रधानांची घोषणा

चार किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यं असलेल्या महिलांना आयकरातून आजीवन सूट मिळेल, असं हंगेरीच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे. जास्तीत जास्त अपत्यांना जन्म द्यावा, या उद्देशाने ही घोषणा करण्यात आली आहे.

भविष्यात राष्ट्र उभारणीसाठी स्थलांतरावर अवलंबून न राहता हा मार्ग अवलंबवावा, असं हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओब्रान यांनी सांगितलं. उजव्या विचारसरणीचे ओब्रान यांचा देशात स्थलांतरणाला विरोध आहे, विशेषकरून मुस्लिमांच्या स्थलांतरणाला.

युरोपियन देशांच्या सरासरीपेक्षा हंगेरीमध्ये स्त्रियांना कमी अपत्यं आहेत. त्यातच या देशाची लोकसंख्या दरवर्षी 32,000 ने कमी होत आहे.

याच दिशेने आणखी एक उपाय म्हणून तरुण जोडप्यांना 36 हजार डॉलरचं व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे. तिसरं अपत्यं झाली की ते कर्ज रद्द करण्यात येईल.

ओब्रान यांना वाटतं की "पाश्चात्त्य देशांच्या मते" स्थलांतर हे हंगेरीच्या कमी होत चाललेल्या जन्मदराचं मुख्य कारण आहे. "प्रत्येक कमी होत चाललेल्या मुलासाठी एक स्थलांतरिताचं मूल हंगेरीमध्ये आलं तर सांख्यिक संतुलन राखता येईल, असं त्यांना वाटतं. पण हंगेरियन लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात." ओब्रान म्हणाले. "आम्हाला फक्त संख्या नकोय. आम्हाला आमची हंगेरियन मुलं हवी आहेत."

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते, त्याचवेळी बुडापेस्टमध्ये त्यांच्या सरकारच्या धोरणांविरोधात निदर्शनं सुरू होती. सुमारे 2,000 लोक त्यांच्या कार्यालयासमोर जमले होते, ज्यांना डॅन्यूब नदीवर असलेल्या पुलावर अडवण्यात आलं होतं.

जन्मदर वाढवण्याच्या संदर्भात त्यांनी एक सात-कलमी योजना जाहीर केली, तेव्हा उपस्थितांनी सर्वांत जास्त टाळ्या वाजवल्या, असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

सरकारच्या योजनेत या इतर मुद्द्यांचा समावेश आहे -

  • पुढील तीन वर्षात 21,000 शिशूवर्गांची स्थापना होणार
  • देशाच्या आरोग्यव्यवस्थेसाठी 25 लाख डॉलरचा अतिरिक्त निधी देण्यात येणार
  • घरांसाठी अनुदान
  • सात जण बसतील अशा गाड्या विकत घेता, याव्यात म्हणून सरकार मदत करेल.

सध्या हंगेरीत स्त्रिया त्यांच्या आयुष्यात फक्त 1.45 अपत्यांना जन्म देतात. तर युरोपियन महासंघात हे सरासरी दर 1.58 आहे. फ्रान्समध्ये प्रजननाचा दर सगळ्यात जास्त म्हणजे 1.96 आहे, तर स्पेनमध्ये हा दर सगळ्यात कमी म्हणजे 1.33 इतक आहे.

पश्चिम आफ्रिकेतल्या नायगर या भागात हा दर 7.24 आहे, म्हणजे तिथे एका स्त्रीला आयुष्यात सरासरी सात अपत्यं होतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)