व्हॅलेंटाईन डेचा बदला : झुरळाला द्या ब्रेकअप झालेल्या बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडचं नाव

अमेरिकेतल्या एका प्राणी संग्राहलयात झुरळांना ब्रेकअप झालेल्या पार्टनरचं नाव देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे.

टेक्सास राज्यातल्या एल पासो या संग्राहलयात Quit Bugging Me!!! नावाने हा व्हॅलेंटाईन फिव्हर साजरा केला जात आहे.

या झुरळांना नंतर भुकेलेल्या मीरकट प्राण्यांना खाऊ घातलं जात आहे. मीरकट या प्राण्याला झुरळं फार आवडतात.

एक्स पार्टनरची नावं मीरकट प्राण्यांच्या कुंपणाभोवती लावून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. पण ही नावं पूर्ण न लिहीता त्यांची अद्याक्षरं लिहिली जाणार आहेत.

"हा एक मजेशीर आणि हटके कार्यक्रम आहे," असं या कार्यक्रमाच्या आयोजक साराह बोरिगो यांनी सांगितलं.

फेसबुकवर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे.

सोमवारी फेसबुकवर हा इव्हेंट पोस्ट केल्यानंतर सुमारे 1500 जणांनी त्यांच्या एक्स पार्टनरची नावं संग्राहलयाकडे दिली आहेत. काहींनी तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतूनही नावं पाठवली आहेत.

ट्विटरवरही लोक उत्साह दाखवत आहेत.

या इव्हेंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून असं दिसतं की अनेक लोक व्हॅलेंटाईन डेला वैतागले आहेत, असं बोरिगो यांचा दावा आहे.

अजूनपर्यंत या कार्यक्रमाविरोधात तक्रार आलेली नाही. पण याला विरोध होऊ शकतो, असंही त्यांना वाटत आहे.

ही झुरळं मीरकट आणि माकडांना खायला घातली जाणार आहेत.

"झुरळं म्हणजे मीरकट प्राण्यांसाठी मेजवानी असते," असं त्या सांगतात.

न्यूयॉर्कमधलं ब्राँक्स आणि UKमधलं हेमस्ले संवर्धन केंद्रांवरही असाच कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.

झुरळांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी व्हॅलेंटाईन डे ही एक चांगली संधी आहे, असं इथल्या आयोजकांना वाटतं.

एका झुरळाची किंमत जवळजवळ 140 रुपये (2 डॉलर) आहे.

"झुरळावर शिक्का मारताना एखाद्याचा व्हीडिओ शूट करा आम्ही तुम्हाला 4600 रुपये देऊ (500 पाउंड्स) देऊ अशी काही लोकांनी मागणी केली आहे. पण आम्ही तसं केलं नाही," असं आयोजक हेन्री विडन सांगतात.

ऑस्ट्रेलियातील प्राणी संग्राहलयाच्या आयोजकांनी तर एक पाऊल पुढं टाकलं आहे. सगळ्यांत विषारी सापाला तुमच्या एक्स पार्टनरचं नाव देण्याची स्पर्धा तिथं आयोजित करण्यात आली आहे.

पण त्यासाठी एक्स पार्टनरनं केलेलं सगळ्यांत वाईट कृत्याची माहिती आधी तिथं द्यावी लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)