You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हॅलेंटाईन डे : इश्क, मोहब्बत आणि नृसिंहवाडी
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
आज व्हॅलेंटाईन डे. यादिवशी काही जण आपल्या प्रेमाची कबुली देतात, तर काही जण त्याला एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण कोल्हापूरनजीकच्या नृसिंहवाडीत अनेक जोडपी आपल्या प्रेमावर विवाहरूपी शिक्कामोर्तब करतात, मग ते कुटुंबांविरुद्ध बंड पुकारून का असेना.
सांगलीच्या तासगांवात राहणाऱ्या दत्तात्रय पोपट चव्हाण यांनीही 14 फेब्रुवारी 2018ला असंच एक कार्य पार पाडलं. आपल्याच गावातल्या सुनिता मोरे यांच्यावर त्यांचं प्रेम. घरच्यांशी जुळवाजुळव करत अखेर त्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधून प्रेमविवाह केला. अन् ती सुनिता दत्तात्रय चव्हाण झाली!
कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या नृसिंहवाडी या धार्मिक स्थळी विवाहबंधनात अडकलेलं हे काही एकमेव जोडपं नाही. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील प्रेमीजोडप्यांना लग्न करण्यासाठी आधार ठरतो तो नृसिंहवाडीचा.
अशा जोडप्यांपैकीच एक जोडी आहे कोल्हापूरची रूपाली काटकर आणि राहुल शिंदे यांची. त्यांच्यासाठी हा क्षण आला तो 3 फेब्रुवारी 2011ला.
घराच्यांचा विरोध पत्करून त्यांनी प्रेमविवाह करायचा ठरवला. नृसिंहवाडीत त्यांनी मित्रांच्या साक्षीनं लग्न केलं. आता दोघांचा संसार अगदी सुखात सुरू आहे. दोघांच्या घरातला विरोधही आता मावळला आहे.
रूपाली सांगते, "आम्ही घरी आमच्यातील प्रेमाची कल्पना दिली होती. पण घरातून नकार मिळाल्याने आम्ही नृसिंहवाडीत जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मदतीला मित्र होतेच. नृसिंहवाडीत नोटरी, लग्नासाठी भटजी अशी व्यवस्था असल्यानं आम्ही तिथं लग्न करण्याचा निर्णय घेतला."
नृसिंहवाडी प्रसिद्ध आहे ती प्राचीन दत्त मंदिरासाठी. गावची लोकसंख्या 5,000. नृसिंहवाडीत इतरेत्र लग्न होत असली तरी या मंदिरात मात्र कोणतेही लग्न विधी होत नाहीत.
गावात इतर ठिकाणी हे विधी पूर्ण करून दिले जातात. याशिवाय झालेल्या लग्नविधीची नोटरी करून देण्याची व्यवस्थाही इथून जवळच असलेल्या कुरुंदवाड गावात आहे. मुहूर्ताच्या दिवशी 20हून अधिक प्रेमविवाह पार पडतात, असं स्थानिक नागरिक सांगतात.
विवाहांची वाडी
कोल्हापूर परिसरातील महत्त्वाचं देवस्थान असलेल्या नृसिंहवाडीत कालांतराने मंगल कार्यालय, भटजी, केटरिंग, अशी यंत्रणा निर्माण झाली. त्यामुळे आसपासच्या गावांतली लग्न इथंच होऊ लागली. त्यातून विवाहांचं केंद्रस्थान म्हणून नृसिंहवाडीचं नाव पुढं आलं आणि पुढं चालून प्रेमविवाहही जमू लागले.
आता तर लग्न जमवण्याचं नृसिंहवाडीत पॅकेजच ठरलेलं असतं. सर्वसाधारणपणे 8,000 ते 20 हजार रुपये इतका खर्च एका विवाहविधीसाठी येतो.
पण लग्न जमवण्यासाठी कागदपत्रांची खातरजमा केली जाते. मुलामुलींच्या जन्मतारखा आणि वय, ओळखपत्रं, पत्ते यांचे पुरावे घेतले जातात. याशिवाय नोटरी करण्यासाठी साक्षीदारांची आवश्यकता असते, अशी माहिती इथल्या स्थानिक व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
अशा प्रकारे लग्न जमवण्यासाठीची पूर्ण व्यवस्था इथं आकाराला आली आहे. लग्न करण्याच्या काही दिवस आधी कल्पना देऊन सारी व्यवस्था केली जाते. अर्थातच यात वधुवरांच्या मित्रांची भूमिका महत्त्वाची असते. लग्नविधी आणि लग्नाचं नोटरी करून देण्याची व्यवस्था ही इथली खरी USP ठरली आहे.
अर्थात जोडप्यांनी प्रेमविवाह प्रमाणे ठरवून केलेली लग्नही नृसिंहवाडीत नियमित होत असतात. "मंदिरातल्या पुरोहितांचा अशा लग्नविधीत काही सहभाग नसतो," अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने दिली.
कोल्हापूर, सांगली, मिरज याशिवाय पुणे आणि मुंबईतूनही जोडपी इथं लग्नासाठी येतात, असं स्थानिक सांगतात.
स्थानिक पत्रकार रवींद्र केसरकर यांच्या मते या परिसरात लग्नविधीच्या सोयी उपलब्ध असल्याने इथं प्रेमविवाह करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण अशा जोडप्यांनी आईवडिलांशी बोलंलं पाहिजे, असा सल्लाही ते देतात.
इथल्या दत्त मंदिरात लग्न जरी होत नसली तरी, नृसिंहवाडीत लग्न करणारी जोडपी लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात जरूर जातात. आणि लग्नानंतरही नियमित या मंदिरात येतात... आशीर्वादासाठी आणि आपल्या त्या सोनरी क्षणाची आठवण म्हणूनही!
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)