You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळी आली म्हणून 'ती' बंद झोपडीत झोपली आणि...
पाळी आली म्हणून नेपाळमध्ये 21 वर्षांच्या महिलेला बंद झोपडीत झोपवलं. त्यातच तिचा गुदमरून मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.
पार्वती बोगती यांची सासू सकाळी त्यांना उठवायला गेली तेव्हा त्या मरण पावल्याचं समजलं.
"दुसऱ्या दिवशी तिची पाळी संपणार होती त्यामुळं ती आदल्या दिवशी खूश होती. पण बिचारीनं त्याआधीच डोळे मिटले," लक्ष्मी बोगती यांनी काठमांडू पोस्टला सांगितलं.
"थंडीत झोपडी गरम राहावी म्हणून त्याठिकाणी शेकोटी पेटवली होती. झोपडीचं दार लावलं होतं आणि तिला खिडक्यापण नव्हत्या. त्यामुळं रात्रभर धुरानं तिचा गुदमरून मृत्यू झाला असावा," असं स्थानिक पोलिस अधिकारी लाल बहादूर धामी यांनी AFPला सांगितलं.
नेपाळमध्ये पाळी आलेल्या किंवा बाळंत झालेली महिला अपवित्र मानली जाते किंवा त्यांना अपशकुनी मानलं जातं. या जुन्या प्रथेला 'चोपडी' असं म्हणतात.
त्यांना घराबाहेर एका झोपडीत किंवा जनावरांच्या गोठ्यात झोपवलं जातं. अन्न, धार्मिक गोष्टी आणि पुरुषांना स्पर्श करु दिलं जात नाहीत.
हिवाळ्यात त्या झोपड्या खूप थंड पडतात. आत झोपलेल्या महिलांवर हल्लेही झाले आहेत. याआधी गुदमरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एका मुलीचा साप चावून मृत्यूही झाला आहे.
गे्लया महिन्यात (जानेवारी 2019) बजुरा या नेपाळच्या पश्चिम भागातल्या जिल्ह्यात एक महिला आणि तिच्या मुलाचा याच प्रकारात मृत्यू झाला होता. त्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी गावातल्या 'चौपडी झोपड्या' पाडल्या होत्या.
2005मध्ये नेपाळ सरकारने पाळी आलेल्या मुली आणि महिलांना घराबाहेर झोपवण्यावर बंदी घातली आहे. 2017पासून याला गुन्हा म्हणून घोषित केलं आहे. तरीही नेपाळच्या ग्रामीण भागात ही प्रथा चालूच आहे.
एखाद्या महिलेला घराबाहेर झोपायला भाग पाडलं तर तिच्या घरच्या लोकांवर 3 महिने तुरुंगवास आणि 2 हजार रुपये दंड आकारला जातो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)