You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळीत या गावातल्या महिलांना झोपावं लागतं गोठ्यात
- Author, सुमीरन प्रीत कौर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी थंडीमध्येही गोशाळेत झोपते किंवा बाहेर झोपते. घरात मी जाऊ शकत नाही. किचनमध्येसुद्धा जाता येत नाही आणि मंदिरातही जाता येत नाही. कधी-कधी देवाला प्रश्न विचारते की माझ्या बाबतीत असं का होतं?"
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमधल्या जाना गावातली विमला देवी एका मुलाची आई आहे. त्या मासिक पाळी आल्यावर घरात पाऊल ठेवत नाहीत. मुलगा आणि नवऱ्यापासून वेगळ्या अशा घराखालील गोशाळेत त्या झोपतात.
कुलू-मनालीमध्ये वर्षभर जगभरातून पर्यटक येत असतात. इथला सुंदर निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. पण या कुलूची अजून एक वेगळी बाजूही आहे. कुलूच्या डोंगराळ भागातील गावांमधल्या बऱ्याचशा महिला मासिक पाळी आल्यावर गोशाळेत झोपतात. मासिक पाळीत महिलांना वेगवेगळ्या भेदभावांना आजही तोंड द्यावं लागतं. त्याचंच हे एक उदाहरण आहे. ही प्रथा बंद व्हावी, म्हणून इथं जनजागृतीही केली जात आहे.
या महिलांना कुटुंबापासून वेगळं गायीच्या शेणाच्या वासासह झोपणं अजिबात आवडत नाही. पण त्यांच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसतो.
विमला देवी सांगतात, "आम्ही कोणालाही स्पर्श करू शकत नाही. त्या दिवसांमध्ये महिलांना अस्वच्छ मानलं जातं. एकटं रहावं लागतं. त्यामुळे खूपच विचित्र वाटतं."
इथल्या लोकांची अशी धारणा आहे की, मासिक पाळीच्या वेळी महिला घरात आल्या तर घर अपवित्र होतं आणि याचा देवांना राग येतो.
जुन्या चालीरीती
काही दिवसांपूर्वी प्रीता देवी लग्न करून कुलूमधल्या धर्मोट गावात आल्या. BA पास झालेल्या प्रीता यांना या प्रथेचा सामना करणं सोपं नव्हतं. प्रीता सांगतात, "या जुन्या चालीरीती आहेत. पण आम्हाला याचं पालन करावंच लागतं. सुरुवातीली मी नीट झोपूसुद्धा शकत नव्हते. खूप भीती वाटायची. पण या प्रथेचं पालन करावं लागतं. नाहीतर देवाचा कोप होईल, असं सांगितलं जातं."
परंतु हिमाचल महिला कल्याण मंडळाच्या मधुर वीणा यांना वाटतं की जुन्या प्रथापरंपरा आता बदलल्या पाहिजेत. त्या सांगतात, "बदल जरी हवे असले तरी ते लवकर होणार नाहीत. इथे पुरुष प्रधान समाज आहे. त्यामुळे बदलाला वेळ लागेल. जागरुकता निर्माण झाल्यावर महिला याबाबत विचार करू लागतील."
बदलांचे प्रयत्न
महिलांना गोशाळेत झोपावं लागू नये म्हणून यावर्षी काही प्रयत्न होताना दिसत आहेत.
कुलूमध्ये सरकार 'नारी गरिमा' कार्यक्रमांतर्गत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोशाळेत राहिल्यानं महिलांना आजार होऊ शकतात हे समजवण्याचा प्रयत्न सध्या या कार्यक्रमातून होत आहेत.
या एक वर्षाच्या कार्यक्रमात पथनाट्य, लोकगीतं आणि नृत्य या कलांच्या माध्यमातूनही जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुलूचे उपायुक्त युनूस सांगतात, "लोकांच्या धारणा एकदम बदलणं सोपं नाही. सन्मानानं जगण्याचा अधिकार सगळयांना आहे. ज्या गावात आम्ही जागरुकता निर्माण करण्यासाठी जातो, त्या गावात डॉक्टर आणि अंगणवाडी सेविकांना घेऊन जातो. कारण लोकांच्या आस्था या विषयाशी जोडलेल्या आहेत. आम्ही काही पुजाऱ्यांशीही चर्चा केली, त्यातील काहींनी आम्हाला सहकार्य केलं."
किती बदल झाला आहे?
जानेवारी २०१८मध्ये ज्या गावापासून या जागृती निर्माण करणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्या गावात आम्ही पोहोचलो.
तिथे गेल्यावर कळलं की, नक्कीच अजून बरेच बदल होणं आवश्यक आहेत. पण गावात या विषयावर चर्चा सुरू झाल्या आहेत आणि यावर बोललं जात आहे. पुरुषही या विषयावर पुढाकार घेऊन बोलत आहेत.
जाना गावातले पुजारी जगत राम सांगतात, "इथे याबद्दल जागरुकता आहे. मंदिरात जाण्याचा विषय असेल तरी आम्ही त्यांना कुठपर्यंत अडवू शकू? पण, देवासाठी सगळेच समान आहेत. देवाचे दरवाजे सगळ्यांसाठीच खुले आहेत."
काही लोक असेही आहेत, ज्यांचा या बदलांना विरोध आहे. याच गावातल्या बुद्धी देवींचं म्हणतात हा तर परंपरेचा एक भागच आहे आणि मासिक पाळीच्या वेळी घराबाहेर राहणंच योग्य आहे.
बुद्धी देवी सांगतात, "आम्हाला बदल नको आहेत. आम्हाला देवांचा राग ओढवून घ्यायचा नाही. ही आमची परंपराच आहे."
पार्वती देवी यांचा एक मुलगा आहे. त्यांनी आता निश्चय केला आहे की, त्यांना मुलगी झाली किंवा त्यांच्या घरी सून आली तर त्या तिला गोशाळेत राहू देणार नाहीत.
इथल्या लोकांशी बोलून एक गोष्ट कळली, लोकांचा हा विचार बदलायला वेळ लागणार आहे. पण सुरुवात तर झाली आहे. लोकांना असंही वाटतं की, नवी पिढी आपल्यासोबत बदल घेऊनच येईल.