You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पहिली मासिक पाळी साजरी करण्यासाठी जिथं लाखोंचं कर्ज काढलं जातं #BBCShe
- Author, दिप्ती बत्तिनी
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
मला पहिल्यांदा पाळी येईल तेव्हा ते सार्वजनिकरीत्या जाहीर होणार आणि मला वेगळं बसवलं जाणार, मला त्या दिवसांत अंघोळ करता येणार नाही या विचारांनीच अंगावर काटा आला होता. पण सुदैवानं माझ्या पालकांनी असं काहीही केलं नाही. त्याऐवजी त्यांनी माझ्यातला हा शारीरिक बदल समजावून सांगितला. त्या जैविक प्रक्रियेची माहिती आणि त्या काळात कोणता आहार घ्यावा ही सगळी माहिती दिली.
माझ्या अनेक मैत्रिणींनी पहिली पाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली आहे. त्यापैकी मला काही कार्यक्रमात आमंत्रण होतं. 'पुष्पवती महोत्सवम्' (उमलणाऱ्या कळीचा उत्सव) या कार्यक्रमामुळे माझ्या मैत्रिणींना दहा दिवस शाळा बुडवावी लागायची.
जेव्हा मुलींना पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिला घरात वेगळं बसवलं जातं. तिच्यासाठी भांडी वेगळी ठेवली जातात आणि तिला वेगळं प्रसाधनगृह वापरायला सांगितलं जातं. पुढचे पाच ते अकरा दिवस तिला अंघोळ करायची परवानगी नसते. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत एक कार्यक्रम केला जातो.
चांगल्या स्थळांसाठी अट्टाहास
'बीबीसी शी पॉप अप' या उपक्रमाअंतर्गत आंध्र प्रदेश विद्यापीठात विद्यार्थिनींशी चर्चा करण्यात आली. विशाखापट्टणमच्या विद्यार्थिनींनी संवाद साधताना मासिक पाळी आल्यावर त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला ते सांगितलं.
मुलीची पहिली पाळी इतक्या थाटामाटात साजरी केली जाते मग हीच बाब एक कलंक म्हणून का बघितली जाते असा प्रश्न तीन वर्षांपासून या विद्यापीठात शिकणाऱ्या बिहारच्या एका विद्यार्थिनीनं विचारला.
मी आजुबाजूला विचारलं तेव्हा मुलीला चांगली स्थळं मिळावी म्हणून त्याचा गाजावाजा केला जातो असं मला सांगण्यात आलं. पहिल्या पाळीचे अनुभव सांगण्यासाठी आणखी काही विद्यार्थिनीदेखील सरसावल्या.
या विषयावर विविध वयोगटातल्या आणि विविध सामाजिक आर्थिक स्तरातल्या मुलींशी या बाबतीत चर्चा करण्यात आली. तेव्हा वेगळं बसणं आणि अंघोळ न करू देणं या दोन बाबींबद्दल सगळ्यांनी एकमुखानं विरोध दर्शवला. मासिक पाळीचा त्यांच्या शरीरावर आणि मनावर कसा परिणाम झाला हे मुद्दे विरोधाच्या केंद्रस्थानी होतं.
पाळीमुळे प्रगतीला खीळ
स्वप्ना 22 वर्षांची आहे. तिला पंधराव्या वर्षी पहिल्यांदा पाळी आल्यानंतर सहा महिन्यातच नात्यातल्या एका मुलाशी तिचं लग्न झालं. तो व्यवसायाने सुतार आहे. तिनं नुकतीच दहावीची परीक्षा दिली. "काय होतंय हे कळण्याच्या आतच माझं लग्न झालं. सोळाव्या वर्षी मी गरोदर होते. माझ्या स्त्रीत्वामुळे माझ्या स्वप्नांना खीळ बसली होती. आता मात्र मी ती पूर्ण करणार आहे," स्वप्ना सांगत होती.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते आता मुलींना 12व्या किंवा 13व्या वर्षी पाळी येते. सार्वजनिकपणे त्याचा बोभाटा न करता त्यांच्या आरोग्याकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं असं त्यांचं ठाम मत आहे.
नातेवाईकांचा दबाव
महिला अॅक्शनच्या स्वर्णा कुमारी या जेंडर सेन्सेटायझेशन आणि बालविवाहाच्या मुद्द्यावर काम करतात. त्यांच्या मते मुलींवर एका रात्रीत स्त्री होण्याचा उगाचच दबाव असतो.
"शारीरिक बदलांवर शिक्षण देणं आणि त्या दिवसांतली स्वच्छता शिकवण्याऐवजी पालकांचा हा बदल साजरा करण्याकडे जास्त कल दिसतो. मासिक पाळीची जाहीर वाच्यता करणं आणि त्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणं याची एक स्पर्धा समाजात दिसून येते," त्या बोलत होत्या. महिला अॅक्शन ही संस्था शाळा आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये मासिक पाळीबद्दल माहिती देण्याचं काम करतात.
12 वर्षांची गायत्री मासिक पाळीची वाट पाहत आहे. पण त्याचवेळी तिला या गोष्टीचा सार्वजनिक उत्सव नकोय. पण तिचे पालक तिचं ऐकतील का याबाबत ती साशंक आहे.
"पाळीच्या जाहीर वाच्यतेबद्दल मला काळजी वाटते. मी सध्या शेजारच्या मुलांबरोबर खेळते आणि त्यात मी खूप खूश आहे. पाळी आल्यानंतर हे सगळं बदलेल याची मला कल्पना आहे. कारण माझ्या मोठ्या बहिणीबरोबर हेच झालं होतं. आता ती मी किंवा माझा भाऊ तिच्याबरोबर नसला तरी इकडेतिकडे जायला घाबरते. मुलं तिच्या शरीरावर काँमेंट करतात आणि तिच्याकडे रोखून बघतात. त्याची मला काळजी वाटते," मच्छीमारांच्या वस्तीत राहणारी गायत्री सांगते.
काही पालकांना नातेवाईकांच्या दबावाखाली येऊन हा कार्यक्रम करावा लागतो. मधू यांना 16 वर्षांची मुलगी आहे. त्यांनासुद्धा ही परंपरा मान्य नव्हती, पण त्यांच्या आईच्या दबावामुळे त्यांना मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना बोलवावं लागल्याचं ते सांगतात.
अजूनही त्यांना या गोष्टीचा खेद वाटतो. "स्वीट सिक्सटीनबद्दल मलाही कळतं, पण पाळी येणं वेगळं आहे. मुलगी सोळा वर्षांची झाली की तिचा वाढदिवस साजरा करणं मी समजू शकतो, पण त्याचा बोभाटा करणं फार वाईट आहे."
"मला माझ्या मुलीच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल मोकळेपणानं संवाद साधायचा आहे. ते सगळं नैसर्गिक आहे, हे तिला सांगायचं आहे. तिनंसुद्धा या बदलांचं स्वागत करायला हवं आणि या बदलांची कोणतीही लाज वाटून घेऊ नये," मधू बोलत होते.
उत्सवामागचं अर्थकारण
मला या कार्यक्रमांमागची अर्थव्यवस्था जाणून घेण्याची उत्सुकता होती, हैद्राबादमधील एका फोटोग्राफरनं नाव न सांगण्याच्या अटीवर यासंदर्भात बातचीत केली.
इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करताना पालक एकदाही विचार करत नाहीत. "माझ्यासारखा फोटोग्राफर अशा कार्यक्रमाचे दोन ते तीन लाख रुपये घेतो. या कार्यक्रमात जी सजावट करतात ती अगदी लग्नासारखी असते."
सोशल मीडियावर Puberty ceremony किंवा पुष्पवती सेरेमनी असं शोधल्यास कितीतरी व्हीडिओ दिसतील. अशा व्हीडिओंना हजारो व्ह्यूज आहेत.
19 वर्षीय गौरी एका मध्यमवर्गीय घरातली आहे. या कार्यक्रमावर अमाप पैसा खर्च केल्याचं तिनं सांगितलं. तिला तीन भावंडं आहेत. "माझ्या बाबांना त्यांची प्रतिष्ठा दाखवायची होती. हा कार्यक्रम करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी त्यांनी कर्जसुद्धा काढलं होतं. आम्ही ते अजूनही फेडतोय," गौरी सांगत होती.
डॉ सीतारत्नम् यांच्या मते, "असा फाजीलपणा करण्यापेक्षा मुलींना शिक्षण देण्याची आणि त्यांना चांगला आहार देण्याची गरज आहे. अशा वायफळ खर्चामुळेच पालकांना मुली एक बोजा असल्यासारखं वाटतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)