You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रजासत्ताक दिनाला भावना कस्तुरीने केलं पुरुष पथकाचं नेतृत्व
- Author, मीना कोटवाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"लष्करात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो. आपण फक्त एक अधिकारी असतो."
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 144 पुरुषांच्या परेडला लीड करण्याचा मान मिळालेल्या भारतीय लष्करातील लेफ्टनंट भावना कस्तुरी यांचं हे मत आहे.
26 वर्षीय भावना हैदराबादच्या आहेत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून मास्टर्सपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. शालेय शिक्षणासोबतच भावना यांना नृत्य आणि गायनातही रस होता.
त्यांनी शास्त्रीय नृत्यामध्ये डिप्लोमा केला आहे. वयाच्या 23व्या वर्षांपर्यंत सामान्य जीवन जगणाऱ्या या मुलीला कधी वाटलं नव्हतं की असा इतिहास तिच्याकडून लिहिला जाईल.
स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला लीड करण्याचा बहुमान मिळालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या भानवा आनंदात आहेत.
"23 वर्षांनंतर आर्मी कॉर्प्सच्या गटाला परेड करण्याची संधी मिळाली आहे. तसंच मला लीड करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे मला आनंद झाला आहे," भावना सांगतात.
'तू मुलगी आहेस...'
"कुटुंबीयांचा पाठिंबा असल्यामुळे इथपर्यंत पोहोचणं कठीण नव्हतं. पण एक मुलगी आहे, याची जाणीव बऱ्याच वेळा लोकांनी करून दिली," भावना सांगतात.
"मुलगी आहे तिला घरात बसवा आणि तिचं लग्न करा, असं नातेवाईक म्हणायचे. पण पण माझ्या आई-वडिलांनी कुणाचं काही ऐकलं नाही. त्यांनी मला उंच झेप घेण्याची मोकळिक दिली. आज इथं पोहोचल्याचा जितका आनंद मला आहे, त्याहून अधिक माझ्या घरच्यांना आहे. बरेच दिवस घरी बोलणं होत नाही, पण मी जे काही करत आहे त्यामुळे त्यांना अभिमान वाटतो," असं भावना सांगतात.
भावना यांचे पती लष्करात अधिकारी आहेत. त्यांच्या प्रवासात पतीचीही साथ लाभली आहे.
भावना यांना अशाप्रकारे लीड करण्याची संधी कधी मिळालेली नव्हती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एनसीसीत प्रवेश घेतला.
एनसीसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लष्करात महिलांसाठी खूप संधी आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. महिला सगळीकडे यश प्राप्त करत आहेत आणि लष्करातही चांगलं काम करू शकतात, असं त्यांना वाटतं.
'...तेव्हा थकवा पळून जातो'
ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये कडक शिस्तीची ट्रेनिंग दिली जाते.
ट्रेनिंगच्या दिवसांमधील घटना आठवून भावना सांगतात, "लष्कराची ड्यूटी आणि शिस्त खूपच कठीण असते. एकदा तर पळून जायचा विचार मनात आला."
"18 किलोच्या वजनाची बॅग आणि हातात एक रायफल घेऊन 40 किलोमीटर धावावं लागतं. त्यावेळी हे सर्व सोडावं, असं मनात आलं होतं. पण हरायचं नाही, ही एकच गोष्ट मनात सतत असायची. ट्रेनिंग अकादमीत तुम्ही जेव्हा जाता तेव्हा एक सामान्य माणूस असता. पण ट्रेनिंग संपवून बाहेर पडल्यानंतर तुम्ही अधिकारी होता. त्यावेळी थकवा वगैरे सगळं दूर पळून जातो," असं त्या सांगतात.
पीरियड लीव्ह
जगभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत महिलांना मासिक पाळीदरम्यान सुटी देण्याची मागणी समोर येत आहे. पण भावना यांना ही बाब गरजेची वाटत नाही.
त्यांच्या मते, "मासिक पाळी हे जीवनाचं सत्य आहे आणि एका लष्करातील व्यक्तीच्या दृष्टीनं ही काही समस्या असू शकत नाही. लष्करात जितक्या महिल्या होत्या त्या सर्वांना मदत करत होत्या. जीवन एक संघर्ष आहे आणि प्रत्येक जण संघर्ष करत असतो. पण असं असलं तरी तुम्ही या समस्यांपासून पळ काढू शकत नाही. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर अशा समस्या अडसर ठरत नाहीत."
3 वर्षांत जीवन बदललं
भावना यांना नृत्य आणि गायनाची आवड आहे. कुटुबीयांसह वेळ घालवणं त्यांना आवडतो. गेल्या 3 वर्षांत त्यांचं आयुष्य बदललं आहे आणि नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. नृत्य आणि गायन त्यांच्यासाठी पॅशन असून आजही वेळ मिळाला तर त्या गायन आणि नृत्याचा सराव करतात.
लष्करातील अनुभवाविषयी त्या सांगतात, "माझ्या विचारांमागे आता फक्त मीच नाही तर माझ्या मागे चालणारे जवान, त्यांचे कुटुंब आणि देश आहे. आज मी जे काही आहे ते या वर्दीमुळे आहे. लष्करात येऊन मला किती आनंद झाला हे मी शब्दात सांगू शकत नाही."
लष्कर महिलांसाठी नसून पुरुषांसाठी आहे, असं अनेकदा म्हटलं जातं, पण भावना हा समज चुकीचा असल्याचं सांगतात.
"लष्करात आपण एक अधिकारी असतो मग तो पुरुष असो अथवा स्त्री. बाकी लोक जितकी मेहनत करत आहेत तितकीच मीसुद्धा करत आहे. मी सध्या कारगिलमध्ये आहे, जिथं ड्यूटी करणं सोपं काम नाही," त्या सांगतात.
"माझ्या मागे 144 जवान चालतात, ते सर्व माझी शक्ती आहेत आणि मला हिंमत देतात. त्यांची उमेद बघून मलाही चालायची प्रेरणा मिळते, मग एकेक पाऊल पुढे पडत जातं," त्या पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)