'माझी आई जिथे मोलकरीण म्हणून काम करायची तिथे मी नौदल अधिकारी झाले'

माझी आई रानी ही विशाखापट्टणमच्या नेव्हल बेसमध्ये 'मेड' म्हणून काम करायची आणि वडील आदिनारायण याच नेव्हल डॉकयार्डमध्ये हेडकुक होते. आता याच ठिकाणी मी नौदल अधिकारी म्हणून काम करते. ही गोष्ट माझीच आहे, पण कधीकधी माझाही यावर विश्वास बसत नाही.

मी खूप वेळा विचार करते, नेव्हल बेसमध्ये रात्रंदिवस कष्ट करताना, कुटुंबासाठी पै पै जमवताना, आपल्या मुलीनं सेलिंगमध्ये जावं हा विचार माझ्या आईच्या मनात कसा काय आला? पण तिनं स्वप्न पाहिलं आणि ते खरं ठरलं.

मी, लावण्या आणि सुवर्णा... आम्ही तिघी बहिणीच. दोन मुलींनंतर माझ्या वडिलांना मुलाची आस होती. म्हणूनच माझा जन्म झाला तेव्हा बाबा थोडे नाराजच झाले होते. पापा कहते है… बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा... या त्यांच्या अपेक्षा भंगल्या होत्या बहुतेक. पण आता मात्र त्यांना माझ्याबद्दल काय सांगू आणि काय नको, असं होत असतं.

आपण एखाद्या फिल्ममध्ये बघतो... एक कुटुंब अहोरात्र परिस्थितीशी झगडत असतं, अनेक संकटांचा सामना करतं, कुणीच हिंमत हरत नाही आणि एक दिवस त्यांचा मुलगा मोठी कामगिरी करून घरी येतो... हा क्षण बघताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात.

इथे मात्र फिल्म नाही, हे माझ्याबाबतीत घडलंय आणि जे मुलानं करून दाखवलं असतं तेच मुलीनं करून दाखवलंय. शिडाच्या बोटीतून जगाची सफर करण्याची मोहीम पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा मला वायझॅकचं माझं ते घर, समुद्रकिनाऱ्यावरचा नेव्हल बेस खुणावतोय. इथल्या नौदलाच्या तळावरचे छोटे रस्ते, वळणं, गल्ल्या हेच माझं आयुष्य आहे.

नेव्हल बेसमध्ये काम करत असल्यामुळे माझ्या आईला सगळ्या सोयीसुविधा मिळत होत्या. पण ती जे काम करत होती तेच तिच्या मुलींनी करावं, असं तिला वाटत नव्हतं. म्हणूनच तिनं आम्हाला वेगळ्या वातावरणात वाढवायचं ठरवलं.

मी आणि माझ्या बहिणींच्या शिक्षणासाठीचा खर्च परवडणारा नव्हता तरीही माझ्या आईबाबांनी मलकापुरमसारख्या छोट्याशा गावात भाड्यानं घर घेतलं आणि आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. मी अभ्यासात हुशार होते, पण माझा कल आऊटडोअर अक्टिव्हिटीजकडे होता. वायझॅकचा समुद्र आणि तिथला नेव्हल सेलिंग क्लब मला खुणावत होता.

मला आठवतं, माझी आई मला त्या क्लबमध्ये घेऊन जायची आणि वॉटर स्कूटरची राईड घडवायची. तिथल्या नौदल अधिकाऱ्यांच्या मुलांप्रमाणेच मी पण सेलिंग करावं, असं तिला वाटायचं. सेलिंगचं हे वेड मला तिच्यामुळेच लागलं. मी 13 वर्षांची होते तेव्हा मी शिडाच्या छोट्या बोटीतून सैर केली होती.

शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मी एनसीसीची बेस्ट कॅडेट होते, पण नौदलातच जायचं, असं काही ठरवलं नव्हतं. 11वी आणि 12वी मी तेलुगू माध्यमातच शिकले होते. माझे सगळे मित्र-मैत्रिणी इंजिनिअरिंगला चालले होते. माझ्या बाबांकडे इंजिनिअरिग कॉलेजची फी भरण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे मी इंजिनिअरिंगला जाण्याचा विचार सोडून दिला आणि B.Sc. कॉम्प्युटर सायन्सची वाट धरली.

माझं कॉलेजचं शिक्षण सुरू असताना घराला हातभार लावणंही गरजेचं होतं. मला स्कॉलरशिप मिळत होती. पण तरीही माझ्या शिक्षणाचा भार वडिलांवर पडू नये, असं मला वाटायचं.

माझी मधली बहीण तेव्हा पार्लर चालवायची. मी कॉलेजमधून आले की तिच्या मदतीसाठी जायचे. तिनं पार्लरमध्ये काम करायचं, मी माझा अभ्यास संपवायचा आणि मग तिला मदत करायची, असं आमचं रुटीन असायचं. आमच्या दोघींच्या कमाईमुळे कुटुंबाची मिळकत वाढायला लागली.

याच वेळेस मी डिफेन्स सर्व्हिसेसच्या परीक्षा देत होते. नौदलामध्ये मी 2011ला सब लेफ्टनंट म्हणून दाखल झाले. नौदलातलं काम आणि सेलिंग सुरूच होतं. आता सारं काही आलेबल होतं. माझ्या स्वप्नांना नवे पंख मिळाले होते. आई-बाबांच्या कष्टाचं चीज झालं होतं.

हैदराबादजवळच्या एअरफोर्स अकॅडमीमध्ये तेव्हा माझं ट्रेनिंग सुरू होतं. पण त्याच काळात माझ्या आईला सर्व्हायकल कॅन्सर झाला. तिचा आजार तिसऱ्या टप्प्यात होता.

माझं ट्रेनिंग सोडून मी आईच्या मदतीला गेले. ज्या आईनं माझ्या शिक्षणासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या तिला या आजारानं ग्रासलेलं बघून आम्ही सगळेच कोलमडून गेलो होतो. पण याही परिस्थितीत आई निर्धारानं उभी राहिली.

एकीकडे आईचं ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन हे उपचारांचं चक्र आणि दुसरीकडे नौदलात स्थिरावण्यासाठीची माझी धडपड हा काळ आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो.

पण याही परिस्थितीत आई आणि आम्ही सगळे निर्धारानं तगलो. तिच्या उपचारांत मी मोठा वाटा उचलू शकले, याचं आता मला समाधान वाटतं.

आईच्या जवळ राहता यावं म्हणून मी वायझॅकला पोस्टिंग मागितलं आणि माझ्या मागणीनुसार नौदलानंही तिथं पोस्टिंग दिलं. म्हणूनच वायझॅकचा हा नौदलाचा तळ म्हणजे माझं हक्काचं घर आहे.

हे सगळं करत असताना माझं सेलिंग सुरूच होतं. त्यातच 2014 मध्ये नौदलाच्या ओशन सेलिंग नोड विभागानं महिला अधिकाऱ्यांना सेलिंगच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मी 13 वर्षांची असल्यापासून छोट्याछोट्या सेलिंग मोहिमांमध्ये भाग घेत होते. आता माझं हे पॅशन पुढे नेण्याची सुवर्णसंधी होती.

मी ओशन सेलिंग नोडमध्ये दाखल झाले. त्यावेळी कॅप्टन दिलीप दोंदे आणि कॅप्टन अतुल सिन्हा हे दोघंजण सेलिंगमध्ये नव्यानव्या मोहिमा आखत होते.

अशाच एका मोहिमेत केप टाऊन ते रिओ हा प्रवास मी शिडाच्या बोटीतून केला. वर्तिका जोशी, श्वेता कपूर आणि मी या मोहिमेत कॅप्टन अतुल सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालो. एवढ्या लांब टप्प्यात केलेलं सेलिंग हा माझ्यासाठी आयुष्य पालटून टाकणारा प्रवास होता.

या मोहिमेवर जाताना माझे बाबा थोडेसे काळजीत पडले होते. पण आईला विश्वास होता, मी हे करू शकेन. कॅप्टन दिलीप दोंदे आणि कॅप्टन अतुल सिन्हा यांच्यासोबत सेलिंग करताकरता माझाही आत्मविश्वास बळावला होता.

केप टाऊन ते रिओ या मोहिमेनंतर माझं सेलिंगचं पर्वच सुरू झालं. या मोहिमेमध्ये मी आणि पायल गुप्ता आमच्या पुरुष सहकाऱ्यांसोबत सहभागी झालो होतो.

या शर्यतीत 22 देशांची पथकं होती. यातच आम्ही अवघ्या 20 दिवसांत अटलांटिक महासागर पार करणारी पहिली भारतीय टीम ठरलो. ही मोहीम आम्ही 'आयएनएस महादई' या बोटीतून पार केली.

या मोहिमेनंतर जेव्हा भारतीय नौदलानं महिलांच्या पथकाची सागर परिक्रमा आयोजित केली तेव्हा अर्थातच मी या मोहिमेची सुरुवातीची शिलेदार होते. ऑगस्ट 2017 ते एप्रिल 2018 या नऊ महिन्यांत आम्ही सहा जणींनी शिडाच्या बोटीतून सागर परिक्रमा पूर्ण केली.

लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी हिच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता आणि मी. आम्ही सगळ्याजणी ही मोहीम पूर्ण करून आलो तेव्हा देशभरात आमचं जोरदार स्वागत झालं.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीही आमच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं. आमच्या या मोहिमेमुळे जगभरात भारतीय नौदलाची मान उंचावली आहे.

हे सगळे कौतुकसोहळे होत असताना मला राहूनराहून वायझॅकचा किनारा आठवत राहतो. मी 13 वर्षांची असताना अनुभवलेला पहिला थरार मनात अजून जसाच्या तसा आहे.

माझ्या आईनं माझ्यासाठी वाऱ्यावर स्वार होण्याची स्वप्नं पाहिली नसती तर हा थरार मी कधीच अनुभवू शकले नसते. म्हणूनच जेवढी कृतज्ञता मला वायझॅकच्या समुद्राबद्दल आहे तेवढीच आईबाबांच्या अपार कष्टांबद्दल आहे.

माझ्या या कहाणीतून मी जे शिकले तेच सगळ्यांना सांगेन. एखादी गोष्ट करायचीच असं मनापासून ठरवलं तर अडचणींचे भलेमोठे डोंगर आणि समुद्राच्या उंच उसळणाऱ्या लाटाही तुम्हाला रोखू शकत नाहीत.

शिडाच्या होडीतून सागर परिक्रमा पार पाडणाऱ्या 'INSV तारिणी'च्या शिलेदार पी. स्वाती यांची ही कहाणी आरती कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)