You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘रेप प्रूफ पँटी’ : 19 वर्षांच्या मुलीने बनवलं बलात्कार रोखणारं संरक्षण कवच
- Author, मीना कोतवाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातल्या एका साध्या घरातून आलेल्या एका मुलीने जगभरातल्या सगळ्या मुलींना बलात्कारापासून वाचवण्याचा चंग बांधला आहे.
सीनू कुमारीने एक अशी पँटी तयार केली आहे ज्यातल्या स्मार्ट लॉकमुळे स्त्रिया बलात्कारापासून वाचू शकतील. ती याला 'रेप प्रूफ पँटी' म्हणते.
तिने या पँटीमध्ये असं कापड वापरलं आहे जे ब्लेडने कापता येत नाही. यात एक स्मार्ट लॉक, एक GPS आणि एक रेकॉर्डरही लावला आहे.
ही पँटी तयार केली म्हणून केंद्रीय बालविकास मंत्री मनेका गांधींनी आपलं कौतुक केलं आहे, असं सीनूने सांगितलं. ती आता या पँटीचं पेटंट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीनुसार देशात दररोज साधारण 79 बलात्कार होतात. मध्य प्रदेशात सगळ्यांत वाईट अवस्था आहे. 2016च्या आकडेवारीनुसार 28,947 बलात्कारांच्या घटनांची नोंद झाली. यात सर्वाधिक 4882 घटना मध्य प्रदेशमध्ये झाली आहे.
उत्तर प्रदेशात 4,818 तर महाराष्ट्रात 4,189 घटनांची नोंद झाली.
या पँटीची वैशिष्ट्ये काय?
19 वर्षांची सीनू उत्तर प्रदेशातल्या फारुखाबाद जिल्ह्यातल्या एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. सीनू तिच्या वडिलोपार्जित घरापासून दूर आपल्या लहान बहीण-भावांसोबत राहते.
या पँटीविषयी ती बीबीसीला सांगते, "ही पँटी पटकन कापता येत नाही, तसंच जाळता ही येत नाही. यात एक स्मार्ट लॉकही लावलं आहे, जे फक्त पासवर्डने उघडता येतं. यात एक बटण आहे जे दाबलं की लगेच इमर्जन्सी 100 नंबर डायल होईल आणि यात लागलेल्या GPSमुळे पोलिसांना तुमचं लोकेशन मिळेल. रेकॉर्डिंग सिस्टिममुळे तुमच्या आसपास जे काही घडत आहे त्याचा आवाजही रेकॉर्ड होत राहील," सीनू पुढे सांगते.
समजा कुणाला पोलिसांचा नाही तर दुसरं कोणाचा नंबर सेट करायचा असेल तर?
यावर सीनू म्हणते, "कोणत्या नंबरवर फोन लागणार, हे सेटिंगवर ठरतं. 100 आणि 1090 हे नंबर सुरक्षेसाठी कायम उपयोगी असतात. पोलीस स्टेशनही सगळीकडे असतात. म्हणूनच हे नंबर सेट केले आहेत."
ही पँटी बनवायला जवळपास चार हजार रुपये खर्च आला आहे. यासाठी तिला तिच्या कुटुंबाचाही पूर्ण पाठिंबा होता.
खासदाराची मदत
फारुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यांनी केंद्र सरकारला याबाबत एक अधिकृत पत्र लिहिलं आहे. सीनूने या पँटीचं पेटंट घेण्यासाठी अलाहबादच्या National Innovation Foundationकडे अर्ज केला आहे.
पण ही पँटी बाजारात आणण्यापूर्वी त्यात काही सुधारणांची गरज आहे.
सीनू सांगते की महिलांना ही पँटी कायम घालण्याची गरज नाही. "ही पँटी तेव्हाच घाला जेव्हा तुम्ही कुठे एकट्या जाणार असाल. जसं बुलेटप्रूफ जॅकेट कायम घालून ठेवण्याची गरज नसते, तसंच ही पँटी पण कायम घालून ठेवण्याची गरज नाही."
याव्यतिरिक्त ती अजूनही काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
'थोडी मदत मिळाली तर बरं होईल'
सीनू सांगते की तिने स्वतः रिसर्च करून ही पँटी तयार केली आहे. "मी यात स्वस्त सामानाचा वापर केला आहे. जर कापड आणि लॉक चांगल्या दर्जाचं लावलं तर ही पॅन्टी अजून चांगली सुरक्षा देऊ शकेल. पण तेव्हा थोडा खर्च वाढू शकतो," ती सांगते.
तिला आता सरकार किंवा एखाद्या कंपनीकडून मदतीची अपेक्षा आहे. "त्यांनी मदत केली तर या पँटीचा दर्जा सुधारेल. सध्या तरी ही पँटी फक्त एक प्रायोग आहे."
"छेडछाडीच्या, बलात्कारांच्या बातम्या मी रोज टीव्हीवर पाहाते. या बातम्या मला अस्वस्थ करतात. घराबाहेर जाताना कायम असुरक्षित वाटतं," ती म्हणते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)