राणा अय्यूब यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने मंगळवार, 7 फेब्रुवारीला राणा अय्युब यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची याचिका फेटाळली.

अंमलबजावणी संचालनालयाने पत्रकार राणा अय्युब यांच्यावर आरोप केले आहेत की त्यांनी समाजसेवा करण्यासाठी क्राऊंड फंडिंगव्दारे पैसे जमा केले पण त्या पैशांचा गैरवापर करत महागड्या गोष्टींवर खर्च केला.

या प्रकरणी राणा अय्युब यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातल्या इंदिरापुरममध्ये एफआयआर दाखल झाला आहे. गाझियाबादच्या विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना समन्स पाठवलं होतं.

राणा अय्युब यांनी या समन्सला कोर्टात आव्हान दिलं होतं पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायमूर्ती, न्या वी रामासुब्रमण्यम आणि न्या जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना म्हटलं की या प्रकरणाची सुनावणी ट्रायल कोर्टासमोर व्हावी.

कोर्टाने पुढे म्हटलं, "आमच्या मते पीएमएलएच्या सेक्शन 3 अंतर्गत, ती जागा, जिथे सहापैकी कोणतीही एक क्रिया घडली आहे, ती अपराध घडण्याची जागा आहे. आम्ही तपासनंतर या प्रकरणी पुन्हा केस दाखल करण्यासाठी जागा सोडत आहोत."

गुजरात दंगलींवर पुस्तक लिहिणाऱ्या अय्यूब यांना बलात्काराच्या धमक्या

2002ला झालेल्या गुजरात दंगलींवर 'गुजरात फाइल्स : अॅनाटॉमी ऑफ अ कवर-अप' हे पुस्तक लिहिणाऱ्या पत्रकार राणा अय्युब यांनी म्हटलं आहे की त्यांना खुनाच्या आणि सामूहिक बलात्काराच्या धमक्या येत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) मानवीहक्क परिषदेने याची दखल घेत यावर चिंता व्यक्त केली असून सरकारने राणा अय्युब यांच्या सुरक्षेची सरकारने तजवीज करावी असं म्हटलेलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी मानसी दाश यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या, त्यांना धमक्या नेहमीच मिळतात, पण पूर्वी या धमक्या ऑनलाईन असायच्या पण आता फोनवरही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

काय म्हणतात राणा अय्युब

माझ्या नावे एक पॉर्न व्हीडिओ बनवण्यात आला आहे. यात मॉर्फ करून माझा चेहरा वापरण्यात आला असून हा व्हीडिओ फोनवर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देशभर पसरवला जात आहे.

"माझा फोन नंबर ट्वीटवर शेअर करण्यात आला असून त्या सोबत 'मी उपलब्ध आहे,' असं लिहिण्यात आलं आहे."

"माझ्या नावानं असं ट्वीट करण्यात येत आहेत की मी लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्यांचं समर्थन करते, तसंच भारत आणि भारतीयांचा द्वेष करते. मला सामूहिक बलात्काराच्या धमक्या येत आहेत. मी या प्रकरणात खुलासा केला आहे."

"तरीही लोक मला मेसेजवरून घरात येऊन बलात्कार करण्याच्या धमक्या देत आहेत. माझ्या मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून लोक मला विचारत आहेत की 'तुम्ही देहविक्रीच्या व्यवसायात आहे का, तुमची सेवा मिळेल का?' सध्याचं वातावरण फारच बिघडलेलं आहे."

पोलिसांत तक्रार दिली आहे

मी 26 एप्रिलला दिल्लीत साकेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सुरुवातीला माझी तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. माझ्या वकिलाने एफआयआर दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. जूनचा निम्मा महिना संपला आहे, पण यावर अजूनही कारवाई झालेली नाही.

'गुजरात फाईल्सशी संबंध'

या सगळ्यांच्या संबंध फक्त मी लिहिलेल्या पुस्तकाशी नाही तर गुजरात संदर्भात मी जेवढं लिखाण केलं आहे त्याशी संबंधित आहे. हा द्वेष आहे, जो वेळोवेळी समोर येत आहे. हे पूर्वीही झालेलं आहे.

"माझं पुस्तक येण्यापूर्वी गुजरातमधील खोट्या चकमकींवर मी शोध पत्रकारिता केली होती. त्यावेळी ट्विटरवर 'राणा अय्यूब सेक्स सीडी' या नावाने हॅशटॅग चालवण्यात आला होता. त्यानंतर माझ्या नावाने अश्लील फोटो त्याला जोडण्यात आले. प्रत्येक वेळी असं होतं असतं पण यावेळी या धमक्यांनी खालची पातळी गाठली आहे."

संयुक्त राष्ट्रांनी घेतली दखल

संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होतं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांसाठी भारतातील सध्याची स्थिती गंभीर बनत आहे. 24मे रोजी संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होतं की भारत सरकारने राणा अय्युब यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे. या घटनेलाही एक महिना होऊन गेला असून प्रत्यक्षात त्यावरही काही कारवाई झालेली नाही.

त्या सांगतात, "काही पत्रकारांनी त्यांची मोठी मदत केली. पण एडिटर्स गिल्डसची भूमिका यायला अडीच महिने लागले. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि पत्रकारांनी माझी मोठी मदत केली, त्यामुळे हा विषय संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचू शकला. मी अशी अपेक्षा करते की देशातील वातावरण पत्रकारांसाठी चांगलं बनेल."

'गुजरात फाइल्स : अॅनाटॉमी ऑफ अ कवर-अप' या पुस्तकाचं कन्नडमध्ये भाषांतर गौरी लंकेश यांनी केलंय. गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017मध्ये हत्या करण्यात आली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)