You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंडोनेशियात केवळ गुन्हा कबूल करून घेण्यासाठी आरोपीच्या गळ्यात साप
अपराध्यांकडून गुन्हा कबूल करण्यासाठी जगभरातले पोलीस वेगवेगळ्या क्लृप्त्या राबवतात. यासंदर्भात इंटरनेटवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. चोरीचा आरोप असणाऱ्या कथित आरोपीकडून सत्य वदवून घेण्यासाठी इंडोनेशियातील पोलिसांनी चक्क त्याच्या गळ्यात साप लपेटला आहे.
व्हीडिओनुसार या व्यक्तीचे हात हातकड्यांनी बांधलेले आहेत आणि साप त्या आरोपीच्या शरीरावर फिरतो आहे. एवढंच नव्हे तर दुसरा संदिग्ध व्यक्ती सापाला धरुन मूळ आरोपीच्या चेहऱ्यावर नेत असल्याचंही दिसतं आहे.
अंगावरून जिवंत साप फिरल्याने आरोपी भयभीत झाल्याचं व्हीडिओत स्पष्टपणे दिसतं आहे. सापापासून वाचण्यासाठी तो जोरजोरात किंचाळतो आहे. त्याच्या अंगावरून साप खेळवणारा व्यक्ती हसताना दिसतो आहे मात्र हा व्यक्ती पोलिसांच्या वर्दीतला नाही.
ताब्यात घेण्यात आलेला हा व्यक्ती पापुआ न्यू गिनीचा असल्याची चर्चा आहे.
पोलीस त्या संबंधित आरोपीवर ओरडताना पाहायला मिळत आहे. पोलीस त्याला विचारतो- किती वेळा मोबाईल फोन चोरले आहेस?
संदिग्ध आरोपी म्हणतो- दोन वेळा.
आरोपीकडून गुन्हा वदवून घेण्याचा हा प्रकार नियमबाह्य असल्याचं स्थानिक पोलिसांनी मान्य केलं आहे. असं करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध आम्ही कठोर कारवाई केली आहे असं पोलीस प्रमुख टोनी आनंद यांनी सांगितलं.
सापाचा धाक दाखवला असला तरी या पोलिसाने गुन्हा वदवून घेण्यासाठी आरोपीला मारहाण केलेली नाही असं त्यांनी सांगितलं.
पोलीस प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्याच्या वर्तनाचं समर्थन करताना सांगितलं की साप पाळीव होता आणि तो बिनविषारी होता. मात्र साप कुठल्या प्रजातीचा होता हे त्यांनी सांगितलं नाही.
स्थानिक पोलिसांनी स्वत:च हा प्रकार शोधून काढला आणि अंगीकारला. जेणेकरून आरोपी लवकरात लवकर गुन्हा कबूल करेल.
हा व्हीडिओ मानवाधिकार कार्यकर्ते वेरोनिका कोमान यांनी ट्वीट केला आहे. पापुआ न्यू गिनीच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आणि त्यालाही सापाचा धाक दाखवण्यात आला.
सापाला तोंडात टाकू, पोटात सोडू अशी आरोपीला धमकी दिली जात असल्याचं व्हीडिओत दिसतं आहे.
पापुआ न्यू गिनीमध्ये मानवाधिकार उल्लंघनाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. फुटीरतावादी गट पापुआ न्यू गिनीच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. नैसर्गिक संसाधनांनी मुबलक असा हा भाग पापुआ न्यू गिनीशी संलग्न आहे. 1969 मध्ये हा भाग इंडोनेशियाचा भाग झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)