साप चावल्यानंतर या तज्ज्ञाने लिहिला स्वतःच्याच मृत्यूचा तपशील

एका विषारी आफ्रिकन सापाचा अभ्यास करताना सर्पतज्ज्ञ कार्ल पी शमिड्ट यांना त्या सापाने दंश केला.

अशावेळी कुठलाही सामान्य माणूस खरं दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेला असता पण सर्पदंशाने मरताना नक्की काय घडतं ते अभ्यासण्यासाठी शमिड्ट यांनी उपचार नाकारले आणि आपल्याला काय होत आहे याचा संपूर्ण तपशील मरण्याआधी लिहिला.

सप्टेंबर 1957 मध्ये शिकागोमधल्या लिंकन पार्क प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी एका लहान सापाची ओळख पटवण्यासाठी त्याला शहरातल्याच फिल्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संस्थेत पाठवलं.

कार्ल पॅटरसन शमिड्ट या 76 सेंटीमीटर लांब सापाचं निरीक्षण करणार होते. ते नावाजलेले सर्पतज्ज्ञ होते आणि त्यांनी या संग्रहालयात तब्बल 33 वर्षं सेवा बजावली होती.

ते जमिनीखाली राहणाऱ्या सापांचे तज्ज्ञ होते. 1955 साली संग्रहालयाच्या मुख्य क्युरेटर या पदावरून ते निवृत्त झाले. आपल्या या 33 वर्षांच्या नोकरीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उभयचर आणि असंख्य सरपटणारे प्राणी गोळा केले होते.

त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर त्यांना हा छोटासा साप कोणता, हे तपासून सांगण्याची विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी सहज होकार दिला.

सर्पदंश

या सापाच्या शरीरावर चमकदार रंगीत पट्टे होते आणि त्याचं डोकं दक्षिण आफ्रिकेतल्या ग्रीन ट्री सापासारखं होतं. त्या सापांना बूमस्लँगही म्हणतात. शमिड्ट यांनी या तपशिलांची नोंद केली.

मात्र त्याच्या गुद्दद्वाराजवळचा भाग दुभंगलेला नव्हता, याचं त्यांना कुतूहल वाटलं.

यानंतर त्यांनी जे केलं ते त्यांच्या जीवावरच बेतलं. सापाचं जवळून निरीक्षण करता यावं, यासाठी त्यांनी सापाला हाताने उचललं.

सापाला उचलताक्षणी त्याने शमिड्ट यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या अंगठ्यावर दंश केला. शमिड्ट यांच्या अंगठ्यावर दोन छोटे, दुखणारे रक्ताचे डाग दिसले.

यानंतर शमिड्ट यांनी तात्काळ आपला अंगठा चोखायला सुरुवात केली. पण वैद्यकीय मदत घेण्याऐवजी त्यांनी स्वतःवर विषाचे काय परिणाम होत आहेत, याच्या नोंदी करायला सुरुवात केली.

सर्पदशांनंतर 24 तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला.

शमिड्ट यांचा अखेरचा दिवस

ब्लूमस्लँग जातीचे साप जिवाला धोका पोहोचेल इतकं विष माणसाच्या शरीरात सोडू शकत नाही, असा त्याकाळी शमिड्ट यांच्यासह सर्वच सर्पतज्ज्ञांचा समज होता.

त्यामुळे शमिड्ट यांनी सर्पदंशानंतर घरी जाऊन विषाचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो, याची नोंद केली.

अमेरिकेतल्या सरकारी रेडियो चॅनेल पीआरआयच्या सायन्स फ्रायडे या कार्यक्रमात 'डायरी ऑफ अ स्नेकबाईट डेथ' हा व्हिडियो प्रसारित झाला होता. स्वतः शमिड्ट यांनी आपल्या डायरीत ज्या नोंदी करून ठेवल्या होत्या, त्याची माहिती यात सांगण्यात आली. शमिड्ट यांच्या नोंदी अशा होत्या,

  • संध्याकाळी 4.30 - 5.30 च्या सुमारास दरम्यान रेल्वेने घरी जाताना खूप मळमळ झाली. मात्र उलटी झाली नाही.
  • मग 5:30 - 6:30 खूप थंडी भरली, अंग थरथरायला लागलं. त्यानंतर 101.7º F [38.7º C] एवढा तापही भरला.
  • संध्याकाळी 5.30ला हिरड्यातून रक्त आलं.
  • रात्री 8:30ला दोन मिल्क टोस्ट खाल्ले.
  • रात्री 9:00 ते 12:20 पर्यंत चांगली झोप लागली.
  • मध्यरात्री 12:20 मिनिटांनी लघवी झाली. त्यातून थोडं रक्तही आलं.
  • पहाटे 4:30 वाजता ग्लासभर पाणी प्यायलो. यानंतर प्रचंड मळमळ आणि उलटी झाली. रात्री खाल्लेलं सगळं बाहेर आलं. याचा अर्थ ते पचलं नव्हतं. पण नंतर बरं वाटलं आणि पुन्हा सकाळी 6:30 पर्यंत चांगली झोप लागली.

वैद्यकीय उपचारांना नकार

मृत्यूच्या काही तास आधी शमिड्ट यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती करण्यात आली होती. पण असं केलं तर सर्पदंशानंतर मानवी शरीरावर जे परिणाम होतात, त्यात ढवळाढवळ होईल म्हणून त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला नकार दिला.

उलट शास्त्रज्ञ म्हणून वाटत असलेल्या कुतूहलामुळे त्यांनी नाश्त्यानंतरच्या सर्व बारिकसारीक तपशीलाची नोंद करायला सुरुवात केली.

26सप्टेंबर, सकाळचे 6:30: ताप 98.2 (36.7 ºC). नाश्त्यामध्ये सीरिअल, टोस्ट-अंडी, सफरचंदाचा सॉस आणि कॉफी घेतली. दर तीन तासांनी होणाऱ्या लघवीमध्ये रक्ताचा थेंबही नव्हता. नाक आणि तोंडातून सतत रक्त येत होतं. पण खूप नाही.

सायन्स फ्रायडेमध्ये सांगितल्याप्रमाणे शमिड्ट यांच्या डायरीमधला शेवटचा शब्द होता 'अत्याधिक'

दुपारी जवळपास 1.30 वाजता त्यांनी जेवण केलं आणि त्यांना उलटी झाली. त्यांनी आपल्या पत्नीला बोलावलं. वैद्यकीय मदत येईपर्यंत ते बेशुद्ध झाले होते आणि त्यांचं संपूर्ण अंग घामाने भिजून गेलं होतं.

तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत शमिड्ट यांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.

दुपारी तीन वाजता 'Respiration Paralysis' म्हणजे श्वास न घेता आल्याने शमिड्ट यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

फुफ्फुसांमध्ये रक्तस्त्राव झाल्याने श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्या, असं त्यांच्या शवविच्छेदन अहवालात लिहिलं होतं.

डोळे, फुफ्फुस, मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

अत्यंत विषारी

शमिड्ट यांच्या मृत्यूच्या जवळपास दोन दशकांनंतर बूमस्लँग सापावर शास्त्रीय प्रयोग करण्यात आले. यात हा साप आफ्रिकेतल्या अत्यंत प्राणघातक सापांपैकी एक असल्याचं निष्पन्न झालं.

या सापाच्या दंशामुळे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यामधलं रक्त गोठतं (disseminated intravascular coagulation). यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अनेक छोट्याछोट्या गाठी तयार होतात आणि रक्त गोठण्याची क्षमता नाहिशी होते. यामुळे पीडित व्यक्तीच्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू होतो.

झाडावर राहणारे हे साप मध्य आणि दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आढळतात. पूर्ण वाढ झालेल्या बूमस्लँग सापाची लांबी 100-160 सेमी असते. काही साप तर 183 सेमी लांब असतात.

हा साप सरडे, झाडावर राहणाऱ्या पाली, बेडूक खातो. कधीकधी छोटे सस्तन प्राणी, पक्षी आणि घरट्यातली अंडीही खातो.

मात्र हा लाजाळू साप असल्याचं मानलं जातं. खूप मोठं भक्ष्य खाणं तो सहसा टाळतो.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार साप हाताळताना शमिड्ट बेसावध राहिले आणि त्यामुळे या सापाने हल्ला केला असावा.

बूमस्लँग खूप लहान होता. शिवाय शमिड्ट यांना केवळ एकच दात लागला होता. जखम तीन मिलीमीटर एवढी छोटीशी होती आणि शमिड्ट यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. त्यामुळे शमिड्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीदेखील या सर्पदंशाला फार गांभीर्याने घेतलं नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे.

मात्र बूमस्लँगच्या विषावरचं औषध त्याकाळी उपलब्ध नव्हतं आणि यातून बरं होऊ, अशी आशा करण्यापलिकडे हातात काही नाही, हे शमिड्ट यांना माहिती होतं, असं काहींना वाटतं.

सर्पदंशानंतरच्या त्या अखेरच्या काही महत्त्वाच्या तासांमध्ये शमिड्ट यांच्या डोक्यात काहीही सुरू असलं तरी एकमात्र नक्की, ते घाबरून मागे हटले नाही तर त्यांनी या भयाचा हिमतीने सामना केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)