राज ठाकरे आघाडीसोबत आले तर त्याचा फायदा कुणाला?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये विरोधकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकजूट होताना दिसत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.

तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाआघाडीत यावं असं आवाहन अजित पवार यांनी भाषणात केलं होतं. राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असे सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास मनसेच्या कोणत्या जागांवरील मतांचा दोन्ही काँग्रेसला फायदा होईल तसेच आघाडीतल्या पक्षांच्या पारंपरिक मतदारांची मनसेला साथ मिळेल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच राष्ट्रवादीनं स्वीकारलं तरी काँग्रेस मनसेला स्वीकारेल का याबाबतही तज्ज्ञांना शंका वाटते.

मुंबई आणि मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण, नाशिक येथे मनसेचे मतदार आहेत. त्यामुळे मनसेला आघाडीत सहभागी करून घेतल्यावर यापैकी कोणत्या जागा मनसेला सोडायच्या याचा निर्णय दोन्ही काँग्रेसला घ्यावा लागेल.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय झालं होतं?

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला 13 जागांवर यश मिळालं होतं. त्यामध्ये 6 जागा मुंबईमधील, 2 जागा ठाण्यात, 3 नाशिक तर औरंगाबाद आणि पुण्यात प्रत्येकी 1 जागा मिळाली होती.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केवळ एकच जागा राखण्यात मनसेला यश आलं. 2017मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यातील 6 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

एकंदर मनसेच्या निवडणूक इतिहासाकडे पाहिल्यास मुंबई शहर आणि परिसरामधील मतदारांवर प्रभाव टाकण्याची ताकद या पक्षाकडे दिसते. भारतीय जनता पार्टीविरोधात मोट बांधण्यासाठी आघाडीला या मतांचा फायदा होऊ शकतो.

काँग्रेसची भूमिका काय असेल?

राष्ट्रवादी काँग्रेसनं जरी मनसेबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचं ठरवलं तरी काँग्रेस याबाबत कितपत सकारात्मक आहे हे पाहावं लागेल असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं.

ते म्हणतात, "राष्ट्रवादी काँग्रेस आण मनसेची मतं थोडीफार इकडंतिकडं होऊ शकतील पण काँग्रेसला आपल्या उत्तर भारतीय मतांमुळे या आघाडीत सहभागी होणं थोडं कठिण वाटू शकतं. त्यामुळे या आघाडीत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीमधील पक्षश्रेष्ठीच घेऊ शकतात असं वाटतं."

निवडणुकांमध्ये मनसेच्या मतांमुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फटका बसल्याचं दिसून येतं असं राजकीय घडामोडींचे अभ्यासक संदीप प्रधान व्यक्त करतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, " मनसेला ईशान्य मुंबई, ठाणे, दिंडोरी अशा दोन तीन लोकसभा मतदारसंघामध्ये रस असावा असं दिसतं. राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यातील एखाद-दुसरी जागा मनसेला देऊ करण्यात येईल. भाजपा, शिवसेना, काँग्रेस यांना एका मर्यादेच्या पलिकडे निवडणुकीत तोटा होईल असं दिसत नाही परंतु मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे."

"मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मैत्री झाल्यास राज ठाकरे यांचा प्रचारामध्ये राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो", असं प्रधान यांना वाटतं. "परंतु काँग्रेसला ही मैत्री कितपत आवडेल हे सांगता येत नाही. आमच्या मित्रपक्षानं राज ठाकरे यांच्याशी मैत्री केली आहे असं काँग्रेस म्हणू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद असल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी मैत्री करावी, त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडू अशी काँग्रेसची भूमिका आहे. सगळीकडे मतविभाजन होण्यापेक्षा काही मतदारसंघ दिलेले सोयीस्कर अशी ही भूमिका आहे. अशाचप्रकारे राष्ट्रवादीने मनसेशी मैत्री करण्याचा निर्णय होऊ शकतो." असं प्रधान सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)