You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांच्या बारामतीत भाजपविरोधात पोस्टरबाजी #5मोठयाबातम्या
सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1. बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही
बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधी फुलणार नाही अशा पोस्टर्ससह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. बारामती शहरातील प्रशासकीय भवन, नगरपालिका, पंचायत समिती अशा वर्दळीच्या ठिकाणी हे पोस्टर्स झळकले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचं एक वेगळं महत्व आहे आणि हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपची नजर आता बारामतीवर आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीत कमळ फुलणार असल्याचं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून हे पोस्टर्स लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यंदा भाजप राज्यात 43 जागा जिंकेल आणि 43वी जागा ही बारामतीची असेल असं भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यातील एक बारामतीची हवी असं अमित शहा म्हणाले होते.
2. निवडणुकांसाठी पैसा लागतो-सुशीलकुमार शिंदे
निवडणुका लढवण्यासाठी फार पैसा लागतो असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये केलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि आरपीआय नेते राजाभाऊ सरवदे हे प्रतिस्पर्धी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी हे उद्गार काढले.
यावर सरवदे यांनी हजरजबाबीपणे उत्तर देताना आपणच ही सवय लावली असा टोलाही हाणला. हे विधान गंमतीनं केल्याचं स्पष्टीकरण शिंदे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर दिलं.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार आणि 99व्या नियोजित मराठी संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
3. नोटबंदीसंदर्भात मृतांची आकडेवारी नाही-पीएमओ
नोटबंदीवेळी झालेल्या मृत्यूसंदर्भात आकडेवारी उपलब्ध नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. पीएमओचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआईओ) यांनी केंद्रीय माहिती आयोगासमोर हा उलगडा केला आहे. 'नवभारत टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
केंद्रीय माहिती आयोग माहिती अधिकाराअंतर्गत एका याचिकेची सुनावणी करत आहे. माहिती अधिकाराअंतर्गत 30 दिवसात माहिती देणं बंधनकारक आहे. ती देण्यात आली नव्हती. 18 डिसेंबर 2018 रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना नोटबंदीनंतरच्या काळात स्टेट बँकेचे तीन अधिकारी आणि एका ग्राहकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. नोटबंदीनंतर कितीजणांचा मृत्यू झाला आहे यासंदर्भात नीरज शर्मा यांनी पीएमओकडे माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती.
4. बहुमताचं सरकार स्थैर्यासाठी आवश्यक-पंतप्रधान
देशाला स्थिरता मिळवून देण्यासाठी बहुमताचं सरकार आवश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सोळाव्या लोकसभेचा बुधवारी शेवटचा दिवस होता. लोकसभेतील भाषणादरम्यान मोदींनी ही भूमिका मांडली. केंद्रात बहुमताचं सरकार असणं आवश्यक आहे. गेली पाच वर्ष बहुमताचं सरकार असल्याने जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे असंही ते म्हणाले. 'द हिंदू'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
तीन दशकांनंतर केंद्रात बहुमताचं सरकार आहे. यासाठी देशातील नागरिकांचे आभार मानायला हवेत. बहुमताचं सरकार असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा चांगली झाली आहे असं त्यांनी सांगितलं.
5. मुंबईत म्हाडाचा धमाका; सात हजार घरांची सोडत
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हाडाकडून वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस सुरू झाला आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद मंडळासाठी सुमारे सात हजार घरांच्या सोडतीचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. निवडणुकीनंतर कोकण मंडळासाठी नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. घरांच्या सोडती जाहीर केल्या जात असतानाच म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे. मुंबईत 238 घरं, पुणे मंडळात 4,664, नाशिक येथे 1,183 तर औरंगाबाद इथे 917 घरांची सोडत जाहीर करण्यात आली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)