राहुल गांधी आणि प्रियंकांनी नरेंद्र मोदींची स्तुती कधी केली होती?

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. उजव्या विचारसरणीच्या अनेक फेसबुक पेजेसवर हा व्हीडिओ शेअर केला जात आहे.

या व्हिडिओमधून असं दाखवण्यात येत आहे की दोघा बहिण-भावडांनी आपला निवडणूक प्रचार जवळपास सोडून दिलाय. मोदींच्या हाती देशाचं भवितव्य सुरक्षित आहे, हे त्यांनी मान्यच केलं आहे.

व्हिडिओच्या पहिल्या भागात प्रियंका गांधी म्हणत आहेत, "तुमच्या देशासाठी मतदान करा, सोनिया गांधींसाठी नाही. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा."

व्हिडिओच्या दुसऱ्या भागात प्रियंका गांधी असं म्हणतात, "तुमचं भविष्य नरेंद्र मोदींच्या हातात आहे...जर तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल हवं असेल तर नरेंद्र मोदींना तुमचा वर्तमानकाळ द्या आणि ते तुम्हाला चांगलं भविष्य देतील."

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवरच्या अनेक ग्रुप्समध्ये हा व्हीडिओ शेकडो-हजारो वेळा पाहिला गेलाय.

आमच्या पडताळणीत मात्र या व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. या दोन्ही नेत्यांनी जी लांबलचक भाषणं दिली आहेत, ती संपादित करून हा व्हीडिओ बनवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 11 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या रोड शोमधून प्रियंका गांधींचं राजकारणात औपचारिक पदार्पण झालं. प्रियंकांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अनेक राजकीय चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. उजव्या विचारसरणीच्या फेसबुक ग्रुप्स तसंच ट्विटर हँडलवरून सातत्यानं काँग्रेसच्या नव-नियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधींना लक्ष्य करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच उजव्या विचारधारेच्या काही पेजेसवर प्रियंका गांधींचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये प्रियंका दारूच्या नशेत लोकांसोबत गैरवर्तन करत असल्याचा दावा केला होता. मात्र हा व्हीडिओही फेरफार करून बनवला असल्याचं, बीबीसीच्या पडताळणीत स्पष्ट झालं होतं.

अर्थात, खोट्या बातम्या पसरवणं ही केवळ उजव्या विचारधारेच्या संघटनांची मक्तेदारी नाहीए. प्रियंका गांधींच्या लखनौमधील रॅलीनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनीही चुकीचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकले होते. लखनौच्या रोड शोला जमलेली गर्दी म्हणून काँग्रेसनं जो फोटो टाकला होता, तो वास्तविक तेलंगणामधील रॅलीचा असल्याचं नंतर उघडकीस आलं.

प्रियंका गांधींचा व्हीडिओ

सध्या प्रियंकांचा मोदी स्तुतीचा जो व्हीडिओ व्हायरल होत आहे, त्यातील प्रियंकांची काही वक्तव्यं ही 2014 सालच्या एका व्हीडिओमधली आहेत. 22 एप्रिल 2014 मधलं हे भाषण आहे. काँग्रेसच्या अधिकृत यूट्यूब पेजवर हा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी भाजपवर टीका करत आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रियंका उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या एका सभेमध्ये बोलत होत्या. या व्हिडिओमध्ये त्या भारताच्या विविधतेबद्दल तसंच विकासाच्या प्रक्रियेतून मागे राहिलेल्या समाजघटकांबद्दल बोलत आहेत. रोजगाराच्या समस्येवरही त्यांनी भाष्य केलंय.

प्रियंका यांनी म्हटलं, "मला माहितीये तुम्ही सोनिया गांधींना मत देणार आहात. मला त्याबद्दल कोणतीही शंका नाहीये. तुमच्या विकासासाठी त्यांनी किती निष्ठेनं काम केलंय, हे तुम्ही पाहिलं आहे."

यानंतर प्रियंका म्हणतात, "तुमच्या देशासाठी मतदान करा, सोनिया गांधींसाठी नाही. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा. जे तुम्हाला रोजगार देऊ शकतात आणि देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात, अशा कोणालातरी मत द्या."

राहुल गांधींचा व्हीडिओ

राहुल गांधींनी केलेली मोदींची स्तुती म्हणून जो व्हीडिओ व्हायरल केला आहे, त्याचंही वास्तव वेगळं आहे. तालकटोरा स्टेडिअमवर 12 जानेवारी 2017 ला काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये राहुल गांधींनी केलेल्या भाषणात फेरफार करून हा व्हीडिओ बनवला गेला आहे. राहुल गांधींचं हे चाळीस मिनिटांचं भाषण काँग्रेसच्या अधिकृत यूटयुब पेजवरही पहायला मिळतं.

राहुल गांधी या भाषणात नेमकं काय म्हणाले होते,

"मोदी नेहमी नवीन भारत घडविण्याची भाषा करतात, भूतकाळ आणि भविष्याबद्दल बोलतात. मात्र देशाचा वर्तमानकाळ ते विसरून गेले आहेत. त्यांच्या दृष्टिनं सर्वजण हे कुचकामी आहेत आणि केवळ ते एकटेच भारताला घडवू शकतात. खरंच आपला देश एवढा खराब आहे?

याच संदर्भात ते पुढे म्हणाले, "तुमचं भविष्य हे नरेंद्र मोदींच्या हातात आहे...केवळ त्यांच्याच हातात. जर तुम्हाला उज्ज्वल भविष्य हवंय, तर तुमचा वर्तमान नरेंद्र मोदींना द्या. तरच ते तुमचं भविष्य घडवू शकतील."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)