You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका गांधी यांच्या 'दारुच्या नशेतील' व्हीडिओमागचं सत्य काय?
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
सोशल मीडियावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा एक व्हीडिओ शेयर केला जात आहे. या व्हीडिओच्या आधारे लोक प्रियंका गांधी दारुच्या नशेत धुंद असल्याचा आरोप करत आहेत.
10 सेकंदाच्या या व्हीडिओत प्रियंका गांधी मीडियातल्या लोकांवर रागवताना दिसून येत आहेत.
काही लोकांनी या व्हीडिओतील 6 सेकंदाचा भाग शेयर केला आहे, ज्यात प्रियंका म्हणत आहेत की, "आता तुम्ही चुपचाप उभं राहून तिथपर्यंत चालाल."
सगळीकडे शेयर केलेला हा व्हीडिओ इतका अस्पष्ट आहे की, हा व्हीडिओ पाहिल्यावर वाटेल की, प्रियंका यांच्या डोळ्याखाली काळे चट्टे पडले आहेत.
I am with Yogi Adityanath, राजपूत सेना आणि Modi Mission 2019 यांसारखे काही फेसबुक पेज आणि ग्रुप्सवर हा व्हीडिओ शंभरदा शेयर करण्यात आला आहे.
"प्रियंका यांनी दारुच्या नशेत मीडिया प्रतिनिधींशी गैरवर्तणूक केली," असा दावा हा व्हीडिओ शेयर करताना लोकांनी केला आहे.
पण बीबीसीच्या पडताळणीत हे सर्व दावे चुकीचे असल्याचं निष्पन्न झालं.
जेव्हा प्रियंका यांना राग आला...
हा व्हीडिओ 12 एप्रिल 2018चा आहे, रिवर्स इमेज सर्च या पद्धतीमुळे हे समोर येतं.
12 एप्रिलला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील फॉलोअर्सना कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या विरोधात दिल्लीतल्या इंडिया गेट परिसरात 'मिडनाइट प्रोटेस्ट'मध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती.
जानेवारी 2018मध्ये कठुआ जिल्ह्यातल्या बकरवाल समुदायाच्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या मुलीची हत्या करण्यात आली होती. तर उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार केल्यामुळे भाजप नेते कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शनं करण्यात आली होती.
याच निदर्शनांचा भाग म्हणून 12 एप्रिलच्या आंदोलनात प्रियंका गांधी या मुलगी मिराया आणि पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासह सामील झाल्या होत्या. 'मोदी भगाओ, देश बचाओ', अशी या आंदोलनाची मुख्य घोषणा होती.
राहुल आणि प्रियंका दोघंही या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या दोघांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. प्रियंका गांधी यांना कार्यक्रमाच्या मुख्यस्थळी पोहोचण्यासाठी अडचण आली होती.
काही मीडिया रिपोर्टनुसार, स्वत:सोबत आणि मुलीसोबत झालेल्या धक्काबुक्कीमुळे प्रियंका नाराज झाल्या होत्या.
निदर्शनाच्या स्थळी त्यांनी कार्यकर्ते आणि मीडिया प्रतिनिधींना म्हटलं होतं की, तुम्ही काय करत आहात, याचा एकदा विचार करा. आता तुम्ही चुपचाप उभं राहून तिथपर्यंत चालाल. ज्यांना धक्का मारायचा आहे, त्यांनी घरी निघून जावं.
12-13 एप्रिल 2018च्या मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका गांधी मीडिया आणि कार्यकर्त्यांवर रागावल्या होत्या, हे खरंच आहे. पण त्या दारुच्या नशेत धुंद होत्या, हे कोणत्याही ठिकाणी छापून आलं नव्हतं.
काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या गटांमध्ये प्रियंका यांच्याविरोधात दुष्प्रचार केला जात आहे.
बऱ्याच लोकांनी प्रियंका यांचा व्हीडिओ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या वादग्रस्त टिप्पणीसोबत शेयर केला आहे.
"प्रियंका गांधी यांना बायपोलर आजार आहे. त्या खूपच हिंसक वर्तन करतात. यासाठी त्यांनी सार्वजनिक जीवनात काम करू नये," असं स्वामी यांनी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)