प्रियंका गांधी यांच्या लखनौ रोड शोला खरंच 'एवढी' गर्दी जमली होती? - फॅक्ट चेक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची बहीण आणि पक्षाच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबरोबर लखनौमध्ये सोमवारी एक भव्य रोड शो केला. या रॅलीसाठी जमलेल्या गर्दीचे अनेक फोटो सर्वत्र उपलब्ध होते, पण एका फोटोवरून सोशल मीडियावर बरीच राळ उडतेय.

या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. या गर्दीतल्या काही लोकांनी काँग्रेस पक्षाचे झेंडे हातात घेतले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील हा फोटो ट्वीट केला.

पण काही वेळाने त्यांनी तो फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून काढून टाकला. का? कारण तो फोटो लखनोचा नव्हता तर एक जुना फोटो होता.

प्रियंका चतुर्वेदी यांनी आपली चूक सुधारत काही वेळाने लखनौमधील रोड शोचे काही वेगळे फोटो ट्वीट केले.

प्रियंका चतुर्वेदींपाठोपाठ काँग्रेसच्या अधिकाधिक सोशल मीडिया पेजेसवरून हा फोटो हटविण्यात आला. मात्र उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो अजूनही दिसत आहे.

प्रियंका गांधींचा राजकारणात औपचारिक प्रवेश झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच रोड शो होता. या रोड शो मध्ये काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते तसंच पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील सहभागी झाले होते.

बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौ विमानतळापासून काँग्रेस मुख्यालयापर्यंतचे 15 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी राहुल आणि प्रियंका यांना तब्बल पाच तासांचा वेळ लागला. कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजीत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला.

जुन्या फोटोचं वास्तव

जो फोटो काँग्रेसचे समर्थक पक्षाची लोकप्रियता दाखवण्यासाठी आणि भाजपची मंडळी काँग्रेसचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी वापरत आहेत, तो मुळात 5 डिसेंबर 2018चा आहे.

हा फोटो माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता मोहम्मद अझरुद्दीननं ट्वीट केला होता. त्यानं लिहिलं होतं, "आपलं राज्य तेलंगणामध्ये प्रचारासाठी येणं हे नेहमीच खूप खास असतं. लोकांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून येत आहे."

काँग्रेसचे नेते अजहरुद्दीन तेलंगणामधील गजवेल विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार प्रताप रेड्डी यांच्या प्रचारासाठी आले होते. गजवेल विधानसभा मतदारसंघ तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा आहे. आणि या मतदारसंघात KCR यांना हरविण्यासाठी 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण जोर लावला होता.

मात्र फेसबुकवर 'टीम राहुल गांधी' आणि 'काँग्रेस लाओ, देश बचाओ' सारख्या काँग्रेस समर्थक ग्रुपमध्ये हा फोटो पुन्हा शेअर करण्यात येत आहे. हा फोटो लखनौच्या रोड शोचा असल्याचं या ग्रुपवर म्हटलं आहे.

ट्विटरवरही काही लोकांनी हा जुनाच फोटो पोस्ट करून उत्तर प्रदेशमध्ये गांधी परिवाराची लोकप्रियता कायम असल्याचं म्हटलं आहे.

भाजपकडून काँग्रेसची खिल्ली

भाजपच्या खासदार किरण खेर यांनीसुद्धा हा व्हायरल फोटो ट्वीट करून काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

किरण खेर यांनी लिहिलं आहे, "लखनौमध्ये प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी जमलेल्या कथित गर्दीचा एक फोटो काँग्रेसनं ट्वीट केला होता. थोड्या वेळानं तो काढून टाकण्यात आला. कारण लोकांनी त्यांना सांगितलं की भिंतींवर जे पोस्टर्स लागले आहेत, ते तेलुगू भाषेत आहेत. जर हे खरं असेल तर अतिशय हास्यास्पद आहे.

सोशल मीडियावर उजव्या विचारसरणीच्या अनेक ग्रुपमध्ये हा फोटो शेअर केला जात आहे. काँग्रेसची चोरी उघड झाल्याची टीका लोकांनी केली आहे. रस्त्यावर गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेसनं जुना फोटो वापरल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)