You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका गांधी यांचा लखनौमधील रोड शो LIVE : कुठल्याही भाषणाशिवाय संपला प्रियंकांचा रोड शो
प्रियंका गांधी यांचा लखनौमधला रोड शो 5 तासांनंतर संपला आहे. काँग्रेसच्या लखनौमधल्या कार्यलयात प्रियंका गांधी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी 5. 50 - यूपीत काँग्रेस कमजोर राहू शकत नाही - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. ही विचारधारेचे लढाई आहे, मोदींनी 5 वर्षांत देशात काही केलं नाही. रोजगार दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.
"उत्तर प्रदेशात काँग्रेस कमजोर राहू शकत नाही, इथूनच पक्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मी प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना जबाबदारी दिली आहे," असं राहुल म्हणाले.
यूपीनं सर्वांना ट्राय केलं आहे, आता काँग्रेसची बारी आहे, उत्तर प्रदेशातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला पुढे करा, हवेत उडणाऱ्या नेत्यांना नाही, असं यावेळी राहुल यांनी प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना सर्वां समोर सांगितलं.
मायावती आणि अखिलेश सिंह यांचा मी आदर करतो, पण काँग्रेस पक्ष संपूर्ण दमानं या निवडणुकीत उतरेल, असंही त्यांनी म्हटलंय.
संध्याकाळी 5.42 - रोड शो संपला, नेते नेहरू भवनमध्ये दाखल
प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि इतर सर्व नेते आता उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. नेहरू भवन असं या कार्यालयाचं नाव आहे.
संध्याकाळी 5 - तिसऱ्यांदा वाहन बदललं
सुरक्षेच्या कारणास्तव या रोड शोमध्ये तिसऱ्यांदा वाहन बदलण्यात आलं आहे. बसमधून सुरू झालेला हा रोड शो नंतर एका SUV आणि आत एका ट्रकमधून सुरू आहे. थोड्याच वेळात सर्व नेते लखनौमधल्या कार्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे.
दुपारी 4.45 - गेल्या 4 तासांपासून रोड शो सुरू
साधारण 15 किलोमीटरचा हा रोड शो गेल्या 4 तासांपासून सुरू आह. या दरम्यान राहुल आणि प्रियंक यांनी हजरतगंज भागातल्या बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, महात्मा गांधी आणि इतर पुतळ्यांना हार अर्पण केले आहेत.
दुपारी 4 - शर्मांचा चहा घेतला
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्यांचा रोड शो लालबाग परिसरात थांबवून तिथल्या प्रसिद्ध शर्मा टी स्टॉलचा चहा घेतला.
दुपारी 3.55 - राहुल गांधी यांचे भाषण
राहुल गांधी यांनी भाषण करत लोकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणबाजी करून घेतली आहे. तसंच जोपर्यंत यूपीमध्ये काँग्रेसचं सरकार येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दुपारी 3.30 - रोडशोमध्ये अडथळे
रस्त्यांवर असलेल्या विजेच्या तारांमुळे या रोड शोमध्ये अडथळे आले. त्यामुळे आता बस सोडून ते त्यांच्या गाडीतून रोड शो करत आहेत.
आतापर्यंतचा रोडशो एका बसच्या छतावर उभं राहून केला जात होता. पण बसच्या उंचीमुळे रस्त्यावरील विजेच्या तारांचा अडथळा येत होता.
दुपारी 3. 20 - रोड शोमध्ये रफालच्या प्रतिकृती
या रोड शोमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाच्या झेंड्यांबरोबरच रफाल विमानांच्या प्रतिकृती दिसून येत आहेत.
दुपारी 3 - प्रियंकांचे 60 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स
प्रियंका गांधी या आजचा रोडशो सुरू होण्याआधी ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत. त्या ट्विटरवर येताच काही तासांमध्ये त्यांचे फॉलॉअर्स 60 हजारांच्या पुढे गेले आहेत. प्रियंका फक्त 7 लोकांना फॉलॉ करत आहेत. त्यात काँग्रेस, राहुल गांधी, सचिन पायलट, अशोक गेहलोत, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.
दुपारी 2.15 - दिड तासांपासून रोड शो
लखनौ विमानतळ ते काँग्रेस ऑफीस दरम्यानच्या रस्त्यावर सुरू करण्यात आलेला रोड शो गेल्या दिड तासांपासून सुरू आहे. लखनऊच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत आहे.
दुपारी 1.45 रॉबर्ट वाड्रांची फेसबुक पोस्ट
प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून प्रियंका यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंजाबच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं रोड शोसाठी जी बस वापरली होती. तिच काँग्रेसकडून इथंसुद्धा वापरली जात आहे.
रस्त्यावर प्रियंका सेनाचे टिशर्ट घातलेले कार्यकर्ते दिसत आहेत. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात वानर सेना केली होती, तशीच ही सेना असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
राहुल गांधींच्या हातात यावेळी रफाल विमानाची प्रतिकृती दिसत आहे. रफालचा मुद्दा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यसाठी राहुल यांचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
जाणकारांच्या मते, पूर्व उत्तर प्रदेशच्या 42 जागांसाठी प्रियंका 18 फेब्रुवारीपासून दौरा सुरू करतील.
प्रियंका गांधी यांच्या अभिनंदनासाठी तसंच स्वागतासाठी लावण्यात आलेली पोस्टर्स आणि बॅनर्सवर त्यांची तुलना पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या काळाशी करण्यात आली आहे.
प्रियंका गांधी कार्यक्रमाच्या निमित्ताने लखनौचं काँग्रेस कार्यालय नव्याने नटलं आहे. कार्यालयाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. आसपासच्या परिसरात सगळीकडे काँग्रेसची पोस्टर्स, बॅनर्स झळकत आहेत. या कार्यालयात प्रियंका गांधी यांच्यासाठी स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुभाष मिश्र प्रियंका स्वागतासंदर्भात निरीक्षण मांडतात, "खूप दिवसांनंतर काँग्रेसचा प्रभारी उत्तर प्रदेशात चार दिवस तळ ठोकून कार्यकर्त्यांना भेटणार आहे. निवडणुकांसंदर्भात चर्चाही करणार आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)