रॉबर्ट वाड्रा ED समोर हजर; प्रियंका गांधी म्हणतात मी त्यांना साथ देणार

बेहिशेबी संपत्ती आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा आज सक्तवसुली संचलनालयासमोर अर्थात EDसमोर चौकशीसाठी हजर झाले. यावेळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महासचिव आणि त्यांच्या पत्नी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.

प्रियंका गांधींचं वाड्रा यांना सोडायला जाणं म्हणजे भाजपसाठी एका मोठा संदेश असल्याचं बोललं जात आहे.

''मी रॉबर्ट वाड्रा यांची साथ देणार आहे'' असं प्रियंका गांधींनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

रॉबर्ट वाड्रा यांना ED च्या कार्यालयात सोडल्यानंतर त्या काँग्रेस कार्यालयात गेल्या. कालच काँग्रेस कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. आज त्यांनी कार्यभार स्वीकारत लोकांच्या भेटीगाठी घेतल्या.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांना कोर्टाने 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं असलं तरी चौकशीसाठी वैयक्तिकरित्या हजर होण्याचेही आदेश दिले आहेत.

रॉबर्ट वाड्रांवरील आरोप

बेहिशेबी संपत्ती आणि मनी लाँड्रिग प्रकरणी वाड्रा यांना आज सक्तवसुली संचलनालयाने पाचारण केलं होतं. बेहिशेबी संपत्तीविरोधी कायद्याअंतर्गत आज त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

लंडनमध्ये 12 ब्रायस्टन स्क्वेअरवर एका संपत्तीच्या खरेदीशी संबधित प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. 19 लाख पाऊंड मध्ये या संपत्तीची खरेदी झाली होती. या संपत्तीची मालकी वाड्रा यांच्याकडे आहे. त्यांचे सहकारी सुनील अरोरा यांच्यावरही EDने मनी लॉंड्रिंग प्रकरणात गुन्हा नोंदवला होता.

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जमीन व्यवहारात कथित घोटाळे केल्याचे आरोप आहेत. विविध तपास यंत्रणाद्वारे वारंवार तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळेही त्यांचं नाव माध्यमांमध्ये येत असतं.

नुकतंच जोधपूर उच्च न्यायालयानं राजस्थानमधील एका प्रकरणी रॉबर्ट आणि त्यांच्या आईंना 12 फेब्रुवारी रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

तसंच रॉबर्ट वाड्रा यांच्या अटकेला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. त्यासाठी सरकारनं वेगळी याचिका दाखल करावी असं कोर्टानं सुचवलं आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

रॉबर्ट वाड्रांवरील इतर आरोप

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, सप्टेंबर महिन्यात हरियाणातल्या गुडगावमधील जमीन घोटाळाप्रकरणी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

FIR मध्ये DLF ही कंपनी आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज यांचंही नाव सामील आहे.

निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यामुळे जुन्या प्रकरणांना समोर आणलं जात आहे, असं रॉबर्ट यांनी याप्रकरणी म्हटलं होतं.

सुरेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीनं याप्रकरणी एक FIR दाखल केली होती. शर्मा यांनी सांगितलं की, 2007मध्ये स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीनं शिकोहपूर गावात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून 3 एकर जमीन कवडीमोल दरानं विकत घेतली होती.

रॉबर्ट वाड्रा या कंपनीचे संचालक आहेत. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी नियम धाब्यावर बसवत या जमिनीचा व्यवहार केला होता, असा आरोप आहे.

याबाबत बोलताना वाड्रा यांनी म्हटलं होतं, 'निवडणुकीचा काळ आहे. इंधनाच्या किंमत वाढल्या आहेत...यामुळे लोकांचं मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या एका दशकाहून जुन्या प्रकरणाला समोर आणलं जात आहे. यात नवीन काय आहे?'

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)