राम मंदिरासाठी अरब शेखानं सुषमा स्वराजांसमोर भजन गायलं? : फॅक्ट चेक

सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा एक जुना व्हीडिओ व्हायरल होतो आहे. राम मंदिराला पाठिंबा म्हणून एका जाहीर कार्यक्रमात सुषमा स्वराज यांच्यासमोर एक शेख भजन म्हणत आहेत असा हा व्हीडिओ आहे.

फेसबुकवर हा व्हीडिओ गेल्या दोन दिवसात लाखो नेटिझन्सनी पाहिला आहे. मंगळवारी काही हजार नेटिझन्सनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

काहीजणांनी एका विशिष्ट संदेशासह हा व्हीडिओ शेअर केला आहे. तो संदेश असा- "काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज कुवेत दौऱ्यावर होत्या. त्यांच्या सन्मानार्थ शेख मुबारक अल-रशीद यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या समर्थनार्थ एक गाणं म्हटलं. हे गाणं म्हणत त्यांनी भारतीयांची मनं जिंकली. आवर्जून पाहा."

अरब देशांचा पोशाख परिधान केलेली एक व्यक्ती गाणं म्हणत असल्याचं व्हीडिओत दिसतं आहे. त्यांच्या बाजूला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बसल्याचं दिसतं आहे.

व्हायरल व्हीडिओतील गायकाचे शब्द आहेत- जो राम का नहीं, मेरे काम का नहीं. बोलो राम मंदिर कब बनेगा.

या व्यक्तीच्या मागे कुवेत दौऱ्याशी निगडीत एक फलकही दिसतो. त्याचवेळी व्हीडिओवर वृत्तसंस्था ANIचं बोधचिन्हही आहे.

आम्ही या व्हीडिओची शहानिशा केली. हा व्हीडिओ खोटा असल्याचं आमच्या पडताळणीत स्पष्ट झालं. या व्हीडिओत छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. 2018 वर्षाच्या शेवटीही हा नकली व्हीडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता.

कुवेत व्हीडिओचं सत्य

हा व्हीडिओ 30 ऑक्टोबर 2018चा असल्याचं रिव्हर्स सर्चमधून स्पष्ट झालं आहे.

भारतीय सरकारी चॅनेल डीडी न्यूजनुसार हा व्हीडिओ कुवेतमधील भारतीय समाजाच्या कार्यक्रमादरम्यानचा आहे. या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. सुषमा स्वराज यांच्यासमोर कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

कुवेतमधील स्थानिक गायक मुबारक अल-रशीद या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी बॉलीवूडची दोन गाणी म्हटली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांचं आवडीचं 'वैष्णव जन तो तेने कहिए' हे भजन म्हटलं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी मुबारक अल-रशीद यांचा हा व्हीडिओ ट्वीट केला होता.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यामते महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन तो तेने कहिए' हे भजन म्हणणाऱ्या देशविदेशातील 124 अव्वल गायकांमध्ये मुबारक अल-रशीद यांचा समावेश आहे. या गायकांनी आपापल्या देशात हे भजन गायलं.

या कार्यक्रमाचा व्हीडिओ अतिशय सुमार दर्जाच्या एडिटिंगसह बदलण्यात आला आहे. ANI वृत्तसंस्थेच्या युट्यूबवर याचा खरा व्हीडिओ पाहता येऊ शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)