You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये मुंबईत चर्चा, नवी दिल्लीत शरद पवारांच्या घरी खलबतं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात दादरमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. अजित पवार यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी ही भेट झाल्याचं सांगितलं आहे.
"राज ठाकरे यांचा केंद्रातल्या सरकारला विरोध आहे, त्यांच्याशी कुठलीही चर्चा न होता आम्ही एकत्र येणार नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणून ही चर्चा केली. कधी काळी भाजपचा पाठिंबा घेणाऱ्या मायावतीही आज मोदी विरोधात आहेत, भाजपसोबत असणारे चंद्राबाबू नायडू विरोधात आहेत," असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
"याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. तसंच कुठल्या कारणामुळे आम्हाला बरोबर घेणार नाही अशी राज ठाकरे यांची शंका आहे. त्याचं निरसन झालं पाहिजे," असं ते पुढे म्हणाले आहेत.
मुख्य म्हणजे नवी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी महाआघडीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. त्याचवेळी अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात ही बैठक झाली.
मोदींना हरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाआघाडीत यावं असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्याच्या काही तासानंतरच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट झाली आहे.
अजित पवार यांनी भाषणात राज ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यावेळी ही आपली स्वतःची भूमिका आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं.
"राज ठाकरे यांनी महाआघाडीमध्ये यावं हे माझं वैयक्तिक मत आहे," असं पवार म्हणाले होते.
"2014मध्ये मनसेनं कमी जागा लढवल्या होत्या. पण त्यांना 1 लाखाहून अधिक मतं मिळाली होती.
"राज ठाकरे यांची भाषा पूर्णपणे बदलली आहे. ते पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतात, राज ठाकरे यांनी 2 डिसेंबर रोजी उत्तर भारतीय पंचायतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती," असं पवार म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)