You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे लोकसभेला राष्ट्रवादीबरोबर जाणार की काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देणार?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
2011 साली गुजरात दौरा करुन नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक करणारे राज ठाकरे. मोदींना देशाचं नेतृत्व दिलं पाहिजे असं सुचवणारे राज ठाकरे. आपल्या कडवट हिंदुत्ववादी भूमिकेसाठी देशभर प्रसिद्ध असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीत वाढलेले राज ठाकरे. अडवाणी आणि वाजपेयींना मानणारे राज ठाकरे. आता हेच राज ठाकरे 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असू शकतात.
प्रत्येक राज्यात छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे, त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात मनसेला काही जागांसाठी बरोबर घेता येईल का किंवा त्यांच्याशी पडद्यामागे काही पॅक्ट घडू शकतो का याची चाचपणी सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. 19 जानेवारीला कोलकात्यात ममता बॅनर्जींनी विरोधकांची मोट बांधून त्याची झलक दाखवली.
तशीच मोट महाराष्ट्रात दिसू शकते. ज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनसेचाही सहभाग असू शकतो.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा आहे. मनसेच्या गोटात याबाबत नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपाडे यांच्याशी संपर्क केला.
"अजूनतरी तसा काही प्रस्ताव काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेला नाही, प्रस्ताव आला तर त्यावर राज ठाकरे विचार करतील," अशी सूचक प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी झाली तर ईशान्य मुंबई आणि नाशिकच्या जागेसाठी मनसेचा आग्रह असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर संदीप देशपांडेंना विचारलं तेव्हा ते म्हणाले,
"ईशान्य मुंबई आणि नाशिकची चर्चा आम्हीसुद्धा मीडियातून ऐकत आहोत. त्यावर अजूनतरी मी काही बोलू शकत नाही."
पण संदीप देशपांडे यांनी कुठलीही शक्यता फेटाळून लावली नाही हे विशेष.
काँग्रेस सकारात्मक?
काँग्रेसच्या भारत बंदला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. राज ठाकरे वेळोवेळी त्यांच्या कार्टूनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना दिसतात तर दुसरीकडे काँग्रेसला असलेला सॉफ्ट कॉर्नरही स्पष्ट जाणवतो.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
त्यातच राज ठाकरेंनी पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आमंत्रण राहुल गांधी यांना पाठवल्यानंतर तर चर्चांना आणखी उधाण आलं.
त्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले,
"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस धोरणात्मक पद्धतीनं जागा वाटून घेणार आहोत. पण दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या बरोबरच्या मित्र पक्षांना देऊ शकतात. जसं आम्ही प्रकाश आंबेडकरांना ऑफर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राजू शेट्टींसाठी जागा सोडू शकते. पण मनसेबाबत अजून तरी तसा काही प्रस्ताव आलेला नाही. पण तो आलाच तर आम्ही त्यावर गंभीरपणे चर्चा करू."
राज ठाकरेंची काँग्रेसबरोबरची वाढती जवळीक आणि राहुल गांधींना आलेल्या लग्नाच्या आमंत्रणावर विचारल्यावर मात्र त्याचा संबंध राजकीय पद्धतीनं जोडून पाहणं योग्य नाही, घरगुती कार्यक्रम आणि सुखदुःखात लोक भेटत असतात, असं ते म्हणाले.
राज ठाकरेंसमोर पर्याय काय?
मनसेची काँग्रेस बरोबर आघाडी होऊ शकत नाही, पण ते राष्ट्रवादी बरोबर जातील. नाशिक आणि ईशान्य मुंबईत मनसेचा मोठा मतदार आहे. पण यावर काँग्रेस कशी रिअॅक्ट होईल ते माहिती नाही, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं.
"राष्ट्रवादीबरोबर जाऊन मनसे फक्त दोनच जागा लढवणार असेल तर काँग्रेस काही करणार नाही. पण 2 जागा घेऊन त्यांनी जर काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले तर काँग्रेस या दोन्ही मतदारसंघात न्यूट्रल राहणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये युती किंवा आघाडी नाही पण अॅडजेस्टमेंट होऊ शकते," असं देशपांडे सांगतात.
त्याचवेळी नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच नाव पुढे येत आहे. त्यांना उमेदवारी दिली तर पाठिंबा देण्याचं सुतोवाच प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
त्यावर अभय देशपांडे सांगतात, "ओबीसी लीडर म्हणून राष्ट्रवादीला भुजबळांना प्रोजेक्ट करावं लागेल, त्यासाठी राष्ट्रवादीला त्यांना उमेदवारी द्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांनी ती फार गांभीर्यानं घेतली आहे. त्यासाठीच फारसा रस नसलेल्या माजी मंत्र्यांना पक्ष लोकसभेसाठी उतरवण्याच्या तयारीत आहे. पण तरीसुद्धा मनसे राष्ट्रवादीत पॅक्ट झाला तर भुजबळांना कुठलीतरी दुसरी मोठी जबाबदारी दिली जाईल."
तुलनेनं मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मनसेसाठी सोडणं सोपं जाईल असं अभय देशपांडे यांना वाटतं. "मुंबईत राष्ट्रवादीला पाय रोवता आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना इथली जागा मनसेला सोडून नाशिकमध्ये त्याचा फायदा करून घेता येईल, असं राष्ट्रवादीला वाटू शकतं."
पण याचवेळी अभय देशपांडे एक तिसरी शक्यता बोलून दाखवतात.
"1978च्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूकच लढवली नव्हती, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेव्हा त्यांनी घोषित आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आता मात्र राज ठाकरे अघोषित आणीबाणीच्या विरोधात काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात."
अर्थात मनसेची ही सर्व गणितं भाजप-शिवसेना युतीनुसार बदलतील. युतीच्या निर्णयानंतरच मनसे कॉल घेईल असं काही राजकीय विश्लेषकांना वाटतं.
पण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक मात्र ही शक्यताच खोडून काढतात.
"या चर्चांमध्ये काही तथ्य नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत हा निर्णय झाला आहे की, मनसेला बरोबर घ्यायचं नाही. त्यामुळे असा कुठला प्रश्नच येत नाही," असं मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, "आम्हाला 2019 च्या निवडणुकीत मित्रपक्षांची गरज आहे. पण ते समविचारी मित्रपक्ष हवेत. मनसेची वैचारीक भूमिका आणि राष्ट्रवादीची भूमिका यात अंतर आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी युती करावी असं वाटत नाही किंवा आमची तशी चर्चाही सुरु नाही."
अर्थात राज ठाकरे जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले तर मुंबईत शिवसेनेच्या मराठी मतांना धक्का बसेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना विचारलं असता, "काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेच्या आघाडीची आधी घोषणा होऊ द्या मग आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ. याआधी त्यांनी सगळीकडे प्रयत्न करुन झाले आहेत. आता ते राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. बघू काय होतं." असं म्हणून त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)