You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे-शरद पवार भेटीनंतर राज्यात नवी आघाडी तयार होणार?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी 3 डिसेंबरला स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीनं रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा करत त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार असल्याचं म्हटलं होतं.
याच दरम्यान राणे-पवार भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते आणि नारायण राणे यांनी फोनवरून घरी येण्याचे निमंत्रण दिले, म्हणून भेटायला गेलो, असं शरद पवार भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
तर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना, "ही भेट पूर्णपणे कौंटुबिक होती, त्यामागे कुठलंही राजकारण नाही," असं म्हटलं आहे.
अशातच कणकवलीमध्ये भाजपचे स्थानिक नेते संदेश पारकर आणि स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी जोरदार हाणामारी झाली.
"महाविद्यालयातील तरुणांच्या वादातून याला सुरुवात झाली. या घटनेमुळे कणकवलीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत," अशी माहिती स्थानिक पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
या घटनेबाबात विचारलं असता नितेश राणे यांनी ते सध्या कणकवलीमध्ये नसल्याने मला घटनेची फारशी माहिती नाही, असं म्हणाले.
पण राजकीय विश्लेषक आणि स्थानिक पत्रकार मात्र या दोन्ही घटनांकडे पूर्णपणे राजकीय चष्म्यातून पाहत आहेत.
राजकीय विश्लेषक आशिष जाधव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "शरद पवार यांची कुठलीही भेट ही राजकीयच असते. पवार कधीच विनाकारण कुणाला आवताण देत नाहीत आणि कुणाचं आवताण स्वीकारत नाहीत. एकाच वेळी राणे आणि पवार कणकवलीत असणं हा काही निव्वळ योगायोग नाही.
"अगामी आघाडीच्या राजकारणाची ही कवायत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जागावाटपाची बोलणी खोळंबलेली असताना ही भेट झाली आहे. काँग्रेसशी न पटणाऱ्या पक्षांना किंवा नेत्यांना शरद पवारांच्या माध्यमातून आघाडीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यात राणे किंवा आंध्रच्या YSR रेड्डींचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्यांचा समावेश आहे. ही भेट त्याचाच हा भाग असावी," असं ते पुढे म्हणाले.
"राष्ट्रवादीबरोबर युती करून राणेंच्या स्वाभिमान पक्षाला महाआघाडीत आणलं जाऊ शकतं. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही लोकसभेची आणि कणकवली ही विधानसभेची जागा राणेंच्या पक्षाला सोडली जाऊ शकते," असं भाकित त्यांनी वर्तवलं.
नारायण राणे राष्ट्रवादीत येण्याची शक्यता नाही, पण राणे भाजपबरोबर खूश आहेत, असं म्हणणं धाडसाचं होईल, असं आशिष जाधव यांनी पुढे सांगितलं.
ABP माझासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काम करणारे स्थानिक पत्रकार सचिन देसाई हेसुद्धा या भेटीचं असंच काहीसं विश्लेषण करतात. त्यांच्यामते ही कोकणातल्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे.
"शरद पवार यांनी सांगितलं असलं की ही राजकीय भेट नव्हती तरी ती राजकीयच होती. राणे आणि पवार भेटीमुळे कोकणात नवी राजकीय समिकरणं तयार होत आहेत, असं मला वाटतं," देसाई यांनी बीबीसीला सांगितलं.
"नारायण राणे भाजपपासून दूर चालले आहेत. दोन्ही मुलांना निवडून आणण्यासाठी राणे राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडीबहुत ताकद आहे, ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.
"बुधवारी राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांशी झालेला वाद, ही नव्या समीकरणाची सुरुवात आहे," असं देसाई म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)