You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची एन्ट्री
'देऊ शब्द तो पुरा करू'असं ब्रिद वाक्य घेऊन नारायण राणे यांचा नवा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उतरला आहे. 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आहे.
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे ध्येय आणि धोरणं जाहीर केली. पण यात कुठेही भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुठलीही टीका होताना दिसली नाही.
उलट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली.
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांची त्यांनी प्रशंसा केली आहे. तसंच बुलेट ट्रेनला राणेंनी जोरदार पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं बुलेट ट्रेन विरोधातलं वक्तव्य आपल्याला आवडलं नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
मंत्रिमंडळात सामावेश होणार का? या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी "मुख्यमंत्र्यांना विचारा," असं उत्तर दिलं. यावेळी अप्रत्यक्षपणे राणे यांनी भाजपची तळीच उचलण्याचा प्रयत्न केला.
"एनडीएमध्ये जाणार का?" या प्रश्नावर मात्र त्यांनी "आमंत्रण आलं तर जाऊ," असं सूचक उत्तर दिलं.
"भाजपमध्ये सर्व मित्र आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून सर्व मित्र, काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण सोडून सर्व मित्र, तर राष्ट्रवादीत सर्वच मित्र आहेत," असं सुद्धा राणे यांनी एका प्रश्नाचं उत्तर देतांना म्हंटलं आहे.
"भाजपविरोधात रस्त्यावर उतरणार का?" या प्रश्नाचं उत्तर थेटपणे देण्याचं त्यांनी टाळलं आहे. भाजपवर टीका करण्यापेक्षा सल्ला आणि सूचना करण्याचं काम करेन, असं त्यांनी म्हटलं आहे.
विकासाला विरोध करणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.
पण त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी मौन बाळगलं आहे. नितेश स्वत: या पत्रकार परिषदेपासून दूर राहीले.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)