कीटकांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत, पण माशा, झुरळं वाढणार

    • Author, मॅट मॅकग्रा
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी

जगातील एकूण प्रजातींच्या 40 टक्के कीटक नाट्यमयरीत्या नष्ट होत असल्याची धक्कादायक बाब एका अभ्यासातून समोर आली आहे.

कीटकांची संख्या मोजणाऱ्या या वैज्ञानिक अभ्यासातून असं समोर आलंय की मधमाशा, मुंग्या, शेणकिडे हे सस्तन जीव, इतर पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा आठ पट जास्त वेगानं लुप्त होत आहेत. मात्र त्याच वेळी माशा आणि झुरळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कीटकांच्या झपाट्याने कमी होणाऱ्या संख्येला शेतीत कीटकनाशकांचा वाढता वापर आणि पाणी, आणि हवेत होणारं परिवर्तन जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.

पृथ्वीवर जे जीव राहतात त्यात कीटकांची संख्या मोठी आहे. ते मानवांसाठी आणि इतर प्रजातींसाठी फायदेशीर आहेत. ते पक्षी आणि इतर सस्तन प्राण्यांसाठी आहार तयार करतात. ते जगातील 75 टक्के शेती उत्पादनाच्या परागीभवनासाठी उपयोगी पडतात, म्हणजे शेतीसाठी कीटक सर्वांत जास्त महत्त्वाचे आहेत. ते जमीन स्वच्छ ठेवतात आणि शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या कीटकांना नियंत्रित करतात.

अभ्यासातून काय समोर आलंय?

गेल्या काही वर्षांपासून कीटकांच्या प्रजाती, ज्यात मधमाशा आणि इतरांचा समावेश आहे, त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विकसनशील देशांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे.

Biological Conservation नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार 13 वर्षात जगभरातील विविध भागात प्रसिद्ध झालेल्या 73 शोधनिबंधांचा अभ्यास करण्यात आला.

संशोधकांना त्यातून हे लक्षात आलं की, जगभरात कीटकांची संख्या कमी होत असल्याने पुढच्या काही दशकांमध्ये 40 टक्के कीटक कायमचे नष्ट होतील. विशेष म्हणजे कीटकांची एक तृतीयांश संख्या ही धोक्यात असल्याचं समोर आलं आहे.

सिडनी विद्यापीठाशी संबंधित मुख्य लेखक डॉ. फ्रान्सिस्को सँचेज-बायो यांनी बीबीसीला सांगितलं की, "यामागे काही मुख्य कारणं आहेत, जसं की कीटकांच्या घरांना धोका निर्माण होणं, शेतीमुळे, शहरीकरण वाढल्याने किंवा जंगलं नाहिशी झाल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे."

कीटक धोक्यात असणं किती गंभीर?

ते सांगतात की, "दुसरं मुख्य कारण म्हणजे शेतीत कीटकनाशकांचा वाढलेला वापर. प्रचंड विषारी रसायनांशी संपर्क वाढल्याने किटकांना धोका निर्माण झाला आहे.

"तिसरं कारण जैविक आहे, म्हणजे काही प्रजाती या दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथल्या तंत्राला नुकसान पोहोचवतात. आणि चौथं कारण म्हणजे जलवायू परिवर्तन, खासकरून उष्णकटिबंधीय देशांमध्ये त्याचा प्रभाव जास्त पडतो."

या अभ्यासात जर्मनीमध्ये उडणाऱ्या किटकांच्या संख्येत अचानकपणे मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी पुर्तो रिको या उष्णकटिबंधीय जंगलातही कीटकांची संख्या कमी झाली आहे. आणि त्याचा संबंध पृथ्वीच्या वाढत्या तापमानाशी जोडण्यात आला आहे."

इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, "याचे परिणाम अत्यंत गंभीर असणार आहेत."

ब्रिटनच्या बगलाईफचे मॅट शॅडो याबद्दल सांगतात की, "ही केवळ मधमाशांपुरती मर्यादित गोष्ट नाही आहे. आणि केवळ परागकणांशी किंवा आपल्याला लागणाऱ्या अन्नधान्याशीही याचा संबंध नाहीये. हे शेणकिड्यांशी संबंधित आहे, जे गहू-ज्वारीचं काड रिसायकल करण्यासाठी मदत करतात. तसंच हे प्रकरण ड्रॅगनफ्लायशीही निगडित आहे, जे नदी आणि तलावांमध्ये वाढतात.

"त्यामुळे हे स्पष्ट आहे की पृथ्वीवरचं वातावरण खराब होत आहे. हे रोखण्यासाठी जगभरातील सगळ्या लोकांनी गांभीर्यानं पावलं उचलण्याची गरज आहे, जेणेकरून हे नुकसान रोखताही येईल आणि यातून मार्गही काढता येईल."

नुकसानकारक किटकांची संख्या वाढली

कीटकांची संख्या घटल्याने आहार शृंखला प्रभावित होत आहे. पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे असे अनेक जीवांचा उदर्निवाह या कीटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे कीटक नाहीसे झाले तर त्याचा थेट परिणाम या प्रजातींच्या अस्तित्वावर होणार, अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

काही महत्त्वपूर्ण कीटक नष्ट होण्याच्या मार्गावर असले तरी काही प्रजाती मात्र बदलत्या काळानुसार आपलं अस्तित्व टिकवण्यात यशस्वी झाल्याचं दिसतायत.

ससेक्स विद्यापीठाचे प्रोफेसर डेव्ह गॉलसन सांगतात की, "पृथ्वीचं तापमान वाढल्याने वेगानं प्रजनन करणाऱ्या कीटकांची संख्या वाढणार आहे, कारण त्यांचे शत्रू असलेले कीटक जे कमी वेगानं प्रजनन करतात ते नष्ट होणार आहेत."

ते सांगतात की, काही नुकसानकारक कीटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी उपयुक्त असलेले कीटक मात्र नष्ट होणार आहेत, ज्यात मधमाशा, फुलपाखरांचाही समावेश आहे. त्यांचं म्हणणं आहे की माशा, झुरळं यासारख्या प्रजाती वाढणार आहेत, कारण बदलत्या हिशोबानुसार असे कीटक स्वत:मध्ये आवश्यक बदल करवून घेतात. आणि त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमताही अधिक आहे.

या स्थितीपासून वाचण्यासाठी काय करावं लागेल, असं विचारल्यानंतर प्रोफेसर डेव्ह सांगतात की आपल्या बाग-बगीचांमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर बंद करा आणि किटकांसाठी अनुकूल वातावरण तयार करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)