You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्क्रीनपासून लहान मुलांना दूर का ठेवलं पाहिजे जाणून घ्या...
लहान मुलांना गॅझेट्ससमोर म्हणजे स्क्रीनसमोर वेळ घालवू देणं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला खीळ घालणारं ठरू शकतं. कॅनडातील एका नामांकित संस्थेच्या 2019 सालच्या संशोधनात हे स्पष्ट झालं आहे. ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.
या संशोधनासाठी 2,500 लहान मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला. लहान मुलांनी टीव्ही, मोबाईल, व्हीडिओ गेम्स तसंच कोणत्याही स्क्रीनसमोर किती वेळ घालवतात यासंदर्भात सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
कॅनडा आणि अमेरिकेत दीड वर्ष पूर्ण होईपर्यंत लहान मुलांना कोणतंही गॅझेट वापरण्यास देऊ नये, असं तज्ज्ञांचं मत आहे.
मात्र इंग्लंडमध्ये लहान मुलांना गॅझेट वापरायला देण्यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्वं नाहीत.
या संशोधनानंतरही, गॅझेट्सचा लहान मुलांच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो हे ठोस सिद्ध झालेलं नाही असं रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थ यांनी स्पष्ट केलं आहे.
नवं संशोधन काय सांगतं?
दोन-तीन-पाच वयाची लहान मुलं कितीवेळ स्क्रीनसमोर आहे? मुलाने किती कौशल्यं आत्मसात केली आहेत? त्याचा बौद्धिक विकास किती झाला आहे? यासंदर्भात त्यांच्या आयांचं सर्वेक्षण करण्यात आलं.
स्क्रीन टाईम या संकल्पनेत टीव्ही कार्यक्रम, चित्रपट, व्हीडिओ, गेमिंग, कॉम्प्युटर, टॅब्लेट, फोन किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस यांचा समावेश आहे.
दोन वर्षांची मुलं आठवड्याला सरासरी 17 तास स्क्रीनसमोर व्यतीत करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. तिसऱ्या वर्षापर्यंत हे प्रमाण 25 तासापर्यंत जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र पाचव्या वर्षापर्यंत स्क्रीनसमोरचं प्रमाण आठवड्याला 11 तासापर्यंत कमी होतं. कारण तोपर्यंत मूल शाळेत जाऊ लागतं.
या संशोधनाचे निष्कर्ष JAMA पेडियाट्रिक्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. लहान मुलाच्या व्यक्तिमत्वात कोणतीही गुणकौशल्यं आत्मसात होण्याआधीपासूनच स्क्रीनटाइम वाढू लागतो. व्यक्तिमत्व विकास मर्यादित असणारी मुलं स्क्रीनसमोर अधिक वेळ व्यतीत करतात असं नाही.
मात्र स्क्रीनसमोरचा कोणता वेळ धोकादायक ठरू शकतो हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. स्क्रीनसमोर व्यतीत होणारा वेळ आणि उशिराने होणारा व्यक्तिमत्व विकास या केवळ दोनच गोष्टी एकमेकांशी संलग्न नाहीत. मुलामुलींची जडणघडण कुठे आणि कशी होते आहे आणि मुलं फुरसतीचा वेळ कसा व्यतीत करतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
संशोधकांना काय वाटतं?
लहान मुलं जेव्हा स्क्रीनसमोर असतात तेव्हा अन्य व्यवहार्य गोष्टी शिकण्याचा त्यांचा वेळ फुकट जातो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर त्यांचा सामाजिक वावर मर्यादित राहतो. त्याचवेळी त्यांचा मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंग, जॉगिंग या सगळ्या गोष्टींसाठीचा वेळही कमी होतो. गॅजेटसमोरचा वेळ कमी झाला तरच त्यांना अन्य कौशल्यं शिकण्यासाठी वेळ मिळू शकतो.
गॅजेटमुळे नेमकं किती नुकसान होतं हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी डॉ.शेरी मॅडिगन यांना मुलांनी स्क्रीनसमोर ठराविक वेळच घालवावा असं वाटतं. समोरासमोर होणारं बोलणं, संवाद याकडे त्यांनी म्हणजेच पर्यायाने पालकांनी लक्ष द्यावं.
पालकांनी लहान मुलांना सवयी लावताना काळजी घ्यायला हवी. एक वर्षापेक्षा लहान वयाची मुलं स्क्रीनसमोर प्रदीर्घ काळ घालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
किती स्क्रीन टाईम धोकादायक?
हा प्रश्न चांगला आहे मात्र त्याचं समाधानकारक उत्तर अद्याप सापडलेलं नाही. नवीन संशोधन स्क्रीनसमोर किती वेळ धोकादायक अशी शिफारस करत नाही. दोन वर्षांचं मूल दिवसाला तास म्हणजेच आठवड्याला 28 तास स्क्रीनसमोर असतात असं आयांनी सांगितलं आहे.
अमेरिकन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स संस्थेने स्क्रीन टाईमसंदर्भात निर्देशक तत्वं जाहीर केली आहेत.
दीड वर्षापेक्षा लहान मुलांनी व्हीडिओ चॅटिंगवगळता स्क्रीनच्या सान्निध्यात राहू नये.
18 ते 24 महिन्यांच्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलामुलींसाठी दर्जेदार डिजिटल कार्यक्रमांची निवड करावी. आपण काय बघतोय याचा अर्थ पालकांनी त्यांना समजावून सांगावा.
दोन ते पाच वर्षांच्या मुलामुलींनी दिवसाला केवळ तासभर स्क्रीनसमोर घालवावा.
सहापेक्षा जास्त वयाच्या मुलामुलींनी स्क्रीनसमोरचा वेळ आपला झोपेचा आणि शारीरिक हालचालींचा वेळ खात नाहीये ना याची काळजी घ्यावी.
इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थ यांनी यंदा काही निर्देशक तत्वं जाहीर केली होती.
कुटुंबांनी काही प्रश्न स्वत:ला विचारावेत
- तुमच्या घरात मुलं जेवढा वेळ कोणत्याही स्क्रीनसमोर असतात, त्या वेळेवर नियंत्रण असतं का?
- तुम्हाला जे काही करायचं असतं त्यात स्क्रीनसमोरचा वेळ अडसर ठरतो का?
- तुमच्या झोपेत स्क्रीनसमोरचा वेळ अडथळा आणतो का?
- स्क्रीनसमोर असताना तुम्ही खातापिता का?
एखाद्या कुटुंबाने हे प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं समाधानकारक असतील तर ते योग्य दिशेने वाटचाल करत आहेत असं मानावं असं रॉयल पेडियाट्रिक्स संस्थेनं म्हटलं आहे.
स्क्रीनसमोरचा वेळ कमी करण्यासाठी काही युक्त्या
अमेरिकन संस्थेनं कोणत्याही स्वरुपाच्या मीडियापासून थोडा वेळ तरी दूर राहा असं सुचवलं आहे. एकत्र जेवण असेल किंवा लाँग ड्राईव्ह असेल.
पालकांनी आपण किती स्क्रीनसमोर राहायचं यासंदर्भात काहीतरी ठरवून घ्यायला हवं.
मुलांना शांत झोप लागावी यासाठी झोपण्याच्या आधी तासभर कोणत्याही स्क्रीनपासून दूर राहायला हवं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
स्क्रीन टाईमचे नेमके धोके जाणून घेण्यासाठी आम्हाला आणखी संशोधनाची गरज आहे. मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम किती होतो हेही हळूहळू स्पष्ट होईल. स्क्रीन वापरण्याचे काही फायदेही आहेत. तेही समजून घेणं आवश्यक आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)