मोगली जेव्हा परत येतो... : जंगल बुक नेटफ्लिक्सवर

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

90च्या दशकात बालपण घालवलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी लहानपणी रविवारची सकाळ हवीहवीशी असायची. शाळेला सुटी असतानाही सकाळी तयार होऊन टीव्हीसमोर बसण्याची जणू अघोषित स्पर्धा असायची. कारण 'रंगोली' संपलं की घड्याळाकडे डोळे लागलेले असायचे.

सकाळी 9 वाजले की ज्यांच्याकडे टीव्ही असायचा त्या घरातून 'जंगल जंगल बात चली है, पता चला है...'चे स्वर ऐकू यायचे. 'जंगल बुक' सुरू झालेलं असायचं. मोगली आपला पंजा (बूमरँग) घेऊन जंगलातल्या शत्रूंशी लढायला निघालेला असायचा आणि तमाम बच्चे कंपनी सगळं काही विसरून टीव्ही समोर ठाण मांडून बसलेले असायचे.

सुरुवातीला केबल सगळ्या घरात नव्हतं. करमणुकीचीही फारशी साधनं नव्हती. त्यामुळे टीव्हीवर एकच चॅनेल आणि तेच कार्यक्रम वारंवार पाहणं इतकाच पर्याय लोकांकडे असायचा. पण दूरदर्शनवर येणाऱ्या 'जंगल बुक'च्या त्या अर्ध्या तासासाठी बच्चे कंपनी आठवडाभर आसुसलेली असायची.

तेवढ्या वेळात त्यांचं आयुष्य त्या जंगलात, मोगली, त्याचे जंगलातील प्राणिमित्र यांच्याभोवती रमायचं. अनेकांनी वह्यांचा खरडा कापून त्याचा पंजा करण्याचा प्रयत्न केल्यांचंही लख्ख आठवतंय. पण तो पंजा अर्थातच कधी परत नाही यायचा. त्यामुळे असे अनेक खरडे खर्ची पडून आईवडिलांचा मार खाल्लेले माझे मित्र आहेत.

चड्डी पहनके फुल खिला है

रुड्यार्ड किपलिंग यांच्या पुस्तकावर आधारित या मालिकेची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे या गाण्याचं टायटल साँग. गुलजार यांच्या लेखणीतून आलेल्या याच गाण्यात पुढे एक ओळ होती - 'एक परिंदा होय शरमिंदा, था वो नंगा, भाई इससे तो अंडे के अंदर था वो चंगा..." अशा शब्दात ते मोगलीच्या अवस्थेचं यथार्थ वर्णन करतात.

या गाण्याला चाल देणारे संगीतकार आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्या वेळची कथा एका कार्यक्रमात सांगितली होती -

"1992चं वर्षं असावं. मी तेव्हा नुकताच दिल्लीहून मुंबईला आलो होतो. मी तेव्हा स्ट्रगल करत होतो. हे गाणं म्हणजे मला मिळालेली एक मोठी संधी होती. अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे या मालिकेची निर्मिती होत होती. हे गाणं दुसऱ्या एका व्यक्तीला मिळालं होतं. शेवटच्या क्षणी त्याने माघार घेतली. गुलजार साहेबांनी मला फोन केला आणि सांगितलं की आपल्याला एक गाणं करायचंय आणि ते उद्याच रेकॉर्ड करायचं आहे, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी ते प्रसारित होणार आहे."

"रविवारची सकाळ होती आणि मी त्यांच्या घरी गेलो. त्यांना काही धून वाजवून दाखवल्या आणि त्यांनी लगेच 'चड्डी पहनके फुल खिला है' या ओळी त्यांना स्फूरल्या. आम्ही गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं प्रचंड हिट झालं.

भारद्वाज पुढे सांगतात, "गुलजार साहेबांबरोबर हे माझं पहिलंच गाणं होतं. मला आठवतं की 26 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात 'चड्डी पहन के फुल खिला है...' गाण्याची झाकीसुद्धा होती. इतकं हे गाणं यशस्वी झालं."

पुढच्या जागेसाठी धडपड

त्या काळात आजच्यासारखे सर्वांच्या घरी टीव्ही नसायचे. त्यामुळे ज्यांच्याकडे टीव्ही होते, त्यांना मोठं महत्त्व होतं. त्यांच्याकडे गोळा होऊन मग एकत्र मोगलीला पाहणं, हा रविवारचा बेत असायचा.

नेमक्या याच आठवणीबद्दल कलाकार पूजा गुंड सांगतात, "कुणा एकाकडेच TV असायचा. त्याच्यामुळे सगळ्यात आधी पुढची जागा मिळावी म्हणून धडपड असायची. एकदा सीरियल सुरू झालं की वीज जाऊ नये, अशी प्रार्थना करायचो. टायटल साँगसुद्धा मिस होऊ नये म्हणून आम्ही अगदी डबे वगैरे घेऊन बसायचो."

अख्खा रविवार टीव्ही समोर

बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे लहानपणीच्या आठवणीत रमतात - "मी आणि माझा भाऊ विशाल शाळेत जाताना लवकर उठायचो नाही. मात्र रविवारी आम्ही हमखास लवकर उठायचो. त्यामुळे का होईना अँटिना कसा लावायचा, ते आम्ही शिकलो."

"आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. आमच्या काही मित्रमैत्रिणींकडे कलर टीव्ही होते. सुटीच्या काळात आम्ही तिथे जायचो आणि जास्त उत्सुकतेने जंगल बुक बघायचो," त्या सांगतात.

खराखुरा शेरखान

सध्या दिल्लीत राहणारे संकेत पारधी म्हणतात, "आमचं गाव जंगलाने वेढलेलं होतं आणि त्यावेळी एका नरभक्षक वाघाने परिसरात धुमाकूळ घातला होता. 'जंगल बुक'च्या शेरखानची आम्हाला अशी खरीखुरी दहशत बसली होती. पोरांनी एकटं रानाकडे जाऊ नये म्हणून शेरखानची भीती घातली जायची."

"मोगलीच्या हातातला बूमरँग बनवण्यात लाकडाचे कितीतरी तुकडे खर्च झाले, पण बनवू शकलो नाही. आम्ही त्या बूमरँगने नरभक्षक शेरखानला मारायची योजना बनवत होतो," अशीही गंमतशीर आठवण ते सांगतात.

"काही दिवसांनी त्या वाघाला जेरबंद करून वनविभागाच्या विश्रामगृहात आणले तेव्हा आम्ही पोरं 'अबे शेरखानले धरला' म्हणत वाघाला पाहायला धावत तिकडे गेलो होतो," अशी आठवण ते सांगतात.

दर रविवारी अंघोळ करून तयार होऊन टीव्हीसमोर बसायचो, अशी लहानपणीची आठवण पत्रकार रश्मी पुराणिक सांगतात. "जंगल बुक सुरू असताना पेपरमध्ये एकदा जाहिरात आली होती. ते कुपन कापून, त्यात आपली जन्मतारीख आणि इतर माहिती लिहून पाठवायची होती. मग मला माझ्या वाढदिवसाला मोगली, बगिरा असे सगळे पात्र प्रिंट असलेलं ग्रीटिंग आलं होतं. मी खूप खूश होते... मला एकदम स्पेशल वाटलं."

मोगलीच्या बदल्यात छोटी मोठी कामं

रविवारी ही मालिका पाहण्याच्या बदल्यात त्यांची आई आठवडाभर काम करून घ्यायची अशी आठवण पत्रकार राहुल झोरी यांनी सांगितली. ही कामं आणि इतर अभ्यास करत कधी एकदाचा रविवार येतोय, याची वाट ते पहायचे.

"लहानपणी रविवार म्हणजे आज मिळणाऱ्या दोन आठवडी सुट्यांसारखी वाटत असे," असंही त्यांना वाटतं.

2016मध्ये वॉल्ट डिस्ने स्टुडिओजने या रम्य मालिकेला एका सिनेमाच्या रूपात पुन्हा आणलं आणि लोक बालपणाच्या आठवणीत पुन्हा रमले. नव्या अॅनिमेशन तंत्रज्ञानामुळे याची मजा वेगळीच होती. एवढंच नव्हे, 'जंगल जंगल बात चली है,' या गाण्याचीही पुनर्निमिती करण्यात आली.

आता या 'जंगल बुक'चा नेटफ्लिक्सवर आलाय. त्यामुळे मोगली, बलू, बागा, बगिरा, शेरखान, यांच्यासारखे अनेक पात्रं आणि असंख्य आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)