You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या हातचे मासे माधुरीला खूप आवडले' - वंदना गुप्ते
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बॉलिवुडच नव्हे तर लाखो हृदयांवर अनेक वर्षं अधिराज्य गाजवणाऱ्या 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून ती पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. मराठी मुलगी अखेर हिंदी चित्रनगरी गाजवून मराठीत येतेय, याचा अनेकांना आनंद आहे. आणि तिच्याबरोबर काम करताना तिच्या सहकलाकारांनाही काही नवीन अनुभव आले.
'बकेट लिस्ट'चे दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणाले, "माधुरीबरोबर काम करणं हा अतिशय सुंदर अनुभव होता. आपण खूप मोठे कुणीतरी आहोत, असा आव तिच्या वागण्यात कधीच नसायचा. महत्त्वाचं म्हणजे ती प्रत्येक सीनसाठी एकदम तयारीने यायची. हा गुण अतिशय अभावाने आढळतो आणि त्याची दिग्दर्शकाला सगळ्यांत जास्त मदत होते. तिच्या सेटवर असण्याचा एक सकारात्मक दबाव असायचा."
तेजस पुढे सांगतात, "आमचं प्रोजेक्ट सुरू झालं त्याच्या आदल्या दिवशी मुंबईत एक मोठं वादळ आलं. त्यात आमचा सेट वाहून गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय होणार, याची मला प्रचंड धाकधूक होती."
"आपण उद्या शूटिंग करणार की नाही, याची चौकशी करण्यासाठी माधुरीचा मला फोन आला. कोणत्याही परिस्थितीत आपण शूटिंग करणारच, अशी त्यांना ग्वाही दिली. थोड्या वेळाने तिचा मेसेज आला - 'आता वादळ येणार पण ते बॉक्स ऑफिसवर'. तेव्हा मला शूटिंग करण्याचा आणखी हुरूप आला."
'एक नितांत सुंदर अनुभव'
माधुरीबरोबर काम करण्याचा अनुभव नितांत सुंदर असल्याची भावना अभिनेता सुमित राघवन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.
"मी याआधी सुद्धा तिच्याबरोबर काम केलं आहे. मी जेव्हा अगदी पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा मी इतक्या मोठ्या कलाकाराला भेटतोय असं वाटलंच नाही. तिच्या स्माईलचे सगळे लोक दिवाने आहेत. त्याला मी सुद्धा अपवाद नाही. माधुरीबरोबर असताना अगदी एखाद्या जवळच्या व्यक्तीला भेटतोय, असं मला वाटतं."
माधुरी दीक्षितने आपल्या वाढदिवसाला ट्वीट करणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. माधुरीसाठी ते एक साधारण ट्वीट असलं तरी माझ्यासाठी ती एक मोठी भेट असते, असं राघवन यांनी सांगितलं.
'माधुरीचं नाव ऐकताच मी होकार दिला'
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते माधुरी दीक्षित यांच्याबरोबरच्या कामाच्या अनुभवाबद्दल अगदी भरभरून बोलतात. त्या सांगतात, "बकेट लिस्ट चित्रपटासाठी जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मी सहकलाकारांबद्दल विचारलं. तेव्हा मला माधुरीचं नाव कळलं. तिचं नाव कळताच मी या भूमिकेसाठी होकार दिला. तशी आमची तोंडओळख होती, कारण तिचे आईवडील माझी नाटकं बघायला यायचे. पण एकत्र काम करण्याचा हा पहिलाच अनुभव होता."
सेटवर पहिल्यांदा भेटण्याचा अनुभवसुद्धा सुखद असल्याचं त्या सांगतात.
"मी जेव्हा सेटवर पहिल्यांदा भेटली तेव्हा हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तेव्हा तिने मला चक्क मिठी मारली, आणि मग ही पद्धतच झाली," असं वंदना गुप्ते सांगतात.
गुप्तेंना खाण्यापिण्याची भरपूर आवड असल्याने त्या सेटवर भरपूर खाण्यापिण्याचं सामान घेऊन जातात. "माझ्या हातचे मासे तिला फार आवडतात," असं वंदना गुप्ते आनंदाने सांगतात.
"मी माधुरीला अगदी तिच्या पहिल्या चित्रपटापासून पाहतेय. अभिनेत्री अनेक असल्या तरी माधुरीची गोष्टच वेगळी आहे. तिचा अभिनय कधीच खोटा वाटला नाही. अभिनयाबरोबर तिचा डान्स तितकाच उत्तम आहे. ती अतिशय परिपूर्ण अभिनेत्री आहे," असं वंदना गुप्ते यांना वाटतं.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरसुद्धा माधुरी दीक्षितचे चाहते आहेत. ते म्हणाले, "मी तिच्याबरोबर एकच दिवस काम केलं, पण तिचा सेटवरचा वावर अगदी सहज होता. एक सहकलाकार म्हणून तिच्याबरोबरचं वातावरण अतिशय सहज होतं. तिच्या असण्याचं कुठेही मला दडपण जाणवलं नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)