कर्नाटक LIVE : कौन बनेगा मुख्यमंत्री? कुमारस्वामी की येडियुरप्पा?

कर्नाटकात वेगाने राजकीय पट बदलत आहे. भाजप बहुमताच्या जवळ पोहोचेल अशी शक्यता दिसत असतानाच 'कहानी में ट्विस्ट' आला. बहुमतासाठी 112 जागांची आवश्यकता असताना भाजपची गाडी 104 वरच अडकली.

त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांच्या गोटात घडामोडींना वेग आला. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा जाहीर केला. संध्याकाळी भाजप आणि काँग्रेस-JDS अशा दोन्ही बाजूंनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.

आता बॉल राज्यपाल वजुभाई वाला यांच्या कोर्टात आहे.

रात्री 8 - बेळगावमध्ये तोडफोड

निवडणुकीच्या निकालानंतर बेळगावच्या फुलबाग गल्लीत दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचा प्रकार घडला आहे. भाजपचे विजयी उमेदवार अनिल बेंडके यांच्या मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे.

पराभूत उमेदवार फिरोज सेठ आणि बेंडकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि दगडफेक झाली. पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक झाली. त्यानंतर पोलीसानी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.

संध्याकाळ 7 - मोदींनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून कानडी जनतेचे आभार मानले आहेत.

संध्याकाळी 6 - काँग्रेस-JDSचा सरकार स्थापनेचा दावा

काँग्रेस आणि JDSच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला. दोन्ही पक्षांकडे मिळून 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कर्नाटकातल्या परिस्थितीचं विश्लेषण करणारं बीबीसी मराठीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही इथे पाहू शकता.

संध्याकाळी 5.32 - काँग्रेस नेते राजभवनात

काँग्रेसचे नेते राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत.

संध्याकाळी 5.30 - कुमारस्वामी राज्यपालांच्या भेटीला

भाजप नेते येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर JDS चे कुमारस्वामी आता राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहेत. येडियुरप्पा यांनी सत्ता स्थापनेसाठी आठ दिवसांचा अवधी राज्यपालांकडे मागितला आहे.

संध्याकाळी 5 - भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा

येडियुरप्पा सत्ता स्थापनेचा दावा करणार, राज्यपालांची भेट घेणार. भाजप ठरला आहे सर्वांत मोठा पक्ष.

दुपारी 4.40 - दोन अपक्षांचा काँग्रेसला पाठिंबा

दोन अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा असल्याचा काँग्रेस नेते शिवकुमार यांचा दावा.

दुपारी 4.24 - JDSचं राज्यपालांना पत्र

JDSचे नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांना पत्र लिहून साडेपाच वाजता भेटीसाठी वेळ मागितली. आपण काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

दुपारी 4.11 - येडियुरप्पा यांचा काँग्रेसवर आरोप

"काँग्रेसला लोकांनी नाकारलं आहे तरी ते मागच्या दारानं सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. कानडी जनता हे खपवून घेणार नाही," असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसंच युतीबाबात अमित शाह आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दुपारी 3.43 - कुमारस्वामी होणार मुख्यमंत्री?

संध्याकाळी साडे 5 वाजता जेडीएसचे नेते राज्यपालांना भेटणार. जेडीएस प्रवक्ते तनवीर हसन यांनी दावा केला आहे की 18 मेला कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

सर्व निकाल हाती आल्यानंतर प्रतिक्रिया देईन, आतापर्यंत आम्ही आघाडीवर आहोत, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मी तुम्हाला कळवेन, असं बंगळुरूत पत्रकारांशी येडियुरप्पा बोलत होते.

दुपारी 3.10 - उलटसुलट प्रतिक्रिया

काँग्रेस आणि जेडीएस यांच्या सोबत येण्याबद्दल विविध प्रतिक्रिया येत आहेत. पत्रकार सागरिका घोष लिहितात की भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला आधी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळायला पाहिजे.

तर पत्रकार बरखा दत्त लिहितात की अजूनही जेडीएसमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा आमदारांना रिसॉर्टमध्ये बंद केलं जाऊ शकतं, असंही त्या लिहितात.

दुपारी 3.01 - कहानी में ट्विस्ट

कर्नाटकात भाजपची सत्ता येणार, अशी चिन्हं दिसत असतानाच एकाएकी चित्र बदललं. भाजपला पूर्ण बहुमत मिळत नाही, असं दिसताच काँग्रेस आणि भाजप नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा जाहीर केला. आज संध्याकाळी आम्ही राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करू, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

दुपारी 2.30 - 'EVM नाही, बॅलटने मतदान घेऊन दाखवा'

"एकदा तरी भाजपला EVM ऐवजी बॅलट पेपरने मतदान घेऊन दाखवा, म्हणजे सगळ्यांच्या शंकांचं निरसन होईल," असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलं आहे.

दुपारी 2.05 - युतीची समीकरणं

एकीकडे भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येत असतानाच अशीही चर्चा होत आहे की काँग्रेस JD(S)सोबत युती करून सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. अशाच आशयाचं ट्वीट ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी केलं आहे.

काँग्रेस आणि JD(S) युती करून सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. काँग्रेस JD(S)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ शकतं, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दुपारी 1.45 - निकालाचा अर्थ काय?

बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर बोलत आहेत कर्नाटकात जाऊन आलेल्या तीन पत्रकारांसोबत - पार्थ MN, अभिजित ब्रम्हनाथकर आणि अर्चना शुक्ला.

दुपारी 1.30 - सिद्धरामय्या पराभूत

मावळते मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी मतदारसंघातून JD(S)च्या जी. टी. देवेगौडा यांनी पराभव केला आहे. पण बदामी मतदारसंघातून मात्र ते आघाडीवर आहेत.

यंदा सिद्धरामय्या यांनी वरुणा हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. चामुंडेश्वरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. जी.टी. देवेगौडा हे सिद्धरामय्या यांचे जुने सहकारी आणि मित्र आहेत.

दुपारी 1.14 - एक्झिट पोलची पोलखोल?

तीन एक्झिट पोल्सनी अंदाज व्यक्त केला होता की भाजप जिंकेल, तर काँग्रेसच्या विजयाचं दोन पोल्सनी भाकीत व्यक्त केलं होतं.

दुपारी 1.01 - राज ठाकरे म्हणतात...

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय की हा EVM मशीनचा विजय आहे.

दुपारी 12.50 - पुण्यात ढोल

कर्नाटकातला विजय महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिकळ यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आनंद साजरा केला.

दुपारी 12.19 - बेळगावात समितीची पिछेहाट

बेळगाव शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट होत आहे. एकीकरण समितीने 4 जागा लढवल्या होत्या, पण समितीत फूट पडल्यामुळे मतं विभागली जातील, अशी भीती व्यक्त होत होती.

दुपारी 12.10 - भाजप कार्यालयात जल्लोष

भाजप आत्त 111 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 112 जागा हव्या आहेत. काँग्रेस 66 तर जेडीएस 38 जागांवर पुढे आहे. अजून सर्व जागांचे निकाल लागले नसले तरी भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरू केला आहे.

सकाळी 11.57 - काँग्रेसची चूक झाली?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिलंय की काँग्रेसने जेडीएससोबत युती केली असती तर ते विजयी ठरू शकले असते. बॅनर्जी यांनी भाजपविरोधी आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे.

सकाळी 11.54 - राहुल गांधींना प्रश्न कोण विचारणार?

काँग्रेसचा पराभव ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी अपमानास्पद गोष्ट आहे. आता तरी कोणी काँग्रेस नेता राहुल गांधींना स्पष्टपणे प्रश्न विचारू शकेल का, असा प्रश्न बंगळुरूमध्ये राहणारे इतिहासकार आणि विचारवंतर रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे.

सकाळी 11.50 - एका जागेवर महाराष्ट्र एकीकरण समिती पुढे

बेळगाव जिल्ह्यातील एकूण 18 जागांपैकी 10 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे तर एका जागेवर महाराष्ट्र एकीकरण समिती आघाडीवर. खानापूर मतदारसंघातून समितीचे अरविंद पाटील आघाडीवर आहेत. समितीच्या दळवी गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे.

सकाळी 11.24 - बीबीसीच्या न्यूजरूममध्ये...

कर्नाटक म्हटलं म्हणजे झकास आणि कडक कॉफी घोट... म्हणून आम्ही सोशल मीडियावर कॉफीच्या बियांमधून आकडे सांगत आहोत. त्याची एकच गडबड इथे न्यूजरूममध्ये सुरू आहे.

सकाळी 11.06 - सिद्धरामय्या पिछाडीवर

काँग्रेस नेते आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तिथे जेडीएसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

सकाळी 11.06 - भाजपला बहुमत मिळणार

निवडणूक आयोगाने दिलेल्या आघाड्यांनुसार भाजपला बहुमत मिळालं आहे. भाजपने 114 जागांवर आघाडी मिळवली आहे. बहुमताचा आकडा 112 आहे.

सकाळी 10.36 - चुरस शिगेला

भाजपला बहुमत मिळणार की जेडीएस काँग्रेससोबत जाणार? निकालांची कमालीची उत्सुकता. आमचे बंगळुरूमधले रिपोर्टर नितीन श्रीवस्तव यांनी पाठवलेला त्यांच्या ड्रायव्हरचा फोटो. गाडी चालवताना ते निकाल पाहात आणि ऐकत आहेत.

सकाळी 10.30 - भाजपची सेंच्युरी

भाजप 100 जागांवर पुढे आहे तर काँग्रेस 52. संयुक्त जनता दल (JDS) 37 जागांवर पुढे आहे. आता भाजपला जेडीएसची गजर भासणार नाही, असं पत्रकार बरखा दत्त म्हणत आहेत.

सकाळी 10.06 - भाजपचा जल्लोष

आघाडीची बातमी येत असतानाच भाजपच्या बेंगळुरूच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष.

भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं की, "ग्रामीण कर्नाटकमध्ये खूप चांगलं काम झालं आहे, आणि याचा परिणाम आता दिसतोय."

सकाळी 9.56 - 'युती नाही'

आघाडी मिळत असतानाच भाजप नेते सदानंद गौडा यांचं ANI ला स्पष्टीकरण - "जनता दल (सेक्युलर)बरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही तसंही 112 हा बहुमताचा आकडा पार करतोय."

सकाळी 9.51 - बेळगावात 'समिती' मागे

बेळगावात भाजपला दोन जागांवर आघाडी, काँग्रेस एका जागेवर पुढे. महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर आहे.

सकाळी 9.26:

भाजप काँग्रेसपेक्षा दुपटीने पुढे जात आहे.

सकाळी 9.15:

निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कलांनुसार भाजप काँग्रेसच्या पुढे जात आहे.

सकाळी 9.05:

बेळगावात पोस्टल बॅलेटच्या मोजणीला सुरुवात झाली आहे, असं आमचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर कळवतात.

बेळगावातल्या बातम्या इथे पाहू शकता:

सकाळी 8.59:

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार BS येडियुरप्पा यांनी देवाला साकडं घातलं.

सकाळी 8.45:

दूरदर्शनवर दाखवलेल्या आकड्यांनुसार भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस रंगली आहे.

सकाळी 8.00:

मतमोजणीला सुरुवात. कर्नाटकमध्ये 38 ठिकाणी 283 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. आधी टपाल मतपत्रिकांची मोजणी होत आहे.

सकाळी 7.58:

बंगळुरूतले पत्रकार डी.पी. सतीश यांनी ट्वीट केलाय की कानडी लोकांची राजकीय निवड बदलेल, पण खानपान बदलणार नाही. मतमोजणीला काही क्षणांतच होणार सुरुवात.

सकाळी 7.45:

कर्नाटकमधील 38 मतमोजणी केंद्रांवर 50,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यात 11,000 पोलीस फक्त बंगऴुरू शहरात तैनात करण्यात आले आहेत.

बंगळुरूत एक रॅपिड अॅक्शन फोर्स आणि कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या 20 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

"आम्ही मोठ्या प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सर्व मतमोजणी केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्साठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था असेल," असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ANI वृत्तसंस्थेला सांगितलं.

सकाळी 7.00:

कर्नाटकमध्ये 38 ठिकाणी 283 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.

कर्नाटक विधानसभेत 224 जागा आहेत, त्यापैकी 222 जागांसाठी 12 मेला मतदान झालं होतं. त्यापैकी 36 जागा SC तर 15 जागा ST उमेदवारांसाठी राखीव होत्या. दोन जागांसाठी मतदान 28 मेला होणार असून त्याचा निकाल 31 मे रोजी लागेल.

एका मतदारसंघात उमेदवाराचा मृत्यू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर दुसऱ्या एका ठिकाणी जवळजवळ 10,000 मतदार ओळखपत्र बेवारस सापडल्याने राज्य निवडणूक आयोगाने राजराजेश्वरी मतदारसंघातलं मतदान 28 मे रोजी घेण्याची घोषणा मतदानाच्या काही तासांआधी केली होती.

आम्ही कर्नाटकच्या रणधुमाळीवर केलेल्या बातम्या तुम्ही इथे वाचू शकता - कर्नाटकचा कानोसा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)