ब्लू व्हेल : खराखुरा गेम की आणखी काही?

    • Author, अपर्णा अल्लुरी
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारतात गेल्या काहीं दिवसांतील तरूण तसंच अल्पवयीन मुलांच्या अनेक आत्महत्यांचा संबंध 'ब्लू व्हेल चॅलेंज'शी जोडण्यात आला आहे. यामुळं भारतात भीतीचं वातावरण आहे.

या आत्महत्या आणि 'ब्लू व्हेल चॅलेंज' यांच्यातील संबंध पोलिसांना सिद्ध करता आलेला नाही. अनेक देशांतील आत्महत्यांच्या तपासांत 'ब्लू व्हेल चॅलेंज'चा उल्लेख आहे, पण 'ब्लू व्हेल चॅलेंज' सारखं काही अस्तित्वात असल्याचं अद्याप सिद्ध करता आलेलं नाही.

आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांनी ही मुलं 'ब्लू व्हेल चॅलेंज'च्या प्रभावाखाली असल्याचं वार्ताहरांना सांगितलं. पण या आरोपांना पोलिसांचा मात्र दुजोरा मिळू शकलेला नाही.

भारतीय माध्यमांतून 'ब्लू व्हेल चॅलेंज'च्या संशयित लिंकवर बरंच लिहिलं जात आहे, तर सरकारमध्ये या 'ब्लू व्हेल'शी कसा सामना करायचा, याबद्दल संभ्रम आहे.

एवढंच नाही तर 'ब्लू व्हेल चॅलेंज'वर बंदी घालावी, या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

देशातील काही उच्च न्यायालयं, राज्यं आणि प्रशासनं यांनी 'ब्लू व्हेल'वर बंदीची घोषणा केली आहे. पण या बंदीची अंमलबजावणी कशी होणार, याचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.

दरम्यान केंद्र सरकारनं 'ब्लू व्हेल'कडे नेणाऱ्या सर्व लिंक काढून टाकण्याच्या सूचना फेसबूक, व्हॉटसअप, गूगल, इन्स्टाग्राम यांना केली आहे.

तर दुसरीकडे शाळांनीही 'ब्लू व्हेल चॅलेंज'च्या धोक्याबद्दल विद्यार्थ्यांना सतर्क करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात स्मार्ट फोन आणण्यास बंदी केली आहे.

तर 'ब्लू व्हेल चॅलेंज'मध्ये विद्यार्थी सहभागी असल्यास ते कळण्यासाठी त्यांच्या हातवर 'ब्लू व्हेल'चा टॅटू आहे का नाही, याची खात्री करता यावी, यासाठी पंजाबमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना हाफ शर्ट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे.

तर इंटरनेट तज्ज्ञांना 'ब्लू व्हेल चॅलेंज' बनाव असावा, असा संशय आहे. 'द युके सेफर इंटरनेट सेंटर'नं 'ब्लू व्हेल चॅलेंज' म्हणजे 'सनसनाटी फेक न्यूज' असल्याचं म्हटलं आहे.

ब्लू व्हेल आहे तरी काय?

'ब्लू व्हेल गेम'च्या निर्मितीबद्दल शंका आहेत. काही ब्लू व्हेल हे मासे स्वतः समुद्रकिनाऱ्यावर येतात आणि नंतर मरतात. यावरून याला 'ब्लू व्हेल चॅलेंज' हे नाव दिलं असावं, असं सांगितलं जातं.

वरवर पाहता काही संशयित ऑनलाईन दबाव गटांनी 'ब्लू व्हेल' नाव धारण केलं आहे. हा गट या चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्यांना एक क्युरेटर नेमून देतो. हा क्युरेटर या चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध कृत्य करण्यास सांगतो. ती 50 दिवसांत पूर्ण करायची असतात.

कथितपणे ही कृत्ये सुरुवातीला साधी सरळ असतात. नंतर ती भयपट पाहण्यास सांगणं किंवा त्यापेक्षा भयानक कृती करण्यास सांगणं, अगदी आत्महत्या करण्यासाठी सांगणं, अशी वाढत जातात.

मनावर विपरित परिणाम करणाऱ्या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये ओढलं जाणं, हे पौगंडावस्थेतील मुलांच्याबाबतीत अगदीच नवीन नाही.

'ब्लू व्हेल'शी संबंधित ऑनलाईन ग्रुपमध्ये हजारो सदस्य असून फेसबूक आणि युट्यूबवर हजारो सबस्क्राईबर आहेत.

'ब्लू व्हेल' नाव चर्चेत आलेल्या देशांत रशिया, युक्रेन, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे.

आत्महत्यांशी संबंध नाही?

आत्महत्या आणि ब्लू व्हेल चॅलेंज यांचा संबंध जोडणारी पहिली बातमी अविश्वासार्ह ठरवण्यात आली आहे. यातील सोशल नेटवर्किंग साईट 'व्होकान्टके'वर 'ब्लू व्हेल चॅलेंज' सर्वात प्रथम आल्याचं सांगितलं जातं. पण 'ब्लू व्हेल चॅलेंज'चे हॅशटॅग हे हजारो बॉटमधून येत असल्याचे लक्षात आलं आहे.

'ब्लू व्हेल'शी संबंधित आत्महत्यांच्या बातम्या दररोज येत असताना, शाळा मात्र धोका पत्करू इच्छित नाहीत.

पंजाबमधील स्प्रिंग डेल स्कूलचे प्राचार्य राजीव शर्मांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. ''माझ्या मते हे ड्रग्जसारखं आहे. पहिली पायरी म्हणजे ते घेऊच नये. आयुष्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही,'' असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

प्राचार्य शर्मा यांनी ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यातील एक विद्यार्थी शिवराम राय लुथरा या विद्यार्थ्याने 'बीबीसी हिंदी'शी बोलताना त्याला फारच भीती वाटत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, 'तुम्ही सर्च तर सोडाच त्याचा विचारसुद्धा करू नका.'

पण, सर्वांनाच हे पटलेलं नाही. इंटरनेट तज्ज्ञ सुनील अब्राहम म्हणाले, ''ज्या शाळा 'ब्लू व्हेल' संदर्भात सेशन्स घेत आहेत, त्या 'ब्लू व्हेल'ची जाहिरातच करत आहेत. फक्त 'ब्लू व्हेल'च का? ऑनलाईन दादागिरी, 'सेक्स्टिंग' हे सुद्धा इंटरनेटवरील काळजीचे विषय आहेत.''

खरेतर आपण नैतिक घबराटीच्या स्थितीतून जात आहोत. त्यामुळे त्याला आपला प्रतिसाद असतो तो मूल्य शिक्षणाचा. पण, यातून मूळ प्रश्नाशी आपण जात नाही. हा मूळ प्रश्न आहे, तो म्हणजे लोक आत्महत्या का करतात?''

2012 मध्ये झालेल्या एका अभ्यासातून आत्महत्या, हे भारतीय तरुणांच्या मृत्यूमागील मोठं कारण असल्याचे म्हटलं आहे. पण 'ब्लू व्हेल'शी संबंधित आत्महत्यांबद्दल मात्र फारशी माहिती नाही.

आत्महत्या केलेल्यांनी त्यांच्या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये 'ब्लूव्हेल'चा केलेला उल्लेख, आत्महत्या करण्यापूर्वीचे काही दिवस त्यांचं सतत मोबाईलला चिकटून असणं, अशा काही बाबींचा उल्लेख केला जातो.

तंत्रज्ञानावर लिहिणाऱ्या लेखिका माला भार्गव म्हणाल्या, 'या मुलांचा इतिहास कुणीच पाहत नाही. फक्त अंदाज व्यक्त करण्याशिवाय आपण काही करत नाही.'

दिल्लीतील मानोविकार तज्ज्ञ डॉ. अचल भगत 'बीबीसी'शी बोलताना म्हणाले, ''मी बऱ्याच तरुणांशी दररोज बोलतो. पण मी 'ब्लू व्हेल'ची एकही केस ऐकलेली नाही. ''लोक आपले अनुभव सांगताना अतिशयोक्ती करत असता. म्हणून काही मूलं ते 'ब्लू व्हेल चॅलेंज'मध्ये भाग घेतल्याचं सांगतात, पण ब्लू व्हेल चॅलेंजच्या अस्तित्वाचे काहीच पुरावे नाहीत.''

मुलांचं मानसिक आरोग्य हा सर्वात दुर्लक्षित असल्याचं त्यांनी सांगितले. ''मुलांचं मानसिक आरोग्य कसं सुधारायचं, आत्महत्या कशा रोखायच्या, याचा कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम नाहीच, अगदी मार्गदर्शक तत्त्वंही नाहीत,'' असं ते म्हणाले.

''दररोज मुलांशी संवाद कसा साधायचा, हेच आपल्याला माहीत नाही. अशा स्थितीत संकट काळात मुलांशी कसं बोलणार? काय करू नये हे सांगण्यापेक्षा, खरी गरज आहे ती मुलांचं ऐेकण्याची,'' असे ते म्हणाले.

(रवींद्र सिंग रॉबिन यांनी पाठवलेल्या तपशीलासह)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)