10 Year Challenge: टर्कीच्या तरुणींनी सांगितली हिजाब नाकारण्याची गोष्ट

जगभरात प्रचंड व्हायरल होत असलेल्या #10YearChallenge मुळं प्रत्येकालाच आपलं आयुष्य थोडंसं रिवाइंड करायची संधी मिळाली आहे. या चॅलेंजमध्ये गंमतीचा भाग असला तरी अनेकांनी या माध्यमातून काही गंभीर विषयही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

टर्कीमध्येही #10YearChallenge मुळं सोशल मीडियावर महिलांनी डोकं झाकण्यासाठी वापरायच्या स्कार्फवरून (हिजाब) वाद सुरू झाला आहे. हिजाब वापरणं बंद केलेल्या महिलांनी आपली भूमिका मांडण्यासाठी या ट्रेंडचा वापर केला आहे.

टर्कीमध्ये अनेक वर्षांपासून हिजाब हा चर्चेचा आहे. टर्कीत सार्वजनिक संस्थांमध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. विद्यापीठातही हिजाब घालून येण्याची परवानगी नव्हती.

मात्र गेल्या दशकभरात टर्कीतलं हे चित्र बदललं. अध्यक्ष रेसिप तय्यप अर्दोगान यांनी हिजाबवरची बंदी उठवायला सुरूवात केली. हिजाब हे राजकीय आणि धार्मिक परंपरावादाचं प्रतीक असल्याचं धर्मनिरपेक्षतावादी मानतात. त्यामुळंच अर्दोगान यांचा हा निर्णय धार्मिक विचारसरणीला पाठिंबा देणारा असल्याची टीकाही करण्यात आली. याच काळात तरूण मुलींवर घरातून तसंच समाजाच्या विविध स्तरांतूनही हिजाब वापरण्यासाठी दबाव यायला लागला.

#10YearChallenge मध्ये तुमचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातो. मात्र टर्कीमध्ये अनेक मुलींनी अगदी अलिकडच्याच काळात हिजाब न वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं त्यांनी #10YearChallenge च्या ऐवजी #1yearchallenge हा हॅशटॅग वापरायला सुरूवात केली.

हिजाब नाकारणाऱ्या तरूणींपैकीच एक आहे नझान. तिनं या चॅलेंजमध्ये स्वतःचा पॅराग्लायडिंग करतानाचा फोटो टाकला आहे. 'तुमच्या धारणांप्रमाणे आणि तुम्हाला हवं तसं जगता येणं किती सुंदर असतं, हे शब्दांत मांडता येणार नाही,' असं नझाननं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नझानसारखंच अनेक तरूणींनी आपल्या भावना ट्वीट करून मांडल्या आहेत. यातील बरेचसे ट्वीट हे 'You'll Never Walk Alone' या सोशल प्लॅटफॉर्मवरुन रिट्वीट करण्यात आल्या आहेत. ज्यांनी हिजाबला नाकारलं किंवा ज्या हिजाब न घालण्याचा विचार करत आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यामुळं इतर महिलांनाही बंधनं झुगारण्याची प्रेरणा मिळेल, या हेतूनं 'You'll Never Walk Alone'नं ट्वीट्सना प्रसिद्धी दिली आहे.

नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर You'll Never Walk Alone वेबसाईटच्या संस्थापकांनी बीबीसीला सांगितलं, "तुम्ही एकट्या नाहीये आणि तुमच्या खडतर प्रवासात या महिला तुमच्यासोबत आहेत हे सांगणं आमच्या वेबसाईटचा उद्देश आहे."

आयुष्यभर त्यांना वागवावी लागेल अशी कोणतीही गोष्ट घालण्यासाठी 13-14 वर्षांच्या मुलींना तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हिजाब नाकारणाऱ्या तरूणींचं मनोगत

"प्रत्येकाला हवं ते बोलता यायला हवं. आपण स्वतंत्र आहोत आणि या गोष्टीचा आमचं कुटुंब किंवा नातेवाईकांशी काहीही संबंध नाहीये," बुसरनूर यांनी लिहिलं.

"आमचे स्वतःबद्दलचे विचार आणि आम्ही काय करू शकतो यासंबंधीच्या विचारांवर कोणतीही बंधनं नाहीत. धर्माच्या नावाखाली महिलांवर लादल्या जाणाऱ्या विशिष्ट चौकटीतल्या विचारांमधूनही आम्ही बाहेर पडलो आहोत. इतरांनी सांगितलेल्या भूमिका आम्ही पार पाडणार नाही. आम्ही आता स्वतःला ओळखलं आहे. #10yearchallenge."

"मी नेहमी हसतमुख राहते पण आयुष्य हे माझ्यासाठी तितकं सरळसोपं नव्हतं. इमाम हातिप धार्मिक शाळेमधून शिकल्यामुळं विद्यापीठात हिजाब घालता यावा यासाठी एकेकाळी मी संघर्ष केला होता. मात्र गेल्या आठ वर्षांपासून हिजाब नको म्हणून मी लढा दिला," अजून एका मुलीनं ट्वीट केलं आहे.

"खूप वर्षांपासून माझा स्वतःशीच झगडा सुरू होता आणि गेल्या पाच वर्षांपासून माझा गोतावळा आणि संपूर्ण समाजाविरुद्धच मी लढत आहे."

विरुद्ध बाजूचा दृष्टिकोन

हिजाब नको म्हणणाऱ्या मुलींप्रमाणेच आम्ही स्वेच्छेनं हिजाब वापरतो असं म्हणणाऱ्या मुलीदेखील आहेत.

"#10yearchallene मी गेल्या चार वर्षांपासून हिजाब वापरत आहे. स्वातंत्र्याची चर्चा अशा पद्धतीनं व्हावी असं मला अजिबात वाटत नाही, एका तरूणीनं लिहिलं आहे.

चर्चेत पुरुषांचीही उडी

काही पुरुषांनीही या मुद्द्यावर आपली मतं मांडली आहेत.

"आपलं डोकं झाकून घेणं किंवा न घेणं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. इतरांनी त्यात लक्ष घालण्याचं काहीच कारण नाही," असं एकानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"गेल्या काही दिवसांपासून मी डोकं झाकून घेण्याबद्दलच्या पोस्ट वाचत आहे. माझ्या मते एका अर्थानं पोकळ चर्चा आहे. ज्या मुली हिजाब वापरत नाहीत त्यांच्याप्रमाणेच ज्या मुली हिजाब वापरतात त्यांचाही सन्मान ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अपमानास्पद टिप्पणी करणं टाळावं," असं मतही मांडण्यात आलं आहे.

एका युजरनं म्हटलं आहे, "स्वातंत्र्याला हिजाबसोबत जोडणंच चुकीचं आहे. हिजाब आणि स्वातंत्र्याची सांगड घालणं हा दुराग्रह आहे. इतर कोणाच्याही दबावाखाली न येता मोकळेपणानं वागता येणं हेच स्वातंत्र्य आहे. स्वतःचं डोकं झाकून घेणं हेदेखील स्वातंत्र्यच आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)