मुंबई मॅरेथॉन : ती धावली आणि इतिहास घडला

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबई मॅरेथॉन म्हणजे भारतातली आघाडीची मॅरेथॉन शर्यत समजली जाते. गेली सोळा वर्षं या शर्यतीत आघाडीच्या धावपटूंसोबतच सामान्य मुंबईकर मोठ्या संख्येनं सहभागी होतात. त्यात अर्थातच महिलाही मागे नाहीत. मुख्य शर्यत असो, हाफ मॅरेथॉन असो किंवा अन्य हौशी धावपटूंसाठीच्या विविध गटांमधल्या शर्यती. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या शर्यतीत मोठ्या संख्येनं उतरतात. जगातल्या कुठल्याही शहरात हे दृष्य आता नवं नाही.

पण अगदी १९७०च्या दशकापर्यंत महिलांना अशा मॅरेथॉनमध्ये धावण्याची परवानगीही मिळत नसे. इतकंच नाही, तर त्यांना त्यापासून परावृत्त केलं जायचं.

अगदी पहिल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजे १८९६ साली अथेन्समध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉन रेसचा म्हणजे 42.195 किलोमीटर शर्यतीचा समावेश झाला होता. पण ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या शर्यतीचा समावेश होण्यासाठी १९८४ हे वर्ष उजाडावं लागलं.

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेच्या नोंदींनुसार सत्तरच्या दशकाआधी इंग्लंडची व्हायोलेट पर्सी, अमेरिकेची मेरी लेपर अशा मोजक्या महिलांनी ही शर्यत पूर्ण केल्याचे रेकॉर्डस उपलब्ध आहेत.

का होता महिलांच्या धावण्याला विरोध?

महिला मॅरेथॉन धावण्यासाठी सक्षम नाहीत, लांब पल्ल्याच्या शर्यती त्यांच्यासाठी घातक ठरतील अशा स्वरुपाच्या गैरसमजुतींमधून महिलांच्या मॅरेथॉनमध्ये सहभागाला वेळोवेळी विरोध होत राहिला. पण दोन महिलांच्या जिद्दीमुळं हे मत बदलण्याचा मार्ग मोकळा झाला.

रॉबर्टा 'बॉबी' गिब १९६६ साली अनधिकृतपणे बोस्टन मॅरेथॉनमध्ये धावली होती. आयोजकांनी केवळ महिला असल्यानं तिला परवानगी नाकारली होती. पण शर्यत सुरू झाल्यावर बाजूला झुडुपांत लपलेली बॉबीही इतर धावपटूंसोबत धावू लागली, तेव्हा आधी चकित झालेले लोक तिला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊ लागले.

मग १९६७ साली कॅथरिन स्विट्झर अधिकृतरित्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारी पहिल्या महिला धावपटू ठरली. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत स्विट्झरनं तिच्या काळातल्या महिला धावपटूंच्या संघर्षाविषयी सविस्तर सांगितलं होतं.

"८०० मीटर, किंवा त्यापेक्षा जास्त अंतराच्या शर्यती महिलांसाठी धोकादायक आणि त्यांचं स्त्रीत्व कमी करणाऱ्या समजल्या जायच्या. धावण्यामुळं त्यांचं गर्भाशय खाली येईल, पाय जाड होतील, त्यांच्या अंगावर केस वाढतील, असा समज होता. धावणं मला मी मुक्त असल्याची जाणीव करून द्यायचं, म्हणून मला धावायचं होतं आणि मी धावले," अशी आठवण कॅथरीनने सांगितली होती.

मॅरेथॉनमध्ये महिला युगाची सुरुवात

स्विट्झरनं मॅरेथॉनमध्ये धावण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिनं आणि तिच्या प्रशिक्षकांनी बोस्टन मॅरेथॉनची नियमावली तपासली. त्यात कुठेही महिलांना बंदी असल्याचा उल्लेख नव्हता. मग मॅरेथॉनसाठी कॅथरिननं आपल्या आद्याक्षरांच्या आधारे के. व्ही. स्विट्झर असं नाव नोंदवलं, त्यामुळं एक महिला शर्यतीत धावते आहे, याची आधी अधिकाऱ्यांना जाणीवही नव्हती.

शर्यत सुरू झाल्यावर काही एक महिला धावत असल्याचं पाहून गोंधळ उडाला. शर्यतीचे संचालक जॉक सेंपल यांनी कॅथरिनला अडवून रेसमधून दूर करण्याचा प्रयत्नही केला. पण तिचे प्रशिक्षक अर्नी मदतीसाठी आले. कॅथरिनसोबत सोबत धावणारा तिचा बॉयफ्रेण्ड आणि भावी पती टॉम मिलरनं सेंपलला दूर लोटलं

'मी तेव्हा खूप घाबरले होते, पण त्या क्षणी सर्व काही बदललं असल्याची मला जाणीव झाली. ती शर्यत मग महिला काय करू शकतात हे दाखवण्याची शर्यतही बनली. मीही मग मॅरेथॉन धावपटू म्हणूनच करियर करण्याचा निर्णय घेतला. शर्यत सुरू झाली, तेव्हा मी केवळ एक तरुण मुलगी होते. पण शर्यत संपेपर्यंत त्या मुलीचं एका प्रगल्भ स्त्रीमध्ये रुपांतर झालं होतं.'

कॅथरिनच्या यशानंतरही बोस्टन मॅरेथॉनमध्ये महिलांना सहभागाची परवानगी मिळेपर्यंत पाच वर्षं जावी लागली. पण पुढच्या पाच दशकांत जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक महिलांसाठी मॅरेथॉन ही आपण काहीतरी करून दाखवू शकतो हा विश्वास देणारी शर्यत बनली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)