You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॉग - 'सलाम मुंबई! तुझ्यासाठीच मी धावतो पूर्ण मॅरेथॉन...'
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबई म्हणजे गर्दी... माणसांची, गाड्यांची, प्रदूषण आणि प्रत्येकाला धावण्याची घाई. पण हे सर्व चित्र वर्षातल्या एका दिवशी पूर्णपणे वेगळं असतं. मुंबईचे रस्ते मोकळे असतात, रस्त्यांवर एकही गाडी दिसत नाही.
तुमच्या सेवेला मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि हजारो स्वयंसेवक असतात, प्रदूषण नाही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह असतो आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते. निमित्त असतं ते गेल्या पंधरा वर्षांपासून जानेवारी महिन्यात होणाऱ्या 'मुंबई मॅरेथॉन'चं.
गेली तीन वर्षं मी मुंबई मॅरेथॉन धावतोय. हे चौथं वर्षं. 2015 साली पहिल्यांदा हाफ मॅरेथॉन धावलो होतो. त्यानंतर फुल मॅरेथॉन धावायचा आगाऊपणा करतोय. आगाऊपणा याच्यासाठी कारण त्यासाठी आवश्यक तयारी मी अद्याप एकाही वर्षी व्यवस्थितपणे करू शकलेलो नाही आहे.
दरवर्षी मॅरेथॉन धावल्यावर पुढच्या वर्षी भरपूर सराव करूनच धावायचं, असं ठरवतो खरं, पण ते अद्याप जमलेलं नाही.
मुंबई मॅरेथॉन धावणं ही गोष्ट मला वर्षभरासाठी खूप सकारात्मक ऊर्जा देते. सराव नसल्यामुळे मी खरंतर यावर्षी मॅरेथॉन धावणार नव्हतो. पण नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सकाळी नियमितपणे धावायला सुरुवात केली आणि मॅरेथॉन धावायला पाहिजे, असं वाटू लागलं.
त्यामुळे तयारी नसतानाही अगदी शेवटच्या क्षणी केलेल्या रजिस्ट्रेशनमुळे धावता आलं, याचं आता, मॅरेथॉन पूर्ण केल्यावर आनंद आणि समाधान वाटतंय.
सहा तास पाच मिनिटांत मी मॅरेथॉन पूर्ण केली. खरंतर माझं टार्गेट साडेपाच ते पाऊणेसहा तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणं होतं. कारण मागच्या वर्षी मी हीच मजल ५ तास ५९ मिनिटात मारली होती.
मॅरेथॉन सुरू झाल्यापासून 35 किमीपर्यंत सर्व सुरळीत चाललेलं होत. त्यामुळे ठरवलेलं लक्ष गाठता येईल, असं मला वाटत होतं. पण 35 किलोमीटरवर माझ्या डाव्या पायात क्रॅम्प्स आल्याची जाणीव झाली आणि मी धावणं थांबवणं.
पायात आलेले क्रॅम्प्स घेऊन धावल्याचे परिणाम मी गेल्या वर्षीच्या मॅरेथॉननंतर काही दिवस चांगलेच भोगले होते. म्हणून यंदा असं कुठलंही साहस करायचं नाही, हे ठरवलं होतं. त्यामुळे धावत आणि मध्येच थोडं चालत मी मॅरेथॉन पूर्ण केली.
गेल्या वर्षीचा माझाच वैयक्तिक रेकॉर्ड मला मोडता आला नाही याचं दु:ख आहे, पण कुठलीही दुखापत झाली नाही याचा जास्त आनंद आहे.
खरंतर मॅरेथॉन हा शारीरिक पेक्षा मानसिक तंदुरुस्तीचा खेळ आहे, कारण तुमची स्पर्धा तुमच्याशीच असते. प्रत्येक मीटर, किलोमीटर पार करताना तुम्हीच स्वत:ला कशा प्रकारे प्रोत्साहन देता, यावरच अंतिम निकाल अवलंबून असतो.
एक मुंबईकर म्हणूनही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची अनेक कारणं आहे. वर्षभरात फक्त याच दिवशी मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या विशेष दोन गाड्या नेहमीच्या पहिल्या लोकलच्या आधी पश्चिम आणि मध्य मार्गावर चालवल्या जातात. ज्यामध्ये फक्त धावपटूच खचाखच भरलेले असतात.
सर्वांची चढण्याची स्थानकं वेगळेगळी असली तरी उतरण्याचं स्थानक आणि उद्देश एकच.
मुंबईतले सर्व रस्ते (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे) अडवलेले असतात आणि या रस्त्यांवर प्रवेश असतो तो केवळ धावटूंना. त्यामुळे दररोज मुंबईच्या ट्रॅफीकमध्ये तासन् तास अडकणाऱ्या मुंबईकरांसाठी मोकळ्या रस्त्यावर धावण्याची ही सुवर्णसंधी असते.
मॉडर्न मुंबईची ओळख बनलेला वांद्रे-वरळी सागरी सेतूवर दुचाकी आणि पादचाऱ्यांना तसा प्रवेश नसतो. पण मॅरेथॉनच्या पहाटे या सागरी सेतूवर फक्त धावटूंनाच प्रवेश दिला जातो. रस्त्याच्या मध्ये उभं राहून फोटो काढण्याची संधी कोणीच सोडत नाही, मीसुध्दा नाही सोडली. त्यामुळे दरवर्षीचा माझा हा सेल्फी सर्वाधिक लाईक्स मिळवतो.
कठीण प्रसंगी मुंबईचं स्पिरिट दिसतंच, पण माझ्या मते मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईचं खरं स्पिरिट अनुभवायला मिळतं. जवळपास अर्धा लाखभर लोकं धावण्याच्या इर्षेनं रस्त्यावर उतरतात आणि आपलं ध्येय गाठतात. आणि त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी लोटलेला असतो जनसागर. नवजात बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच या धावपटूंना चिअर करण्यासाठी रविवारी सकाळी झोपेला तिलांजली देऊन रस्त्याच्या कडेला उभे असतात.
पेडर रोड, शिवाजी पार्क, माहिम कोळीवाडा या भागातील नागरिकांची तर धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी झुंबड उडालेली असते. विविध संदेश लिहिलेले फलकं, बिस्किटं, पाणी, चॉकलेट, फळं, मीठ, एनर्जी ड्रिंक्स, खजूर, केक यांची स्वखर्चाने तजवीज करून प्रत्येक धावपटूला मोठ्या दिलाने प्रोत्साहन देत असतात. टाळीसाठी हात पुढे करून 'पॉवर ले लो' म्हणणारी लहान मुले, मोफत जादुची झप्पी देणारी प्रौढ मंडळी, झोपेतून उठून आलेलं आणि हातात बिस्किटं पकडलेली एखादी चिमुकली तुमच्या शरीराला आणि मनाला अजिबात थकू देत नाही.
प्रभादेवीमध्ये राहणारा आमचा मित्र सुमित पाटील तर आमच्यासाठी चक्क चहा, गजक आणि केळी घेऊन उभा होता. पंचवीस किलोमीटर अंतरावर मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणी, एनर्जी ड्रिंक्स, रिलिफ स्प्रे, फळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते.
धावपटूही एकमेकांना प्रोत्साहन आणि ऊर्जा देत असतात. कोणी थकून चालू लागलेल्याला हात देतात तर कोणी रस्त्याच्या कडेला बसला असेल तर आवर्जून त्याची खुशाली विचारतात.
आणखी एक गोष्ट कमालीची म्हणजे 'एलीट' धावपटूंना 'याची देही याची डोळा' धावताना पाहणं. वाऱ्याच्या वेगासोबत धावणाऱ्या या धावपटूंसोबत धावण्याची माझी कसलीच पात्रता नाही, पण त्यांच्यासोबत ट्रॅक शेअर करणं ही अभिमानाची बाब असते.
शेवटचं एक किलोमीटर अंतर धावताना माझ्या अंगात अजिबात त्राण उरलं नव्हतं. पण एका टप्प्यावर आमचे आणखी दोन मित्र प्रोत्साहन द्यायला उभे होते. तिथून संचारलेल्या जोशातच फिनिश लाईन जेव्हा पार केली तेव्हा संपूर्ण शरीर हवेत तरंगत होतं. आपल्या शरीराची आणि मनाची सलग सहा तास धावण्याची क्षमता आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आणि स्वत:चाच स्वत:ला अभिमान वाटला.
सर्व अडथळ्यांवर मात करत मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केलेले तरुण-तरुणी, प्रौढ मंडळी, ज्येष्ठ नागरिक यांचे आप्तजन डोळ्यांत आनंदाश्रू साठवून त्याचं स्वागत आणि अभिनंदन करत होते. हा कौतुकसोहळा डोळ्यासमोर पाहता येतो याचा एक माणूस म्हणून मला खूप आनंद वाटतो.
यावर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला दोन मेडल देण्यात आले. एक धावपटूसाठी आणि दुसरं त्यांना धावण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीसाठी. हे दोन्ही मेडल एकमेकांना मॅगनेटने चिकटलेली आहेत. ज्या कुणा व्यक्तीची ही संकल्पना असेल त्याचे शतश: आभार.
मला धावण्यासाठी प्रेरणा देणारं माझं कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी आहेतच. त्यांचा मी कायम ऋणी राहीन. पण कायम घड्याळाच्या काट्यावर धावणारं मुंबई शहर आणि मुंबईकर देखील मला धावण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळेच या मुंबईला सलाम!
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)