मुंबई मॅरेथॉन : हाफ मॅरेथॉन विजेत्या संजीवनीचं लक्ष्य ऑलिंपिक

    • Author, श्रीकांत बंगाळे आणि प्रविण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठी

मुंबईमध्ये झालेल्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये महिलांची हाफ मॅरेथॉन शर्यत संजीवनी जाधव हिनं जिंकली आहे. नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातली धावपटूंची खाण मानलं जातं. याच खाणीतला एक हिरा म्हणजे संजीवनी होय.

'सावरपाडा एक्स्प्रेस' अशी ओळख मिळवलेल्या कविता राऊतनं आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर पहिल्यांदा नाशिकचं नाव आणलं. याच कविताचा वारसा पुढे नेणारी धावपटू म्हणजे संजीवनी होय.

22 वर्षं वय असलेली संजीवनी आतापर्यंत 9 आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी धावली आहे.

अॅथलेटिक्सची उगवती तारका

संजीवनीनं गेल्या वर्षी जुलैत भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीचं कास्यपदक मिळवलं होतं. तर दहा हजार मीटर शर्यतीत ती पाचवी आली.

तर ऑगस्ट 2017मध्ये तैपेईमध्ये झालेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये तिनं 10 हजार मीटर शर्यतीचं रौप्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू ठरली.

देशभरातल्या मॅरेथॉन शर्यतींमध्ये ती गेली काही वर्ष सातत्यानं धावत आहे.

कुस्तीच्या आखाड्यातून अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर

संजीवनी नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील वडाळीभोई या गावीची आहे.

संजीवनीचे शिक्षक वडील आणि गृहिणी असलेल्या आईनं नेहमीच तिला खेळात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. विशेष म्हणजे संजीवनी आधी कुस्तीचा सराव करायची आणि तिनं सुरुवातीला वर्षभर गावात कुस्त्यांच्या स्पर्धेत भागही घेतला होता.

पण तिला वडिलांनी धावण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संजीवनी नाशिकला आली.

यशाची वेगवान धाव

संजीवनीला भोंसला मिलिट्री स्कूलमध्ये नावाजलेले प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचं मार्गदर्शन मिळालं.

राष्ट्रीय पातळीवर शालेय गटात 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई, हे तिचं पहिलं महत्त्वाचं यश होतं.

2013 साली मलेशियात झालेल्या पहिल्या आशियाई शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनीनं 1500 मीटर शर्यतीत रौप्य आणि 3000 मीटर शर्यतीचं कास्य पदक मिळवलं.

जुलै 2017 मध्ये भुवनेश्वर येथे 'आशियन ट्रॅक अँड फिल्ड चॅम्पियनशिप'मध्ये तिला 5000 मीटर शर्यतीत कास्य पदकावर समाधान मानावं लागलं.

तिनं ऑगस्ट 2017मध्ये तैपेई येथे झालेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये 10 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक मिळवलं. हे यश मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

मिशन ऑलिंपिक

संजीवनीला आता मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खुणावत आहेत.

"सध्या मी यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची तसंच 2020 सालच्या ऑलिंपिक स्पर्धेची तयारी करत आहे. ऑलिंपिकमध्ये भारतासाठी मेडल मिळवण्याचं माझं स्वप्न आहे," असं संजीवनी म्हणाली.

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ती मेहनत घेत आहे. संजीवनी दररोज सकाळी चार वाजता उठते. सकाळी पाच ते सात आणि संध्याकाळी साडेचार ते साडेसात अशा वेळेत धावण्याचा सराव करते.

त्याशिवाय ती क्रीडा मानसशास्त्र या विषयात एम. ए. करत आहे.

भविष्यात आणखी मोठी कामगिरी बजावण्यासाठी काय करायला हवं, हेही संजीवनीला नेमकं उमगलं आहे.

ती म्हणते, "यशासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे कष्ट आणि शिस्त. कष्ट करण्याची प्रत्येक खेळाडूची तयारी असायला हवी आणि यशात सातत्य ठेवायचं असेल तर खेळाडूनं शिस्त पाळायला हवी."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)