You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनई तिहेरी हत्याकांड : मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची फाशी ठेवली कायम
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगरच्या सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या हत्याकांडातील दुसरा आरोपी अशोक नवगिरेची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याआधी या हत्याकांड प्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या सोनई इथं संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26) आणि सचिन घारू (वय 23) या मेहतर समाजातील तीन युवकांची निर्घृण खून करण्यात आला होता.
या प्रकरणात प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे या सहा जणांवर दोषारोप सिद्ध झाले होते. न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांना नाशिकच्या सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती.
या पैकी आरोपी पोपट विश्वनाथ दरंदले यांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये नाशिक कारागृहात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक सेशन कोर्टाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी आरोपींना भारतीय दंडसंहिता ३०२ - हत्या करणे , २०१ - पुरावा नष्ट करणे , १२०ब - कट रचणे या कलमाअंतर्गत दोषी ठरवलं आणि हा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.
सर्व दोषी मराठा समाजातले असून एकमेकांचे नातेवाईक आहेत.
दरंदले परिवारातील एक मुलगी नेवासा फाटा येथील एका कॉलेजमध्ये बी.एड.चं शिक्षण घेत होती. तिथंच सचिन, संदीप आणि राहुल सफाई कामगार म्हणून काम करत होते. यातील सचिन घारूसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले, त्या रागातूनच हे हत्याकांड घडल्याचं कोर्टात सिद्ध झालं.
हाही जणांना हत्या करणे, कटकारस्थान रचणे, पुराव्यांशी छेडछाड करणे कारणांसाठी ही शिक्षा झाली आहे.
'गोठलेल्या डोक्यानं केलेले खून'
गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सहाही दोषींना फाशीची शिक्षा द्यायला हवी असा युक्तिवाद केला होता.
"या तिघांच्या हत्येने रामायणातील राक्षसांची आठवण आली. हा केवळ cold blooded murder नाही, तर frozen blooded murder (गोठलेल्या डोक्यानं केलेला खून)आहे," असा युक्तिवाद त्यांनी केला.
"आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला म्हणून अशा पद्धतीनं झालेल्या हत्येचं समर्थन होऊ शकत नाही. अशा घटना रोखायच्या असतील तर दोषींना मृत्युदंडाच्या शिक्षेशिवाय पर्याय नाही," असं ते म्हणाले.
"आपल्या देशात आजही जातिव्यवस्थेला महत्त्व दिलं जातं. जातीयवादातून अशा घटना घडत आहेत. सोनईतील हत्याकांड हे एकप्रकारचं 'ऑनर किलिंग' होतं. यापुढं अशाप्रकारची कृत्यं करण्याचं धाडस कुणाचं होऊ नये. म्हणून सहाही आरोपींना मृत्युदंड व्हावा," असं निकम म्हणाले.
सोनई हत्याकांड 'दुर्मिळातील दुर्मीळ'
सोनईतील तिहेरी हत्याकांड हे 'दुर्मिळातील दुर्मीळ' असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या युक्तिवादातील काही मुद्दे असे.
1. मयत सचिन घारू याचे दरंदले परिवारातील एका मुलीवर प्रेम होतं. दोघांनी लग्न करायचे ठरवले होतं. त्यामुळं 15-20 दिवस आधी मुलीच्या नातेवाईकांनी सचिनला ठार मारण्याची धमकी दिली होती.
2. अशोक नवगिरे यानं संदीपला कामासाठी वस्तीवर बोलावलं. त्यानंतर संदीप 1 जानेवारी 2013 रोजी सकाळी दहा वाजता सचिन आणि राहुलसह कामासाठी बाहेर पडला.
3. सकाळी 10 ते दुपारी 3.30पर्यंत तिघं वस्तीवरच काम करत होते साक्षी आणि कॉल रेकॉर्डसवरून सिद्ध होतं. दुपारी 3.30 ते रात्री आठ दरम्यान तिघांची हत्या झाली.
4. रात्री आठ वाजता पोपट दरंदले आणि अशोक नवगिरे यांनी आपल्या सेप्टिक टँकमध्ये पडून सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिली. त्यामुळं दोषींनी खोटा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला.
5. कोर्टात साक्ष देताना मुलगी फितूर झाली. परिस्थितीजन्य पुराव्यांनी तिचे सचिनसोबतचे नाते सिद्ध झाले. घटनेच्या दुसऱ्याच दिवसापासून तिनं कॉलेज सोडलं आणि वर्गशिक्षिकेला घरी प्रॉब्लेम झाला आहे इतकंच सांगितलं. पण त्याविषयी न्यायालयानं विचारल्यावर तिला कारण सांगता आलं नाही.
6. दोषींचा सचिनवर कमालीचा राग होता. त्यांनी सचिनला केवळ मारलं नाही, तर त्याच्या शरीराचे आठ तुकडे केले. कोणी साक्षीदार राहू नये, म्हणून संदीप आणि राहुल या दोघांनाही मारण्यात आलं.
7. मृत शरीराची विटंबना करणं हा वेगळा गुन्हा ठरू शकतो.
8. दोषींना कुठला मानसिक आजार नाही. कुणा अन्य व्यक्तीच्या दबावाखाली येऊन त्यांनी हे कृत्य केलेलं नाही.
9. ज्या पद्धतीनं तिघांना मारण्यात आलं, ते पाहता आरोपींचं वयाचा मुद्दा ग्राह्य धरला जाऊ नये. त्यांनी अत्यंत कौशल्यानं आणि विचारपूर्वक खून केले आहेत आणि कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
10. दोषी ठरवण्यात आल्यावर कोर्टातलं त्यांचं वर्तन आक्रमक होतं. त्यांचं पुनर्वसन होईल अशीही कोणती शक्यता नाही.
दोषींच्या वकिलांचा युक्तिवाद
सोनई हत्याकांडातील आरोपींना केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवण्यात आलं आहे. गेली पाच वर्ष हे सर्व जण कारागृहांत आहेत याचा विचार केला जावा असं दोषींच्या वकिलांनी म्हटलं होतं.
मुलीचे वडील आणि आरोपी पोपट दरंदलेचं वय साठ वर्ष आहे आणि मुलीचा भाऊ गणेश दरंदले अवघ्या 22 वर्षांचा आहे, त्यामुळं त्यांची शिक्षा कमी व्हावी, युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला होता. पण कोर्टानं हा युक्तिवाद फेटाळला.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)