व्हॉट्सअॅपचं आता बिझनेस अॅप येतंय

तुम्ही तुमच्या इस्त्रीवाल्याला फक्त व्हॉट्सअॅप मेसेज करून तुमच्या कपड्यांना इस्त्री झाली का असं विचारलं आणि त्याचा लगेच रिप्लाय आला तर? किंवा तुमचा एक छोटा व्यवसाय आहे आणि सगळ्या ग्राहकांच्या विनंत्यांना तुम्ही एका मेसेजने प्रतिसाद देऊ शकला तर?

या सुविधा असणार आहेत, व्हॉट्सअॅपमध्ये.

व्हॉटसअॅपने छोट्या उद्योजकांना त्यांच्या अॅपच्या आतच एक वेबसाईट सुरू करता येईल, असं एक फीचर उपलब्ध केलं आहे.

त्याला WhatsApp Business असं नाव आहे. हे अॅप अमेरिका, इंग्लंड, इटली, इंडोनेशिया आणि मेक्सिकोत सुरू झालं आहे.

काही आठवड्यांतच भारतात येणार हे अॅप सगळ्या अँड्रॉईड फोन्सवर उपलब्ध असेल.

हे अॅप काय करेल?

बिझनेस प्रोफाईल- अकाऊंटमध्ये बिझनेसची माहिती असेल. त्यात ईमेल, दुकानाचा पत्ता आणि वेबसाईट किंवा फक्त फोन नंबर असेल.

मेसेजिंग टुल्स- सर्वसामान्य प्रश्नांना ऑटोमॅटिक रिप्लाय, तसेच कंपनीची ओळख करून देणारे ग्रीटिंग मेसेजेस आणि जर ग्राहकांना तुम्ही बिझी असाल तर तसा मेसेज देणं असे अनेक फीचर्स उपलब्ध असतील.

मेसेजची आकडेवारी- किती मेसेज वाचले गेले आणि काय उपयुक्त ठरतं आहे, याची आकडेवारी यातून मिळणार आहे.

व्हॉटसअॅप वेब- नेहमीच्या व्हॉट्सअॅपसारखं या व्हॉट्सअॅपचंही डेस्कटॉप व्हर्जन असणार आहे.

वेरिफाईड अकाऊंट्स- काही काळानंतर एकदा का बिझनेसच्या ऑफिशियल नंबरची पडताळणी झाली की व्हॉट्सअॅप तर्फे एक हिरव्या रंगांचं टिक मार्कही मिळणार आहे.

ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी वेगळं व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावं लागणार नाही. ते त्यांच्या नेहमीच्या अकाऊंटवरून बिझनेस निगडित संवाद साधू शकतील. जर ते बिझनेसचा फोन नंबर तुमच्या संपर्कयादीत नसेल किंवा तर त्यांचं नाव त्या विशिष्ट उद्योगाच्या नावानं दिसेल.

गेल्या वर्षी 'टेक क्रंच' या वेबसाईटशी बोलताना व्हॉटसअॅपनं सांगितलं होतं की बिझनेस अकाऊंट असणाऱ्यांचा फोन नंबर ज्यांनी सेव्ह केला आहे, त्यांनाचा बिझनेस अकाऊंट असणाऱ्यांशी संपर्क साधता येईल. सध्या या अॅपबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

अॅप बिझनेससाठी सध्या मोफत आहे. पण व्हॉटसअॅपचे मुख्य परिचालन अधिकारी मॅट एडेमा यांनी भविष्यात बिझनेस अकाऊंटसाठी शुल्क आकारण्याचा विचार असल्याचं सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)