You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण होतं का?
- Author, सिकंदर किरमानी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पाकिस्तान
फेसबुकवर एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण झालं असा अर्थ होतो का? पाकिस्तानातील एका चित्रपट निर्मातीनं हा प्रश्न उपस्थित केला आहे.
पाकिस्तानातील ऑस्कर विजेती चित्रपट निर्माती शरमीन ओबेद-चिनॉय हिची बहीण एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
तिच्या बहिणीवर उपचार केल्यानंतर तिला हॉस्पिटलमधील एका डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर शरमीन वैतागली. तिने याबाबत रागाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली.
या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं की, "एखादा डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाची माहिती फेसबुकवर कशी काय पोस्ट करू शकतो?"
शरमीनच्या या ट्वीटनंतर मात्र फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानात नव्या वादाला तोंड फुटलं.
स्त्रियांना विरोध करण्यासाठीच...
शरमीनने या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याला शोषण ठरवल्यावरुन पाकिस्तानात अनेक जण नाराज झाले आहेत.
शरमीन या प्रकरणी खूप तीव्र प्रतिक्रिया देत आहेत, असं नाराज झालेल्यांचं म्हणणं आहे.
पण, अनेकांनी शरमीन यांचं समर्थनही केलं आहे. शरमीन यांचा अपमान केला जात आहे कारण, हा अपमान करणारेही नेहमीच स्त्रियांचा विरोध करत आले आहेत.
सोशल मीडियावर एखाद्याला रिक्वेस्ट पाठवणं हा शोषण करण्याचा प्रकार असेल तर, ते हास्यास्पद आहे. अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातील पत्रकार अली मोइन नवाजिश यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
"यापुढे एखाद्याकडे पेन मागणं किंवा सलग तीन सेकंद पाहणं हे देखील शोषण समजायचं का? असं लिहिल्यानं ज्या महिलांचं शोषण होत आहे त्यांच्यावरुन लक्ष हटवलं जात आहे. तसंच तिनं पाकिस्तानचा अपमान केला आहे." असंही त्यांनी पुढे लिहीलं आहे.
नवाजिश यांनी नंतर असाही दावा केला की, शरमीनच्या ट्वीटनंतर त्या डॉक्टरला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. दरम्यान, काही सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्या डॉक्टरला आगा खान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच हॉस्पिटल याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
शरमीन चिनॉयची निंदा
शरमीन ओबेद-चिनॉय हिला ऑनर किलिंग आणि अॅसिड हल्ला पीडितांवरील एका डॉक्युमेंट्रीसाठी पुरस्कार मिळाले आहेत. शरमीन यांच्यावर यापूर्वी पाकिस्तानशी 'गद्दारी' केल्याचे आरोप झाले आहेत. कारण त्यांच्या चित्रपटात पाकिस्तानी समाज हिंसक आणि स्त्रियांशी भेदभावपूर्ण वागत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
चिनॉय यांना अनेकांनी 'उच्चभ्रू' म्हटलं असून त्या म्हणजे 'चुकीच्या कुटुंबात जन्म घेतलेली व्यक्ती' असल्याचंही म्हटलं आहे.
शरमीननं याप्रकरणी आपली बाजू मांडताना सांगितलं की, "माझ्या कुटुंबातील महिला सक्षम आहेत. याचा अर्थ आम्ही एक स्वतंत्र शक्ती आहोत किंवा आम्हाला काही विशेषाधिकार आहेत असं नाही."
पण, या उत्तरानंतरही सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य करणं सुरूच राहिलं.
काहींनी तर, त्यांचे अन्य पुरुषांसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांना 'हिप्पोक्रॅट' संबोधलं.
अनेकांनी फेसबुक अकाऊंट सुरू करुन शरमीन यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचं आवाहन केलं.
तसंच अनेकांनी महिला किंवा पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं हे शोषण कसं काय ठरू शकतं असा प्रश्नही विचारला.
पाकिस्तानी लेखिका बीना शाह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ओबेद-चिनॉयच्या विरोधात जे बोललं जात आहे. त्यात मला कोणतंही आश्चर्य वाटत नाही. पितृसत्ताक व्यवस्थेशी भांडल्यावर त्याचे परिणाम भोगावेच लागणार."
'शरीर संबंध ठेवताना पदाचा वापर करू नका'
या सगळ्या प्रकारानंतर ओबेद-चिनॉयनं एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि म्हटलं की, "ही गोष्ट महिला सुरक्षा, अनैतिक व्यवहार आणि शोषण याच्या खूप पुढे पोहचली आहे." त्यांनी पुढे सांगितलं की, "त्या डॉक्टरनं माझ्या बहिणीला तपासल्यानंतर ऑनलाईन जाऊन तिच्या फोटोंवर टिपण्णी केली आणि तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मला अनेकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येतात. मात्र, ही घटना डॉक्टर आणि रूग्ण यांच्या नात्यावरील विश्वास उडण्यासारखी आहे."
पाकिस्तान मेडिकल अँड डेंटल काउन्सिलनं बीबीसीशी आपल्या नियमांबद्दल बोलताना, त्यात सोशल मीडिया संदर्भात विशेष काही उल्लेख केलेला नाही, असं सांगितलं.
पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की, "कोणताही रुग्ण, त्याचे पती किंवा पत्नी किंवा परिवार यांच्याशी भावनिक नातेसंबंध अथवा शरीर संबंध ठेवण्यासाठी आपल्या डॉक्टर पदाचा वापर करू नये."
ज्या डॉक्टरच्या पोस्टवरुन हा वाद सुरू झाला त्याचं नाव अद्यापही गुप्त ठेवण्यात आलं आहे.
सूत्रांकडील माहितीनुसार कराचीतील एका हॉस्पिटलने डॉक्टरसमोर नोकरीचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)