ताजमहाल हा तेजोमहाल आहे, या दाव्यात किती तथ्य आहे?

    • Author, विकास पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

ताजमहाल हे एक हिंदू मंदिर आहे, असा दावा एक खासदार आणि काही उजव्या विचारसरणीचे गट करतात.

भारतातल्या अधिकृत इतिहासानुसार, मुघलसम्राट शहाजहाँने त्याची राणी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहाल बांधला.

मध्य आशियातून आलेल्या मुघलांनी 16 व्या आणि 17 व्या शतकात आताचा भारत आणि पाकिस्तान असलेल्या भागावर राज्य केलं.

या मुघल सम्राटांनी दक्षिण आशियामध्ये इस्लाम, मुस्लीम कला आणि संस्कृतीचा प्रसार केला आणि ताजमहाल हे त्यांच्या या कलासक्ततेचंच प्रतीक आहे.

भारतीय पुरातत्त्व खात्याचे एक तज्ज्ञ ताजमहालचं वर्णन 'मुघल स्थापत्यशास्त्राचा सर्वोत्तम नमुना' असं करतात.

"मुस्लीम स्थापत्यशास्त्र आणि भारतातल्या कारागिरीचा हा अनोखा मिलाफ आहे. त्या काळात मुघल स्थापत्यशास्त्रातली उत्तमता शिगेला पोहोचली होती," असं ताजमहालबदद्लच्या सरकारच्या अधिकृत जाहिरातीत म्हटलं आहे.

"जेव्हा मुघलांनी ताजमहाल बांधला त्याआधीच्या काळात ते त्यांच्या पर्शियन आणि तिमुरीद मुळांबद्दल अभिमानाने सांगायचे पण नंतर मात्र ते स्वत:ला भारतीय म्हणवू लागले,"असंही या जाहिरातीत म्हटलं आहे.

इतिहासकार राणा सफ्वी यांनी बीबीसीला सांगितलं, "ताजमहालचा इतिहास पुन्हा पडताळून पाहण्याचा प्रश्नच येत नाही आणि इथे मंदिर अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही."

"ताजमहाल बांधण्याआधी त्या जागी हिंदू राजा जय सिंग यांच्या मालकीची हवेली होती," असंही त्यांनी सांगितलं.

"शहाजहाँने त्यांच्याकडून ही हवेली विकत घेतली. यासाठी अधिकृतरित्या फर्मान काढण्यात आलं होतं. या फर्मानमधल्या माहितीनुसार हेही दिसून येतं की मुघल सम्राट त्यांच्या व्यवहाराच्या आणि इतिहासाच्या सगळ्या नोंदी ठेवत होते," त्या म्हणतात.

श्रीमती सफ्वी यांच्या म्हणण्यानुसार, 'ताज महाल : द इल्युमिन्ड टोम्ब' या डब्लू. इ. बेगली आणि झेड. ए. डेसाइहॅस यांच्या पुस्तकात या कागदपत्रांमधल्या माहितीचे दाखले आहेत.

"अशा पुस्तकांमुळेच मला जाणवलं की, ही इमारत आणि या स्मारकाबदद्ल तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. याचा दाखला घेऊनच मी हे म्हणू शकते की राजा जय सिंग यांची हवेली होती आणि इथे कोणतंही धार्मिक ठिकाण किंवा प्रार्थनास्थळ नव्हतं," त्या ठासून सांगतात.

नामवंत इतिहासकार हर्बन्स मुखिया हेही श्रीमती सफ्वी यांच्याशी सहमत आहेत.

"या सगळ्या ऐतिहासिक दस्तावेजानुसार, ताजमहाल हा शहाँजहाँ ने त्याच्या राणीच्या स्मृतीसाठी बांधला हे नि:शयपणे सिद्ध होतं," ते सांगतात.

शालेय पाठ्यपुस्तकं आणि सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरही ताजमहालचं वर्णन हे भारतीय-इस्लामिक स्थापत्यशास्त्राचं एक उदाहरण असंच केलं आहे.

मग या मंदिराची कथा आली कुठून ?

ताजमहालचा इतिहास बदलला पाहिजे, अशी मागणी करणारे विनय कटियार हे काही पहिली व्यक्ती नाहीत.

मंदिराची कथा

उजव्या विचारसरणीचे दिवंगत इतिहासकार पी. एन. ओक यांनी 1989 मध्ये 'ताज महाल' या पुस्तकात या स्मारकाचा उल्लेख 'तेजो महाल' असा केला होता.

या पुस्तकात त्यांनी या स्मारकाच्या जागी रजपूत राजाने बांधलेला राजवाडा आणि हिंदू मंदिर होतं, असं म्हटलं आहे.

पी. एन. ओक यांच्या म्हणण्यानुसार, मुघल सम्राट शाहजहाँ यांनी लढाईनंतर या जागेचा ताबा घेतला आणि त्याचं नाव ताज महाल ठेवलं.

लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी पी. एन. ओक यांच्यासोबत काम केलं आहे. सरकारने याठिकाणी सत्याचा उलगडा करण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

"ताजमहाल हे मुस्लीम स्थापत्याशास्त्राचं उदाहरण नाही. हे मुळात हिंदू स्थापत्यशास्त्र आहे," असं ते म्हणतात.

पण ताजमहालच्या स्थापत्यशैलीत पर्शियन, भारतीय आणि इस्लामिक स्थापत्यशैलीचा मिलाफ पाहायला मिळतो, असं सरकारच्या अधिकृत ताजमहाल वेबासाईटवर म्हटलं आहे.

विनय कटियार आणि सच्चिदानंद शेवडे यांचं म्हणणं आहे की, ताजमहालमध्ये हिंदू स्थापत्यशैलीची प्रतीकं दिसतात.

स्थापत्यशैलीबद्दलचे प्रश्न

"ताजमहालच्या मध्यघुमटावर चंद्रकोर आहे. मुस्लीम संस्कृतीत पूर्ण चंद्र हे प्रतीक असतं, चंद्रकोर नसते. अशी चंद्रकोर शंकराच्या डोक्यावर असते, अशी शिवभतांची श्रद्धा आहे," सच्चिदानंद शेवडे सांगतात.

"या घुमटावर कलशही आहे. त्यासोबत आंब्याची पानं आणि मधोमध नारळाचा आकार आहे. ही हिंदू संस्कृतीची प्रतीकं आहेत. फुलं आणि प्राण्यांची चित्रं मुस्लीम स्थापत्यशास्त्रात निषिद्ध आहेत. पण ताजमहालवर हेही कोरीव काम पाहायला मिळतं,"असं त्यांचं म्हणणं आहे.

इतिहासकार हर्बन्स मुखिया मात्र हे दावे फेटाळून लावतात.

"स्थापत्यकलेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव पाहायला मिळतो. मुघल स्थापत्यकला यापेक्षा वेगळी नाही. कलश हे हिंदूंसाठी महत्त्वाचं प्रतीक आहे पण मुघल रचनांमध्येही आपल्याला कलश पाहायला मिळतो."

"ताजमहालमध्येही तो आहे. फुलंपानांची रचनाही मुघल इमारतींमध्ये पाहायला मिळतील," ते सांगतात.

याआधी कित्येक दशकं ताजमहाल हा जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच्या सरकारी जाहिरात मोहिमांमध्ये वापरला गेला.

आत्ताच हा वाद का ?

शहाजहाँ आणि मुमताजमहल यांच्या प्रेमाचं वर्णन कित्येक लेखक आणि कवींनी केलं आहे. मग विनय कटियार यांना असे दावे करून काय साधायचं आहे ?

भारतात सध्या हिंदू राष्ट्रावादाचे वारे वाहत आहेत आणि त्यांचं वक्तव्य याच काळातलं आहे. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर अनेक भाजप नेते हिंदू अभिमान जागवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्यं करत आलेत.

जे लोक हिंदू राष्ट्रावादावर विश्वास ठेवतात त्यांनाच कटियार यांना संबोधित करायचं आहे.

अर्थव्यवस्था, रोजगार अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवण्यासाठीही राजकीय नेते अशी वक्तव्यं करतात.

सरकारने जरी त्यांच्या या वक्तव्यांना समर्थन दिलं नाही तरी उजव्या विचारसरणीचे अनेक गट अशा नेत्यांच्या मागे जाण्यातच धन्यता मानतात.

अशाच एका गटाने ताजमहालमध्ये हिंदू धर्माच्या प्रार्थना करण्याची परवानगी देण्याचीही मागणी केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)