2019 : प्रेरणादायी महिलांच्या या 19 बातम्या तुम्हाला नववर्षासाठी ऊर्जा देतील

संघर्ष, कर्तृत्व, निर्धार आणि स्वतंत्र वृत्तीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या महिलांच्या अनेक बातम्या आम्ही सरत्या वर्षात दिल्या. यापैकी 19 निवडक बातम्या 2019मध्ये प्रवेश करताना तुम्हाला प्रेरणा देतील, अशी आम्हाला आशा आहे.

1. सीडमदर

पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई पोपेरे यांनी मोठे योगदान दिलं आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणं बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय.

पाहा व्हीडिओ

राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणं वापरतात. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत यंदा त्यांचा BBC 100 Women या जगभरातल्या प्रेरणादायी महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

2. भीमगीतांनाच आपलं आयुष्य मानणाऱ्या

कडुबाई खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरची गाणी गाऊन आपलं पोट भरतात. कुटुंबात कुणाचाही आसरा नसताना त्या गेली अनेक वर्षं याच मार्गानं अर्थार्जन करत आहेत.

चिकलठाणा इथे गायरान जमिनीवर त्या मुलांसह राहतात. चैत्यभूमीवर त्या 6 डिसेंबरला त्यांची गाणी सादर करतात.

पाहा व्हीडिओ

"डॉ. आंबेडकर नसते तर मी आणि माझी मुलं मेलो असतो," असं त्या म्हणतात.

3. 'वारी म्हणजे स्वातंत्र्य'

पंढरपूरची वारी आम्हा बायकांना नवऱ्यापासून आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांपासून स्वातंत्र्य देते, असं दरवर्षी वारीला जाणाऱ्या कुसुमबाई कपाटे सांगतात.

पाहा व्हीडिओ

नवरा नाही म्हणाला तरीही "हट्ट करून" पंढरपूरच्या वारीला त्या आल्याचं त्यांनी बीबीसी मराठीच्या टीमला पंढरपूरच्या वारीदरम्यान सांगितलं. इथे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं, असं त्या म्हणतात. पाहा बीबीसी मराठीचं वारीसंबंधित कव्हरेज डिजिटल स्वरूपात इथे

4. 'लिहिता वाचता येत नव्हतं, मग कॅमेरा हाती घेतला'

शालेय शिक्षण न झालेल्या माया एका कॅमेऱ्याच्या सहाय्याने समाजातले प्रश्नं गेली अनेक वर्षं मांडत आहेत.

नाशिकमधल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांना कॅमेऱ्याची ताकद कळली.

"लिहिता वाचता येत नव्हतं, मग आपले प्रश्न जगापुढे मांडायला कॅमेरा हे उत्तम माध्यम वाटलं," असं त्या म्हणतात.

पण इथपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास कसा होता? वाचा इथे

5. ऑलिंपिंकचं मराठमोळं स्वप्न

मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये महिलांची हाफ मॅरेथॉन शर्यत संजीवनी जाधवनं जिंकली.

नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातली धावपटूंची खाण मानलं जातं. याच खाणीतला एक हिरा म्हणजे संजीवनी होय.

22 वर्षांची संजीवनी आतापर्यंत 9 आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी धावली आहे. पण तिचं स्वप्न आहे ऑलिंपिक जिंकण्याचं. तिच्या प्रवासाविषयी अधिक वाचा इथे.

6. सायकलवरून जगप्रदक्षिणा

इंग्लंडच्या बोर्नमाउथ विद्यापीठात शिकणारी पुण्याची वेदांगी कुलकर्णी या 19 वर्षीय तरुणीने नुकतीच सायकलवरून सर्वांत कमी वेळात जगप्रदक्षिणा करण्याचा नवा विक्रम रचला.

पाच खंडांमधून सायकलिंग करत २९,००० किलोमीटरचा पल्ला फक्त 169 दिलसांध्ये पार करणारी ती सर्वांत जलद आशियाई सायकलपटू आहे. 

वेदांगीची ही राईड 'सेल्फ सपोर्टेड' म्हणजेच कुणाच्याही मदतीशिवाय होती, हे विशेष. याआधी जगात केवळ दोन महिलांनी वयाच्या तिशीत असा प्रयत्न केला होता.

वेदांगीने तिच्या प्रवासाच्या सुरुवातीला बीबीसी मराठीशी साधलेल्या संवादाविषयी वाचा इथे.

7. एव्हरेस्टवीर

एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतल्या आहेत. औरंगाबादेच्या महाविद्यालयात त्या क्रीडा संचालक आहेत.

माउंट एव्हरेस्टचा शिखर माथा टप्प्यात दिसत असताना हिलरी स्टेपला ऑक्सिजन सिलिंडरचं रेग्युलेटर खराब झालं. ऑक्सिजनचा तुटवडा असताना एव्हरेस्ट शिखर सर केलं. खाली उतरताना 'स्नो ब्लाईंडनेस'चं संकट ओढावलं.

गेल्या वर्षी याच हिलरी स्टेपपाशी मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतल्यानंतर जिद्दीनं पुन्हा दुसऱ्या वर्षी तिथं पोहोचलेल्या 32 वर्षीय मनीषा वाघमारे यांच्या जिद्दीची कथा... वाचा त्यांच्याच शब्दांत...

8. माणदेशी रेडिओचा आवाज

केराबाई सरगर माणदेशी तरंग वाहिनी 90.4 वर त्या लोकगीतांचा कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या आवाज अख्ख्या माणदेशात लोकप्रिय आहे.

"लहानपणापासून माझं गाणं सुरू आहे. माझी आई जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आईच्या आणि आजीच्या ओव्या ऐकत ऐकत मलाही गाण्याचा छंद लागला. हाच गाण्याचा छंद मला रेडिओ केंद्रापर्यंत घेऊन गेला," असं त्या सांगतात.

1998 पासून त्या रेडीओवर गात आहेत आणि गावकरीसुध्दा त्यांचे कार्यक्रम आवडीने ऐकतात.

9. सर्पमैत्रीण

वनिता बोराडे बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरमध्ये राहतात. आतापर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिलं आहे, असं त्या सांगतात.

"वयाच्या 10व्या वर्षापासून मला साप पकडण्याचा छंद लागला," वनिता सांगतात.

पाहा व्हीडिओ

सापांबद्दल संरक्षण, संवर्धन, संशोधन आणि प्रबोधन ही त्यांची चतुःसुत्री आहे. तसंच सापांबद्दलची अंधश्रध्दा दूर करण्यासाठी त्यांनी ‘सोयरे वनचरे’ ही संस्था सुरू केली.

10. शिडाच्या बोटीतून पृथ्वीची प्रदक्षिणा

पी. स्वाती या शिडाच्या होडीतून सागर परिक्रमा पार पाडणाऱ्या 'INSV तारिणी'च्या शिलेदार होत्या.

"माझी आई जिथे मोलकरीण म्हणून काम करायची तिथे मी नौदल अधिकारी झाले," असं त्या सांगतात.

11. दक्षिण कोरियात भारतीय शेफ

दीपाली प्रवीण या मूळच्या उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या आहेत. सध्या त्या दक्षिण कोरियात राहतात. पतीच्या फिरतीच्या नोकरीमुळे दीपाली यांना वेगवेगळ्या देशांत जावं लागतं.

त्यांनी एक क्युलिनरी कोर्स केला. स्वयंपाकाचं हे रितसर प्रशिक्षण घेतलं आणि आज त्या त्यांच्या आवडीचं काम करतात. नुसतं आवडीचं कामच नाही, तर त्या दक्षिण कोरियातल्या लोकप्रिय शेफ बनल्या आहेत.

शेफसाठी असलेली वर्ल्ड कप स्पर्धा त्यांनी जिंकली आहे.पाहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास.

12. लठ्ठपणा कमी करता करता त्यांनी बनवले सिक्स पॅक अॅब्स

मधू झा यांचं वजन एकेकाळी 85 किलो होतं. आज त्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा गाजवत आहेत.

"मी फार लठ्ठ होते. काहीही खात होते. जंक फूड मला फार आवडायचं. इतकंच काय मी दारूही प्यायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही माझं वजन 85 किलो झालं होतं," त्या सांगतात.

आणि आज लठ्ठपणा कमी करता करता त्यांनी सिक्स पॅक अॅब्स कमावले आहेत.

पाहा व्हीडिओ

13. इंग्रजांशी दोन हात करणाऱ्या हौसाबाई पाटील

93 वर्षांच्या हौसाबाई या क्रांतीसिंह नाना पाटील यांची लेक. सध्या त्या सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहतात.

दक्षिण महाराष्ट्रात नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार किंवा पत्री सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांची लेक हौसाबाई पाटील यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नोंदवला होता.

"गोरं घालविलं अन काळं आणलं... आमचं चुकलंच जरा! खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या. मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असतं," स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी हौसाबाई पाटील सांगतात.

पाहा व्हीडिओ

14. हिमा दास

18 वर्षांच्या हिमा दासनं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅंपियनशिपच्या अंडर-20मध्ये तिनं 400 मीटर प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. असं करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

"हिमाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता," असं तिची आई सांगते. पण सर्व अडचणींवर मात करून तिनं हे यश मिळवलं. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर हिमाला सरकारी नोकरीचे प्रस्ताव येत आहेत.

पण तिनं ते नाकारले आहेत. कारण तिला तिचं ध्येय गाठायचं आहे. तुम्ही म्हणाल ते काय?

पाहा व्हीडिओ -

15. कॅन्सरवर मात करणारी शची

"कॅन्सरशी संघर्ष हा फक्त शारीरिक नसतो, तर मानसिकही असतो. कॅन्सरशी लढताना थकले की जगण्याचं आमिषाचा हात घट्ट धरायचे," असं शची मराठे सांगतात.

कॅन्सरशी झुंज दिलेल्या शची मराठे यांनी सांगितलेले स्वतःचे अनुभव. त्यांच्याच शब्दांत. वाचा इथे

16. स्मृती मन्धाना आणि अनुजा पाटील

ICC महिला वर्ल्ड T20 अर्थात T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आणि आपल्या प्रदर्शनाने जग जिंकलं. त्या संघात यंदा सांगलीची स्मृती मंधाना आणि कोल्हापूरच्या अनुजा पाटील यांचा समावेश होता.

फलंदाजीत कुमार संगकाराला आदर्श मानणाऱ्या 22वर्षीय स्मृतीच्या बॅटिंगमध्ये आक्रमकता आणि देखणेपण, यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. याच वर्षी BCCIने स्मृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम प्रदर्शन करणारी भारतीय खेळाडू या सन्मानाने गौरवलं.

पदार्पणानंतर अल्पावधीत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या स्मृतीला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार पटकावणारी स्मृती केवळ दहावी महिला क्रिकेटपटू ठरली.

कोल्हापुरात अनुजा पाटीलचा सराव पाहण्यासाठी गर्दी होते. प्रशिक्षकांच्या विश्वासाला पात्र ठरत अनुजाने वाटचाल केली आहे.

2012मध्ये भारतासाठी पदार्पण करणारी अनुजा दर्जेदार फिरकीपटू आहे. जादुई फिरकीच्या बळावर अव्वल फलंदाजांना सातत्याने चकवणाऱ्या अनुजाने गेल्यावर्षी भारतीय अ संघाचं नेतृत्वही केलं होतं.

17. बाबासाहेबांकडून प्रेरणा घेत समाजात हक्कांसाठी लढणाऱ्या महिला

भटक्या वैदू समाजातल्या बालविवाह आणि जातपंचायत या प्रथा दुर्गा गुडिलु यांनी मोडून काढल्या. शिक्षणापासून शेकडो वर्षं लांब राहिलेल्या या समाजातल्या नव्या पिढीला शिक्षणाकडे आणण्याचं काम दुर्गा करत आहेत.

"बाबासाहेबांमुळेच मी जातपंचायतीविरुद्ध लढले, आता मीही आंतरधर्मीय लग्न करणार," असं त्या सांगतात.

पाहा व्हीडिओ

शोषितांची बाजू आपल्या लिखाणातून प्रभावीपणे मांडणाऱ्या नव्या पिढीच्या लेखिकांमध्ये शिल्पा कांबळे यांचं नाव आघाडीवर आहे.

'निळ्या डोळ्यांची मुलगी' ही कादंबरी, 'बिर्याणी' हे नाटक आणि अन्य लेखनातून दलित साहित्याविषयीचे पूर्वग्रह मोडकळीस आणणारी लेखिका म्हणून शिल्पा यांची ओळख आहे. पण ही ओळख निर्माण करण्यापर्यंत वाटेवरचा काटेरी प्रवास त्यांनाही चुकलेला नाही. त्या आज आयकर विभागात अधिकारी पदावर आहेत.

शहरातल्या जातीविषयक भेदभावाचा सामना केलेल्या शिल्पा कांबळे यांनी आपली कहाणी बीबीसी मराठीकडे मांडली.

पाहा व्हीडिओ

"जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही ओळी त्यामध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं ते बाबासाहेब आहेत. पारंपरिक जगणं सोडा, पारंपरिक वाट सोडा आणि एक नवीन परिवर्तन घडवूयात, असे जिथे जिथे शब्द येतात तिथे तिथे बाबासाहेब आहेत," हे शब्द आहेत तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकीशेख यांचे.

18. सारिका पवार

सारिका पवार यांच्या शेतकरी पतीनं कर्जामुळे आत्महत्या केली. त्यावेळी सारिका गरोदर होत्या. तीन मुलांची जबाबदारी अंगावर येऊन पडली. पण त्या डगमगल्या नाहीत. त्या ठामपणे उभे राहिल्या आणि आयुष्याला सामोरं गेल्या.

"आपल्याला कितीही कष्ट पडले तरी लेकरांना काही कमी पडू द्यायचं नाही. कधीकधी सगळ्याचा कंटाळा येतो. नकोसं वाटतं. पण लेकरं डोळ्यासमोर आली की जगण्याचा मार्ग सापडतो," सारिका सांगतात.

19. शिव्या नाथ

शिव्या नाथ, 30-वर्षांची ब्लॉगर जी आपली रोजची नोकरी सोडून आज सगळं जग एकटीने फिरते आहे.

मूळ डेहराडू्नच्या शिव्याने 2011 साली वयाच्या 23 वर्षी आपला जॉब सोडला आणि प्रवासाला लागली.

2013 साली तिने आपलं घर सोडलं, होतं नव्हतं सगळं विकलं आणि जगभर फिरणारी जिप्सी बनली.

“आता माझ्याकडे काय आहे असं विचाराल तर तेवढंच सामान जे दोन बॅगांमध्ये मावेल. बस्स!” ती म्हणते.

पाहा व्हीडिओ

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)