एव्हरेस्टवीर : मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या मनीषाचे थरारक अनुभव

    • Author, मनीषा वाघमारे
    • Role, एव्हरेस्टवीर

औरंगाबादेतल्या महिला महाविद्यालयात क्रीडा संचालक असलेल्या एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे यांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निरंजन छानवाल यांच्याशी शेअर केलेले दोन एव्हरेस्ट मोहिमांचे थरारक अनुभव...

माउंट एव्हरेस्टचा शिखर माथा टप्प्यात दिसत असताना हिलरी स्टेपला ऑक्सिजन सिलिंडरचं रेग्युलेटर खराब झालं. ऑक्सिजनचा तुटवडा असताना एव्हरेस्ट शिखर सर केलं. खाली उतरताना 'स्नो ब्लाईंडनेस'चं संकट ओढावलं. गेल्या वर्षी याच हिलरी स्टेपपाशी मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतल्यानंतर जिद्दीनं पुन्हा दुसऱ्या वर्षी तिथं पोहोचलेल्या 32 वर्षीय मनीषा वाघमारे यांच्या जिद्दीची कथा... त्यांच्याच शब्दांत..

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायचा निश्चय केल्यानंतर जानेवारी 2016पासून तब्बल 13 महिने खडतर प्रशिक्षण घेतलं. मोहिमेवर प्रचंड खर्च केला. पण गेल्या वर्षीची ही मोहीम अगदी अखेर शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाली.

एव्हरेस्टच्या अयशस्वी मोहिमेहून औरंगाबादला आल्यानंतर तीन महिने मला रिकव्हर व्हायला लागले. सप्टेंबर 2017मध्ये पुन्हा एकदा एव्हरेस्ट मोहिमेवर जायची तयारी सुरू केली. मे 2018मध्ये अखेर माझी चढाई यशस्वी झाली. मी एव्हरेस्टवीर झाले. त्याची ही गोष्ट - दोन मोहिमांची आणि माझ्या इच्छाशक्तीची.

माझं मूळ गाव परभणी. बारावीपर्यंतचं शिक्षण इथंच झालं. वडील भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीला होते. ते व्हॉलिबॉलपटू होते. आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ. घरी खेळाचं वातावरण असल्यानं पाचही जण खेळाडू. मी वयाच्या सहाव्या वर्षांपासून व्हॉलिबॉल खेळायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळले.

2004मध्ये इंडियन कॅडेट कोर्सतर्फे हिमालयातील केदारडोम इथं गिर्यारोहणासाठी गेले असता माझ्या कानातून आणि नाकातून रक्त आलं होतं. याच वर्षी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. सहा महिने घरीच होते.

डॉक्टरांनी धावणं आणि उड्या मारणं आता जमणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. माझं खेळाचं करिअर उद्ध्वस्त झालं होतं. त्याच वेळी मी गिर्यारोहणात करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.

2006पासून माझा गिर्यारोहणाचा प्रवास सुरू झाला. 2013मध्ये एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखरं सर करण्याचा प्रवास सुरू झाला. 50 तासांत दहा शिखरं सर करण्याचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड केला.

गेल्या वर्षी मी पहिल्यांदा एव्हरेस्ट मोहीम ठरली तेव्हा 55 दिवसांच्या या मोहिमेसाठी 25 लाख 70 हजार रुपये खर्च येणार होता. त्यासाठी 15 लाख रुपयांचं कर्ज काढलं. ओळखीच्यांकडून हातउसने पैसे घेतले. सहा लाख रुपयांची स्पॉन्सरशिप मिळाली.

मे 2017मध्ये मी मोहिमेवर निघाले. एव्हरेस्ट समिटसाठी 22 मे तारीख मिळाल्याने बेस कँप ते सर्वोच्च शिखर माथा असा सगळा प्रवास ठरला.

हवामान खराब असल्यानं 20 आणि 21 तारखेला मला मोहीम रद्द करावी लागली. त्यामुळे डेथ झोनमध्येच अर्थात कँप 4 इथं 48 तास काढावे लागले. इथं बारा तासांच्यावर राहणं शक्य नाही.

कँप 4 परिसरात सर्वाधिक गिर्यारोहकांचा मृत्यू झालेला आहे. या भागात 200च्या जवळपास मृतदेह बर्फात गाडले गेलेले आहेत. या कारणानेच या भागाला डेथ झोन म्हणतात.

तिसऱ्या दिवशी 22 मेला पहाटे चार वाजता मी हिलरी स्टेप इथं पोहोचले. एव्हरेस्ट समिटच्या अलीकडेच हा भाग आहे. मोहिमेचा शेवटचा टप्पा.

पण या टप्प्यावरच बरोबरच्या टीममध्ये आणि माझ्यात साधारणतः अर्धा ते पाऊण तासांचं अंतर पडलं होतं. वातावरण क्षणाक्षणाला आणखी खराब होत चाललं होतं. मी आणि माझा शेरपा दोघंच धीम्या गतीनं वाटचाल करत होतो.

180 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू लागले. तापमान उणे 80 अंश सेल्सियसपर्यंत गेलं. हिमालयाचं भीषण, रुद्र रूप मी त्यावेळी पाहात होते.

पुढे गेलेली माझी संपूर्ण टीमच या वादळात अडकली. त्यांचा शोध घेणं शक्य नव्हतं. आम्ही अगदी थोडक्यात वाचलो. शेरपाने पुढे जाण्यास नकार दिला. त्याच्यात आणि माझ्यात पाच मिनिटं पुढे जाण्याविषयी बोलणं सुरू होतं. तू जिवंत परतशील याची शाश्वती मी देत नाही, असं तो मला बजावत होता.

एव्हरेस्टचा शिखर माथा अवघा 170 मीटर दूरवर असताना आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. ज्या एव्हरेस्टच्या ध्यासाने मी आयुष्यातली दहा वर्षं घालवली तो शिखर माथा मला खुणावत होता. पण मला परतावं लागलं.

कँप 4ला आम्ही परतलो. शिखर माथ्याकडे जाताना इथं शंभर तंबू लावलेले होते. आता फक्त मोजकेच तंबू तिथं होते. तिथे मृत्यूच्या छायेतच तीन तास विश्रांती घेतली आणि नंतर पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली.

माझ्याकडच्या एकमेव सिलिंडरमधला ऑक्सिजन कँप 3पर्यंत येता-येता संपला. कँप 3पासून पुढचा प्रवास ऑक्सिजन सिलिंडरशिवाय पूर्ण केला.

या सगळ्या वातावरणामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फुप्फुसांचा संसर्ग झाला. त्याचा त्रास जाणवायला लागला होता. रात्रभर चालत होते. सकाळी कँप 1ला आल्यानंतर तिथून मला रेस्क्यू करून बेस कॅंपला आणण्यात आलं.

बेस कँपवर डायनिंग तंबू आहे. तिथं मी गेले. आमच्या 21 जणांच्या टीमसह माझ्या नावासमोर हिमवादळात बेपत्ता झाल्याची नोंद होती.

इथल्या लोकांनी एक दिवस आधीच माझ्या घरी हिमवादळात तुमची मुलगी 'मिसिंग' असल्याचं कळवल होतं. मी तत्काळ तिथून घरी फोन करून सुरक्षित असल्याचं कळवलं.

फुप्फुसांचा संसर्ग बळावल्यानं मला तातडीनं तिथून काठमांडूला हलवण्यात आलं. पाच दिवस मी ICUमध्ये होते. अगदी डोळ्यासमोर दिसणारं लक्ष्य पूर्ण होऊ शकलं नव्हतं. दहा वर्षांची मेहनत, सगळा पैसा, त्यात हा आजार यामुळे मी निराशेच्या गर्तेत गेले होते.

जगप्रसिद्ध गिर्यारोहक रेनहोल्ड मेस्सनर मला काठमांडूच्या रुग्णालयात भेटले. 22 मेच्या हिमवादाळातून जे बचावले त्यांची भेट ते घेत होते.

ते म्हणाले, 'या मोहिमेतील तुझं सगळ्यात मोठं यश कोणतं? माहितीये... डेथ झोनमध्ये तू काढलेले 48 तास नाही. अतिशय वाईट हवामानात हिलरी स्टेपवरून तू जिवंत परतलीस हेच तुझं मोठं यश आहे.' त्यांच्या शब्दांनी तिथंच मला उभारी मिळाली आणि मी पुन्हा पुढच्या वर्षी एव्हरेस्टवर परतायचं ठरवलं.

औरंगाबादला आल्यानंतर तीन महिने मला रिकव्हर व्हायला लागले. सप्टेंबर 2017मध्ये पुन्हा एकदा एव्हरेस्ट मोहिमेवर जाणार असल्याची घोषणा मी केली. तयारी सुरू असतानाच डाव्या गुडघ्याचं लिगामेंट तुटल्याचं मला कळालं. बरं व्हायला एक वर्ष लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं.

मी ऑपरेशनची तयारीही केली. पण त्याच वेळी मला मुंबईतील डॉ. अनंत जोशी यांच्याविषयी कळल्यावर मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या उपचारांनी मी दोन महिन्यात पूर्ववत झाले.

मोहिमेसाठी खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न होता. कारण आधीच्या मोहिमेसाठी कर्ज काढलेलं असल्यानं आता तो मार्गही बंद होता. पैसा उभा करण्यासाठी मी सह्याद्रीत कँप आणि मोहिमा आयोजित केल्या. कळसूबाई शिखरावर एकाच वेळी 130 महिलांची टीम घेऊन गेले. शाळांमध्ये रॅपलिंगचे धडे देऊ लागले.

6 तास कॉलेजमध्ये जॉब केल्यानंतर उर्वरित वेळेत मोहिमेसाठी पैसा उभा करण्यासाठी मला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं. त्यातून पैसा उभा केला. महात्मा गांधी मिशन संस्थेची मोठी मदत झाली.

गेल्या वेळेचा अनुभव बघता यावेळी जास्तीचे सिलिंडर असलेलं पॅकेज घेतले. या वेळेची मोहीम 60 दिवसांची होती. गेल्या वेळेचा माझा शेरपा दावा शेरिंग हाच यावेळेसही माझ्याबरोबर असणार होता.

1 एप्रिल 2018ला मोहिमेसाठी रवाना झाले. 14 एप्रिलला बेसकँपवर पोहोचल्यानंतर 19 तारखेला लोबोचे शिखर सर केलं.

कँप 3पर्यंतच्या रोटेशन दरम्यान कँप 1 ते कँप 2च्या एका रोटेशनमध्ये माझा पाय निसटला आणि मी हिमनदीला तडे जाऊन तयार झालेल्या खोल दरीत पडले.

जिवाच्या अकांताने शिट्टी वाजवत राहिले. माझ्या शेरपाच्या वेळीच ते लक्षात आल्यानं त्याने मला दोरीच्या सह्यानं वर काढलं.

तोपर्यंत फुप्फुसांवर परिणाम व्हायला लागला होता. बेस कँपवर राहून मला चार दिवस उपचार घ्यावे लागले.

यावर्षी मला आणि बरोबरच्या टीमला 20 किंवा 21 मे ही तारीख एव्हरेस्ट समिटसाठी देण्यात आली होती. 17 मेला बेस कँपवरून मी एव्हरेस्ट शिखराकडे निघाले. 19 तारखेला कँप 3ला पोहोचल्यानंतर मी ऑक्सिजन घ्यायला सुरुवात केली.

20 मेला कँप 4वर पोहोचले. 4 तास आराम करून संध्याकाळी सात वाजता शिखर माथ्याची चढाई सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. दुपारीच वातावरण खराब झालेलं. उणे तापमान 50 अंश सेल्सिअस आणि ताशी शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगानं वार वाहत होतं.

शेवटी रात्री पावणे अकरा वाजता चढाईला सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजता साऊथ समिटला पोहोचले. हिलरी स्टेपला ऑक्सिजन मास्क खराब झाला.

रेग्युलेटर काम करत नव्हतं. माझ्या शेरपाने रेग्युलेटर दुरुस्तीसाठी हातात घेतलं आणि त्याच वेळी एका गिर्यारोहकाचा धक्का लागल्यानं ते दरीत पडलं. पुढचा अर्धा तास प्रत्येक येणाऱ्या -जाणाऱ्याला आम्ही रेग्युलेटर आहे का म्हणून विचारत होतो.

ऑक्सिजनशिवाय मी पुढची चढाई करू शकणार नाही अशी शेरपाने बजावलं. मला मागच्या वर्षीचा सगळा प्रसंग आठवला.

हिलरी स्टेपवरून मला पुन्हा परत जायचं नव्हतं. इथून समिट पूर्ण करून यायला दोन तास लागणार होते. यावेळी शिखर माथ्यावर पोहोचायचंच हा निर्धार करत मी चालायला सुरुवात केली.

अर्ध्या तासातच माझ्या हालचाली मंदावल्या. शेरपाच्या ते लक्षात आलं. त्यानंतर प्रत्येक दहाव्या मिनिटाला शेरपा त्याचा ऑक्सिजन मास्क मला वापरायला द्यायचा. त्यावेळी तो विना ऑक्सिजनचा असायचा. पुढचे 10 मिनिटं मी विना ऑक्सिजनची चढाई करायचे. असं करत करत 21 मेला मी सकाळी 8.10 वाजता एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर पोहोचले. जगातल्या सर्वांत उंच शिखरावर मी उभी होते.

एव्हरेस्टवर पोहोचल्यावर तो क्षण आपण कसा जगायचा याचं नियोजन मी केलं होतं. पण ऑक्सिजनशिवाय तिथं जास्त काळ राहू शकत नसल्यानं माझ्या जीवनातील तो सर्वोच्च आनंदाचा क्षण अवघ्या दहा मिनिटांसाठीच अनुभवता आला.

जास्त वेळ थांबले असते तर कदाचित मी परत येऊ शकले नसते. त्यातही नेपाळ सरकारसाठी आवश्यक त्या पद्धतीचे फोटो आणि शूटिंग करण्यात वेळ गेला. त्या प्रत्येक फोटोत मी रडतेय. तीन वर्षं मी घरी गेलेले नव्हते. दहा वर्षांची प्रतीक्षा, मेहनत आणि त्यासाठीचा संघर्ष. सगळं सगळं आठवत होतं त्या क्षणी.

शेरपा आणि मी लगेचच हिलरी स्टेपकडे परत यायला निघालो. हे अंतरही मी ऑक्सिजन न घेताच पूर्ण केलं. शिखर उतरत असतानाही आम्ही प्रत्येकाला अतिरिक्त रेग्युलेटर आहे का असं विचारत होतो.

साऊथ समिटला आल्यावर तिथं सुदैवानं माझ्या शेरपानं समिटसाठी निघालेल्या टीममधील एका दुसऱ्या गिर्यारोहकाला रेग्युलेटरविषयी विचारलं. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर सर करताना हा गिर्यारोहक माझ्यासोबत होता. त्याच्याकडे अतिरिक्त रेग्युलेटर होतं. त्यानं तत्काळ माझ्या ऑक्सिजन सिलिंडरला ते जोडलं.

आम्ही बाल्कनीच्या दिशेने उतरायला सुरूवात केली. 22 तास सतत चालत होते. काहीच खाल्लेलं नव्हतं. काही तास ऑक्सिजनविना काढलेली. मला चक्कर आली आणि मी बर्फावर कोसळले.

दहा मिनीटानंतर जाग आली तेव्हा माझ्या आजूबाजूला चार-पाच शेरपा गोळा झालेले होते. त्यांनी मला दोरीला बांधून खाली उतरवण्यास सुरुवात केली तर एका ठिकाणी तोल गेल्यानं मी सरळ शंभर मीटर घसरत खाली आले. ग्लोव्हज हरवले. डोळ्यात बर्फ गेला.

बाल्कनी ओलांडून कँप 4कडे येत असताना मला समोरचं काही दिसेनासं झालं. समोर सगळ अंधुक दिसत होतं. मी शेरपाला सांगितलं. त्याने डोळे बघितले. तो काहीच बोलला नाही. फक्त चालत राहा म्हणाला.

कँप 4वर पोहचल्यानंतर अर्ध्या तासात डोळे सुजले. डोळ्यात प्रचंड वेदना होत असल्यानं मी फक्त ओरडत होते.

याचदरम्यान माझ्या शेरपाला मी दुसऱ्याशी बोलताना मला 'स्नो ब्लाइंडनेस' झाल्याचं ऐकलं. ती फर्स्ट स्टेज होती. मी जोरजोरात रडायला लागले. वेदना सहन करतच झोपी गेले.

माझा शेरपा थोड्याथोड्या वेळानं मला उठवून पाणी प्यायचं का असं विचारायचा. मी जिवंत आहे किंवा नाही हे तो तपासत असावा.

सकाळी या कँपमध्येच समिटसाठी निघालेल्या एका डॉक्टरने मला पेन किलरचं इंजेक्शन दिलं. आम्ही आठ वाजता खाली उतरायला सुरूवात केली. मला समोरचं काहीच दिसत नसल्यानं शेरपाच्या मदतीनेच मी चालत होते.

कँप 2वर पोहोचल्यानंतर तिथं पुन्हा डॉक्टरने उपचार केले. नंतर रात्री तिथं आराम करून दुसऱ्या दिवशी तिथून थेट बेस कँपवर पोहोचलो. इथून मला चॉपरच्या मदतीनं लुकला इथं हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वातावरण खराब झाल्यानं चॉपरला पालझरला उतरावावं लागलं. तिथून खेचरावर बसून लुकला इथं आले. डोळ्यांचा संसर्ग वाढायला लागला होता. खराब वातावरणामुळे दोन दिवस लुकलात काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी चॉपरने काठमांडूला आले. तिथं रुग्णालयाने तातडीने डोळ्यावर उपचार सुरू केले. एक जूनला औरंगाबादेत पोहचल्यावर पुढचे उपचार घेतले.

एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते असं पूर्ण झालं. आता पुढचं लक्ष्य ठरवायचंय आणि प्रयत्न सुरू करायचेत.

(शब्दां: निरंजन छानवाल)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)