फादर्स डे स्पेशल : न दमलेल्या बाबाची कहाणी

    • Author, आदित्य तिवारी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'पाच महिन्याच्या त्या बाळाचं नाव बिन्नी होतं. त्याचे डोळे, त्याचं हसणं माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हतं. त्याचं बिलगणं मी विसरू शकत नव्हतो. तेव्हाच मी निर्णय घेतला याचा बाबा व्हायचं. पण ते सोपं नव्हतं...'

अविवाहित असताना एकल पितृत्वासाठी प्रयत्न करणाऱ्या आदित्य तिवारींची कहाणी एखाद्या यशोगाथेपेक्षा कमी नाही. डाऊन सिंड्रोम असल्याने स्पेशल गरज असणाऱ्या अवनीशला आदित्यनी दत्तक घेतलं आणि त्याचं पितृत्व आनंदाने स्वीकारलं. भारतात सिंगल पेरेंट आणि दत्तक बाळाचे सर्वांत कमी वयातले वडील म्हणून त्यांची आज ओळख आहे. या न दमलेल्या बाबाची ही पॉझिटिव्ह कहाणी त्याच्याच शब्दांत... आज 'फादर्स डे'च्या निमित्ताने.

मी पुण्यात नोकरीला लागून जरा कुठे स्थिरस्थावर झालो होतो. मी मूळचा इंदोरचा. माझं सगळं कुटुंब तिथेच असतं. पुण्यातल्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनअर होतो. पण आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाने माझं आयुष्य पार बदलून गेलं.

2014 सालची ही घटना. माझ्या वडलांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा म्हणून आम्ही लहान मुलांच्या अनाथालयात गेलो होतो. तिथे सगळी मुलं खेळत होती. काही रांगत होती.

एक लहान बाळ मात्र कोपऱ्यात होतं. कोणाच्याच खिजगणतीत नव्हतं. मी त्याच्याजवळ गेलो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लागलीच बदलले. माझं बोट मी त्याच्या इवलूश्या हाताजवळ नेलं. त्याने ते घट्ट पकडलं. आणि एखादं ओळखीचं माणूस भेटावं असं ते लहान बाळ खिदळायला लागलं. बराच वेळ मी तिथे होतो.

आजकाल अनाथाश्रमात जाऊन समाजसेवा करायचा ट्रेंड आहे. मी देखील त्याच भावनेने गेलो होतो. पण तिथून परतल्यावर मी पुरता हललो होतो.

सहा महिन्याच्या त्या बाळाचं नाव बिन्नी होतं. त्याचे डोळे, त्याचं हसणं माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हतं. त्याचं बिलगणं मी विसरू शकत नव्हतो. तेव्हाच मी निर्णय घेतला याचा बाबा व्हायचं. पण ते सोपं नव्हतं...

वयाच्या 26व्या वर्षीच मला एका मुलाचा बाबा व्हायचं होतं. माझं लग्न झालेलं नव्हतं. उत्तम नोकरी होती, राहतं घर होतं आणि कौटुंबिक स्थितीही चांगली होती. नवरा म्हणून सगळ्या जमेच्या बाजू माझ्याकडे होत्या. त्यामुळे 'कुणाचा नवरा होण्याआधीच मला बिन्नीचा बाबा व्हायचंय' हे ऐकून अनेकांनी वेड्यातच काढलं.

मी बिन्नीला अनाथाश्रमात भेटायला वरचेवर जाऊ लागलो. माझ्यासाठी मी त्याचं नाव अवनीश ठेवलं होतं. त्याच नावाने मी त्याला हाक मारत होतो. अवनीश म्हणजे श्रीगणेश. मला माहीत होतं अनाथालयातली धडधाकट मुलंच दत्तक घेतली जातील. पण ज्यांना अधिक गरज आहे, स्पेशल गरज आहे अशा अवनीशसारख्या मुलांचं काय?

अवनीशला डाऊन सिंड्रोम होता. म्हणजेच त्याला ट्रायसोमी 21 हा आजार जन्मजात होता. या आजाराची मुलं आपण पाहतो. त्यांना अपंग म्हटलं जातं. इतकंच काय मेंटल किंवा मेंटली रिटायर्डही म्हटलं जातं, जे चूक आहे. समाजाच्या दृष्टीने अशी मुलं नकोशी असतात. पण मला अवनीशला दत्तक घ्यायचं होतं. अगदी कोणत्याही परिस्थितीत मला त्याचा बाबा व्हायचं होतं.

लोक म्हणते होते- 'तो मुलगा तसलंच नशीब घेऊन आलाय, त्यासाठी तू कशाला तुझं आयुष्य बरबाद करतोयस'

जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला जे प्रेम, जी काळजी हवी असते, ते ते सगळं मला अवनीशला द्यायचं होतं.

'तुझ्यात काही प्रॉब्लेम आहे का?'

आपल्या भारतात तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा लोकांना काय वाटतंय हे महत्त्वाचं मानलं जातं. लोक काय म्हणतील! यावर अनेक जण आपला निर्णय घेत असतात. माझ्याबाबतीतही हेच होत होतं. मित्र आणि घरातले नातेवाईक मला विचारत होते- तुला या वयात हे काय खुळ सुचलंय? दत्तक घ्यायचंय म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तू मेडकली फिट नाहीयेस का? काही वर्ष स्वतंत्र राहिल्याने तुला हे असलं काही सुचतंय?

माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. पण माझा निर्णय पक्का होता. माझ्या डोळ्यासमोर अवनीशचा चेहरा होता. मूल घरात आल्यावर त्याला इतर मुलांसारखं कुटुंब असावं, आजी-आजोबा आणि नातेवाईक असावेत असं मला वाटतं होतं. म्हणूनच माझा निर्णय सर्वांच्या खुशीखुशीने झालेला मला हवा होता.

घरच्यांसोबत बोलणं सुरू असताना आणखी एक मोठा पेच माझ्यासमोर उभा राहिला. कायद्याच्या दृष्टीने मी एवढ्या कमी वयात अवनीशचा पालक होण्यास लायक नव्हतो. मला दत्तक प्रक्रियेविषयी आधी काहीही माहिती नव्हती.

'बाळ दत्तक घ्यायचं असेल तर किमान वयोमर्यादा 30 हवी' भारतीय दत्तक कायद्यातली ही तरतूद माझ्या आणि अवनीशमधला सर्वांत मोठा अडथळा होती. मी कायद्याच्या चौकटीत अडकलो होतो आणि अवनीश तिथे अनाथाश्रमात.

नंतर लागलीच दत्तक कायदा वाचून काढला. मी अगदी कॉमन मॅन आहे. पण मला त्या कायद्याशी संबंधित सरकारी यंत्रणा, प्रशासकीय खात्यापर्यंत पोहोचावं लागलं. एरवी मतदान करण्यापुरताच सरकारशी संबंध येणारा मी सरकारी कचेऱ्यांमध्ये फेऱ्या मारू लागलो. पत्रं, ईमेल पाठवली. ज्या संबंधित विभागात भेटायलो जायचो तिथे सारखं हे विचारलं जाई- Are You All Right? काही प्रॉब्लेम आहे का? तुला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करण्याची गरज आहे.

'तू सेलिब्रिटी नाहीस'

एकदा तर मला सरळ सरळ धमकवण्यात आलं की- 'तू परत आमच्या विभागात आलास तर त्रास दिल्याबद्दल तुझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तुला मूल दत्तक घ्यायचंय ही गोष्ट नॉर्मल नाहीये.'

सेलिब्रिटींनी दत्तक घेतल्याची उदाहरणं मी सांगायचो तेव्हा उत्तर यायचं- 'तू सेलिब्रिटी नाहीस तर कॉमन मॅन आहेस. मर्यादेत राहा.'

वेळ वाया जातोय असं मला वाटत होतं. कारण अवनीश चालू शकत नव्हता. त्याला अनेक आजारांनी ग्रासलं होतं. हृदयाला दोन भोकं होती. थायरॉईड होता. आतड्याच्या विकारामुळे त्याला संडासला होत नसे. डोळ्यांचाही आजार होता. 'त्याचं आयुष्य अंथरुणातच जाईल,' असं मला आश्रमातील लोकांनी सांगितलं.

अवनीशला मी मुलगा मानलं होतं, त्याचं पालकत्व मिळवण्यासाठी मी आठवड्याला जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास करायचो. माझं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटणं सुरूच राहिलं. कोर्टाच्या पायऱ्याही चढलो.

या सगळ्या प्रयत्नांमध्ये मी दीड वर्ष खर्च केलं. या दीड वर्षात अवनीशही दोन वर्षांचा झाला होता. पण त्याची तब्येत काही सुधारत नव्हती. त्याला औषधोपचारांची गरज होती. तो एका अर्थाने दुर्लक्षित होता. अशा मुलांची स्पेशल गरज असते, ती ते पूर्ण करू शकत नव्हते.

दत्तक घेणं हा समाजात टॅबू का?

मला आणखी एक गोष्ट लक्षात आली. सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारतात आजच्या घडीला 2 कोटी मुलं अनाथ आहेत आणि दरवर्षी फक्त 5 हजार मुलं दत्तक प्रक्रियेसाठी उपलब्ध असतात. लोकांना या 2 कोटी अनाथ मुलांशी काहीही देणंघेणं नसतं पण 'एका अनाथ मुलाला कोणी दत्तक कशासाठी घेतंय' यात रस असतो.

प्रत्येक सेकंदाला एक नवं आयुष्य नवं नशीब घेऊन येतं. त्या नशिबाला आपण का दोष द्यायचा?

दत्तक घेणं हा समाजात टॅबू का आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणं आणि त्या अनाथ मुलांच्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे.

दत्तक कायद्यात बदल

काही वर्षांपासून दत्तक कायद्यात सुधारणा होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. माझ्या विनंतीचीही त्यात भर पडली होती. अखेर ऑगस्ट 2015मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नवा कायदा लागू केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

नव्या कायद्यानुसार दत्तक घेण्यासाठी किमान वयाची अट 25 वर आली होती. अवनीश आणि माझ्यामधलं अंतर मिटणार होतं.

1 जानेवारी 2016 या दिवशी मी अवनीशला घरी आणलं. दोन वर्षांचा अवनीश घरी आला तेव्हा चालू शकत नव्हता. एकमेकांना समजून घ्यायला आम्हाला सहा महिने लागले. प्रेम आणि काळजी यामुळेच त्याची प्रकृती हळूहळू सुधारत होती. वर्षभरातच तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याचे आजार उपचारामुळे आटोक्यात येत होते.

त्याच वर्षी माझ्या आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा निर्णय मी घेतला. जूनमध्ये मी विवाहबद्ध झालो. अवनीशमुळे माझ्यात कमालीचा बदल झालाय. म्हणूनच माझ्या आंतरजातीय लग्नात ज्यांना समाजाने नाकारलं आहे अशा बेघर 10 हजार लोकांचा मी दोन दिवस पाहुणचार केला. ते माझं कर्तव्य होतं.

पत्नीनंही मुलाला स्वीकारलं

माझ्या पत्नीने अर्पिताने माझ्या मुलाला तो आहे तसा स्वीकारलंय. तिचाही अवनीशवर खूप जीव आहे. आम्ही हे जग एक्सप्लोअर करतोय. अवनीशसाठी मला चांगलं माणूस व्हायचंय. त्याच्याकडूनही आम्ही खूप शिकतोय.

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मी सोडली. आयटीमध्ये माझ्या कामाचं स्वरूप 24 तास व्यापाचं असायचं. अवनीशला वेळ देणं गरजेचं असल्याने मी दुसरी नोकरी पत्करली, ज्याचा माझ्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही.

माझ्या शारीरिक क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित करणारे लोक माझी विचारपूस करू लागले. कौतुक करू लागले. त्यामुळे अवनीशला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत नर्सरीला प्रवेश मिळवताना मला कमी त्रास झाला. शाळेत त्याला सहज स्वीकारलं गेलं, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज इतर मुलांसोबत तो शाळेत बसतो, खेळतो. चक्क धावतोही.

आज अवनीशमुळे भारतात त्याच्यासारख्या मुलांना दत्तक घेण्यासाठी पालकांना प्रोत्साहित केलं जातंय. आता कोणी तशी मागणी केल्यास केवळ महिन्याभराच्या आत स्पेशल चाईल्ड दत्तक घेता येतं.

अवनीश सोशल वेलफेअर सोसायटी

दत्तक प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलीये. त्यामुळे बाळ ताब्यात यायला किमान सहा महिने लागतात. भारतीय पालकांना कमी वयाचं आणि शारीरिकदृष्ट्या 'नॉर्मल' असणारं बाळ हवं असतं. पण परदेशातील पालकांची मानसिकता संकुचित नसते. ते वयाने मोठ्या, स्पेशल किंवा अपंग मुलांनाही दत्तक घ्यायला उत्सुक असतात.

गेल्या वर्षी मी 'अवनीश सोशल वेलफेअर सोसायटी'ची स्थापना केली. सामान्य तसंच स्पेशल गरज असणाऱ्या अनाथ मुलांसाठी ही संस्था काम करतेय. आम्ही जगभरातल्या 5000 पालकांचं नेटवर्क तयार केलंय. डाऊन सिंड्रोमच्या पालकांसाठी तसंच दत्तक घेण्याविषयीचं मार्गदर्शन मी करतो.

अवनीश आयुष्यात येण्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळालीये. खरं सांगतो, मी काहीच असामान्य केलं नाही. अवनीशने त्याचा बाबा होण्याची संधी मला दिली. तो लवकरच पाच वर्षांचा होणार आहे.

माझा दिवस अवनिशला जाग आली की सुरू होतो. सकाळी ऑफिसला जाताना मी त्याला शाळेत सोडतो. संध्याकाळी घरी येतो तेव्हा हसऱ्या चेहऱ्याचा अवनीश दरवाज्याजवळ उभा असतो. आपलं मूल हसत-खेळत राहावं हीच तर आई-वडिलांची इच्छा असते. त्याने काय करावं, कशी प्रगती करावी या गोष्टीत मी वेळ घालवत नाही. रात्री मस्ती करून अवनीश कुशीत झोपतो तेव्हा सार्थक झाल्यासारखं वाटतं.

(बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी घेतलेल्या आदित्य तिवारी यांच्या मुलाखतीवर आधारित.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)