लिंग बदलाची शस्त्रक्रिया अशी केली जाते

    • Author, सिंधुवासिनी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

"माझा जन्म विरुद्ध शरीरात झाला होता. नको त्या शरीरात जन्मल्यामुळं माझी घुसमट व्हायची," हे सांगताना झरीन यांचा कंठ दाटून आला होता.

योग्य ते शरीर मिळवण्यासाठी झरीन यांना 22 वर्षं वाट पाहावी लागली. दोन वर्षांपूर्वी झरीन यांना विक्रांत म्हणून ओळखलं जायचं. पुरुषाच्या शरीरात जन्मलेल्या झरीन मात्र स्त्री होत्या.

आता त्यांनी सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी म्हणजे लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून स्त्रीचं शरीर मिळवलं आहे.

या शस्त्रक्रियेनंतर पुरुषाची स्त्री किंवा महिलेचा पुरुष होऊ शकतो का?

प्लास्टिक सर्जन डॉ. नरेंद्र कौशिक यांच्या मते लिंग बदलाची शस्त्रक्रिया केवळ ट्रान्सजेंडर लोकांनाच करावी लागते.

भारतात लिंग बदलाची शस्त्रक्रिया करणाऱ्या काही डॉक्टरांमध्ये डॉ. कौशिक यांचा समावेश आहे. ट्रान्सजेंडर हा प्रकार जन्मताच असतो, असं ते सांगतात.

ट्रान्सजेंडर म्हणजे कोण?

ट्रान्सजेंडर म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची लैंगिक अवयवं आणि शरीर वेगवेगळे असतात. अशा लिंगामुळं त्यांची पंचाईत होते.

हा काही मानसिक आजार नाही किंवा असं ते जाणूनबुजून ते असं करत नाहीत. त्यांचं तसं वाटणं एकदम सामान्यपणाचं लक्षण आहे.

त्यांची गुणसूत्रं पुरुष (XY) किंवा स्त्री (XX) अशी असतात पण लैंगिक अवयवं मात्र विरुद्ध लिंगाची असतात.

त्यामुळं त्यांचं वागणं बरोबर विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती सारखं असतं. वैदकीय भाषेत असा स्थितीला 'जेंडर डिस्फोरिया' असं म्हटलं जातं.

ट्रान्सजेंडर आहात की नाही हे कसं समजतं?

साधारण वयाच्या बारा-तेराव्या वर्षी आपल्या शरीराचा आणि लिंगातील फरक समजून येतो.

डॉ. कौशिक यांच्या मते, "असा मुलगा हा नकळत मुलींची कपडे घालतो. त्याचे हावभाव मुलींसारखे असतात."

त्याचप्रमाणं ट्रान्सजेंडर मुलीला पुरुषांची कपडे घालायला आवडतात. तिला मुलींबद्दल लैंगिक आकर्षण वाटू लागतं.

आई-वडिलांनी आपल्या मुलावर लहानपणी बाराकाईनं लक्ष ठेवल तर आपलं मुलं हे ट्रान्सजेंडर आहे की नाही हे लक्षात येत. जर आपलं मूल ट्रान्सजेंडर असेल तर घाबरून न जाता मुलाला आधार द्यावा, असं ते सांगतात.

परंतु होतं असं की घरातील लोक अशा मुलांना समजून न घेता त्यांना त्यांच्या सध्याच्या शरीरानुसार वागण्यास भाग पाडतात.

अशा स्थितीत मुलांना 'मी कोण आहे' हेच लक्षात येत नाही. नैराश्येतून अशा लोकांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत, असं ते सांगतात.

अशी होते लिंग बदलाची शस्त्रक्रिया?

रिअसाइन्मेंट सर्जरी म्हणजे लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्या व्यक्तीमध्ये जेंडर डिस्फोरिया म्हणजे स्वत:च्या लिंगाविषयी अस्वस्थतेची भावना असावी लागते.

यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची मदत घेतली.

या व्यक्तीबरोबर दीर्घकाळ चर्चा करून मानसोपचारतज्ज्ञ जेंडर डिस्फोरियाविषयी निर्णय घेतात. असं असेल तर उपचारांची सुरुवात 'हार्मोनल थेरपी'ने केली जाते. यामध्ये योग्य ते हार्मोन्सची औषधं आणि इंजेक्शन दिली जातात.

"योग्य हार्मोन्स दिले की त्याचा प्रभाव दिसून येतो. त्या व्यक्तीला चांगलं वाटतं. त्यांची वागणूक सुधारते, ते आनंदी राहतात," असं डॉ. कौशिक सांगतात.

त्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी केली जाते. त्या व्यक्तीचं वय 20 वर्ष किंवा जास्त असावं. 20 वर्षांखालील व्यक्तीसाठी त्यांच्या आईवडिलांची परवानगी लागते. शस्त्रक्रियेसाठी किमान एक मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची परवानगी असावी लागते.

पूर्ण प्रक्रियेसाठी जवळजवळ 5-6 तास लागतात. यात स्तन, जननेंद्रिये आणि चेहऱ्यामध्ये बदल केले जातात. डॉ. कौशिक यांच्या मते यासाठी टीम वर्क खूप गरजेचं आहे.

यामध्ये प्लास्टिक सर्जन, मानसशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि मेंदूविकारतज्ज्ञ यांना एकत्रपणे काम करावे लागते.

शस्त्रक्रियेनंतर एक वर्ष हार्मोनल थेरपी चालू ठेवावी लागते. काही वेळा आयुष्यभर ही थेरपी चालू ठेवावी लागते विशेषत: स्त्रीचा पुरुष झाल्यावर असं घडतं.

यानंतर, अशा व्यक्तींचं सामान्य आणि लैंगिक जीवन सुरळीत होतं. पण स्त्री झालेल्या व्यक्तीला आई होता येत नाही. ते सरोगेसी किंवा मुल दत्तक घेऊ शकतात.

या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 10 ते 20 लाख खर्च होतो. भारतात लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेला वैद्यकीय विमा मिळत नाही.

महागडी शस्त्रक्रिया करायची गरज का आहे?

या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. कौशिक म्हणतात, "विचार करा जर एखाद्या पुरुषाला स्त्री किंवा स्त्रीला पुरुष म्हणून आयुष्यभर जगायला सांगितलं तर किती अवघड होईल?"

अशा स्थितीत त्यांना मनासारखं प्रेम मिळत नाही, ते लग्न करु शकत नाहीत, मनमोकळंपणानं जगू शकत नाहीत, आवडते कपडे घालू शकत नाहीत.

एक प्रसंग सांगताना डॉ. कौशिक म्हणतात, माझ्याकडं एक व्यक्ती आली होती. तिला स्त्री होऊनच मरायची इच्छा होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला अजूनही आठवतो.

ट्रान्सजेंडरबद्दल पूर्वग्रह

जननेंद्रियांमध्ये बाधा असणं, शरीरात स्त्री आणि पुरुष दोघांची जननेंद्रिये असणं यांना ट्रांसजेडर म्हणता येत नाही. असा प्रकार शस्त्रक्रियेनंतर ठीक होतो.

तसंच ट्रान्सजेंडर आणि समलैंगिक लोक वेगवेगळे असतात.

याउलट ट्रान्सजेंडर लोकांना सतत आपल्या शरीरात बदल करावा वाटत असतो, असं ते सांगतात.

शस्त्रक्रियेनंतर पुढं काय?

वैदकीय प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्राच्या मदतीनं सरकारी कागदपत्रात उदाहरणार्थ रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान कार्डवर लिंग बदलून घेऊ शकते. पण, शैक्षणिक कागदपत्रामध्ये हा बदल करता येत नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)