You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक ट्रान्सजेंडर लग्नाची गोष्ट : तो ती झाला, ती तो झाली आणि मग ते एकमेकांचे झाले
- Author, विग्नेश ए.
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
लग्न म्हटलं की कपडे-लत्ते, बँडबाजा आणि धूमधडाका! आणि एक 'तो' आणि 'ती'. पण चेन्नईमध्ये झालेल्या या लग्नामध्ये फक्त या 'तो' आणि 'ती'पलीकडेही बरंच काही होतं.
कुठल्याही पूर्वतयारीशिवाय, कुठलेही रीतीरिवाज न करता, अगदी साध्या पद्धतीनं हे लग्न पार पडलं. हे लग्न होतं प्रीतिशा आणि प्रेम यांचं. आता तुम्ही विचाराल की एवढं काय विशेष या लग्नात?
ही जोडी खास आहे - कारण प्रीतिशा जन्मावेळी एक मुलगा होती तर प्रेम जन्मावेळी एक मुलगी होता.
आंतरराष्ट्रीय महिला दिनी चेन्नईमध्ये हे दोघं 'आत्मसन्मान विवाह'मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. धार्मिक रीती रिवाजांना फाटा देऊन होणारी अशी लग्न 'आत्मसन्मान विवाह' नावानं ओळखली जातात. पुरोगामी विचारांचे तामीळ नेते आणि विवेकवादी कास धरली चपेरियार यांनी ही परंपरा सुरू केली होती.
सहा वर्षांपूर्वी प्रीतिशा आणि प्रेम यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर विवाहात झालं.
काय आहे तिची कहाणी?
तामिळनाडूतील तिरुनेलवेलीच्या कल्याणीपुरम गावात 1988 मध्ये प्रीतिशाचा जन्म झाला. प्रीतिशा हे आई-वडिलांचं तिसरं मूल.
शाळेत असताना प्रीतिशाला नाटकांमध्ये काम करणं आवडायचं. आज ती एक प्रोफेशनल स्टेज आर्टिस्ट आणि अॅक्टिंग ट्रेनर आहे.
प्रीतिशा म्हणते, "ही 2004 किंवा 2005 मधली गोष्ट असेल, जेव्हा मी आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी पुद्दुचेरीला गेले होते. तिथं सुधा नावाच्या एका ट्रांसजेंडरशी माझी ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून मला कड्डलूरच्या पुंगोडीविषयी माहिती मिळाली."
ही पुंगोडीअम्मा काही ट्रांसजेंडर्ससोबत पुण्यात एका भाड्याच्या घरात राहत होती. नंतर पुंगोडी या प्रीतिशासाठी आईसारख्या झाल्या म्हणून ती त्यांना पूंगोडीअम्मा अशा नावानं बोलवू लागली.
तिला समजलं की त्या घरात राहणारे बहुतांश ट्रांसजेंडर हे एकतर भीक मागायचे किंवा देहविक्रय करायचे. पण प्रीतिशाला असं काहीच करायचं नव्हतं.
सुधाच्या सल्ल्याने तिने ट्रेनमध्ये कुलुपं, साखळ्या आणि मोबाईल फोनचं साहित्य विकायला सुरुवात केली. "अनेक ट्रांसजेंडर्सनी याचा तीव्र विरोध केला. ते भीक मागत असताना मी जर वस्तू विक्री केली तर लोक त्यांना प्रश्न विचारतील," प्रीतिशा सांगते.
लिंगबदलची सर्जरी केली
लोकल ट्रेनमध्ये वस्तू विकण्यास प्रतिबंध असतानाही ती आपला लहानसा व्यवसाय सुरू करण्यात यशस्वी ठरली. "यातून दररोज 300 ते 400 रुपये कमाईची सोय झाली."
17व्या वर्षी तिने स्वःकष्टाच्या कमाईतून लिंग परिवर्तनाची सर्जरी केली. मुलगा म्हणून जन्मलेली प्रीतिशा आता मुलगी झाली होती.
या सर्जरीनंतर घरच्यांनी तिचा स्वीकार केला आणि आता ती आपल्या कुटुंबांच्या संपर्कात असते, अशी माहिती प्रीतिशाने दिली. यानंतर ती दिल्लीच्या एका ट्रांसजेंडर आर्ट क्लबशी जोडली गेली. राजधानी आणि आसपासच्या परिसरात तिने अभिनय करायला सुरुवात केली.
तीन-चार वर्षांनंतर ती चेन्नईला परतली. प्रीतिशा म्हणते, "जेव्हा मी चेन्नईत अभिनय करायला सुरुवात केली, तेव्हा माझी भेट मणिकुट्टी आणि जेयारमण यांच्याशी झाली. त्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे माझा अभिनय आणखी बहरून आला. त्यांच्याच मदतीमुळे मी आज फुलटाईम परफॉर्मर असून इतरांना अभिनयाचे धडेही देते."
काय आहे प्रेमची कहाणी?
प्रेम कुमारनचा जन्म तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यात 1991 मध्ये एक मुलगी म्हणून झाला होता. तसं तर त्याचं लहानपण हे इतर सामान्य बालकांसारखंच होतं. पण किशोरावस्थेत येता-येता त्याला जाणवू लागलं की त्याच्या महिला शरीरात एक पुरुष दडलाय.
त्याने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. पण आईने याकडे दुर्लक्ष करत ही भावना फेटाळून लावली. त्याच्या आईवडिलांना वाटलं की, काळाच्या ओघात त्याच्या मनातला हा समज दूर होईल.
प्रेमने एका मुलीच्या रूपातच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या दिवसांमध्ये एका अपघातात प्रेम जखमी झाला आणि त्याला पुढचं शिक्षण सोडावं लागलं.
2012मध्ये प्रेम लिंग परिवर्तनची माहिती घेण्यासाठी चेन्नईला आला होता. त्यावेळेस तो प्रीतिशा आणि तिच्या मित्रांबरोबर राहिला होता. तोपर्यंत प्रेम हा एक मुलगाच होता.
ही त्या दोघांची पहिलीच भेट होती आणि त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्रही झाले. यादरम्यान तो प्रीतिशाकडे दोन-तीन दिवस थांबलाही होता. त्याचदरम्यान त्याने निर्णय घेतला की त्याला पुरुष व्हायचंय.
त्याने ही भावना प्रीतिशाकडे बोलून दाखविली. त्याला ज्या जेंडरमध्ये सहजतेने वावरता येईल ते जेंडर स्वीकारण्यासाठी तिने त्याला प्रोत्साहित केलं. त्यानंतर दोघं सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी अधूनमधून भेटत होते.
प्रेमने आपल्या ट्रांसजेंडर मित्रांकडे लिंग परिवर्तन सर्जरीविषयी विचारणा केली. 2016मध्ये त्याने एका हितचिंतकाच्या मदतीने चेन्नईमध्ये लिंग परिवर्तनाची सर्जरी केली. त्याच्या कुटुंबाला याबाबतीत काहीच कल्पना नव्हती, असं प्रेमने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
कामानिमित्त चेन्नईमध्ये असताना प्रेम आणि प्रीतिशा यांनी एक दुसऱ्याला प्रेमात आलेल्या अपयशाविषयीची गोष्ट सांगितली. मग एके दिवशी प्रीतिशाने प्रेमला अप्रत्यक्षपणे एक प्रश्न विचारला - "आपल्या दोघांनाही एकाच कारणामुळे प्रेमात अपयश आलंय. आपण एकदुसऱ्यांसोबत राहू नाही शकत का?"
तथापि, प्रेमला या प्रश्नामुळे आश्चर्य वाटलं. पण त्याने लगेचच या प्रस्तावाचा स्वीकार केला आणि त्यांची मैत्रीचं रूंपातर प्रेमात झालं.
प्रेमला शंका होती की जातीबाहेर लग्न केल्यामुळे त्यांचे नातेवाईक कदाचित कुटुंबावर बहिष्कार घालू शकतात. आणि विरोधाभास बघा, ज्या गावात जातीयवादाविरोधात लढणारे ई. व्ही. रामास्वामी यांचा जन्म झाला, त्याच गावातला प्रेम आहे.
जेव्हा दोघांनी विवाह केला...
हे दोघं चेन्नईच्या पेरियार आत्मसन्मान विवाह केंद्रात गेले, जिथे पेरियार यांनी सांगितलेल्या पद्धतीने लोकांची लग्न लावत असतं.
जागतिक महिला दिनी दोघांनी विवाह केला. जीवनभर एकमेकांसोबत राहण्याची वचनं घेतली. मंगळसूत्र घालण्यासारख्या कुठल्याही धार्मिक प्रथा त्यांनी टाळल्या.
प्रीतिशा म्हणते, "काही लोक आम्हाला त्रास देत असतात. आमचे शेजारी आम्हाला इथून निघून जाण्याविषयी बोलत असतात. पण आमचे घरमालक आमची समजूत काढतात आणि आम्हाला पाठिंबाही देतात. त्यामुळेच आम्ही या घरात राहत आहोत."
दोघांना आर्थिक समस्येलाही तोंड द्यावं लागत आहे. प्रेम एका शोरूममध्ये काम करत होता. पण तिथं त्याला तासन तास उभं रहावं लागायचं. काही दिवसांनी त्याने ते काम सोडून दिलं. आता काही महिन्यांपासून त्याच्या हाती काम नसून नवीन नोकरी शोधतोय.
प्रीतिशाने बीबीसीला सांगितलं, "मी प्रेमला त्याचं अर्धवट शिक्षण पूर्ण करायला लावेन. किमान कॉरस्पाँडंसने तरी शिक्षण पूर्ण व्हावं."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)