You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
TDP NDAमधून बाहेर; आता शिवसेना काय करणार?
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) तेलगू देसम पक्ष बाहेर पडला आहे. त्यामुळे कायम भाजपच्या विरोधात कायम भूमिका घेणाऱ्या शिवसेनेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार, शिवसेनाही NDA तून बाहेर पडणार का?
गेल्या आठवड्यातच तेलुगू देसम पार्टीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. आता अधिकृतपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून आपण बाहेर पडत असल्याचं पक्षप्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज स्पष्ट केलं.
TDPच्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकारला धक्का बसला असून याचे परिणाम महाराष्ट्रावर होतील का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसंच,
शुक्रवारी सकाळी त्यांनी ही घोषणा केल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. राजकीय पक्षातून यांबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी देखील ट्वीट करून चंद्राबाबू नायडूंच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
भाजपपासून कधीच वेगळे झालो आहोत - सेना
केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत असलेल्या आणि भाजपविरोधात कायम भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. कारण, शिवसेनेनं केंद्रातून पाठिंबा काढून घेतला तर त्याचे महाराष्ट्रातील भाजप सरकारवर परिणाम होतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहे. या शक्यतांची पडताळणी करण्यासाठी बीबीसी मराठीनं शिवसेनेचे मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला.
खासदार अरविंद सावंत सांगतात, "शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे शिवसेना 2019 आणि त्यापुढील सर्व निवडणुका स्वतंत्र लढवणार आहे. त्यामुळे भाजपसोबतचे संबंध आम्ही कधीच तोडले आहेत. मात्र, सध्या तेलगू देसम पक्ष केंद्रातून बाहेर पडल्यानंतर केंद्रात कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील."
'महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर होणार नाही'
तेलगू देसम पक्ष बाहेर पडल्याने शिवसेनेची केंद्रातली आणि राज्यातली भूमिका महत्त्वाची झाली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत भाजपचं नेमकं काय मत आहे, याबाबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, "शिवसेनेनं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रातलं भाजप सरकार अस्थिर निश्चितच होणार नाही."
केंद्रात अविश्वास ठरवा आला तर शिवसेनेपासून दगाफटका होऊ शकतो का, असं विचारलं असता भंडारी म्हणाले, "हा केंद्रातला प्रश्न असून याचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही." याव्यतिरिक्त भंडारी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
'शिवसेना तटस्थ राहण्याची शक्यता'
अविश्वास ठराव आलाच तर त्याला शिवसेना पाठिंबा देईल, असं वाटत नाही, असं लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"तेलगू देसम पक्ष बाहेर पडल्यानंतर सध्या तरी शिवसेना तटस्थच राहील. त्यांची राजकीय गणितं वेगळी आहेत. सभागृहात तेलगू देसमनं अविश्वास ठराव आणल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देईल असं वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही.
"मात्र, शिवसेना भाजपला विरोध कायम ठेवेल आणि 2019च्या निवडणुकीपूर्वी 3-4 महिने आधी शिवसेना राज्य आणि केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडेल अशी दाट शक्यता आहे", असं प्रधान यांनी नोंदवलं.
'शिवसेना निवडणुकीपूर्वी बाहेर पडेल'
सध्या उद्भवलेल्या या राजकीय परिस्थितीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल याबाबत महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांना विचारलं असताना त्यांनीही शिवसेना सध्या सरकारविरोधी कोणताही निर्णय घेणार नाही अशीच शक्यता व्यक्त केली.
खडस सांगतात, "भाजपनं ईडी, सीबीआय, आयबी या केंद्रीय संस्थांचा आपल्या विरोधकांविरोधात सातत्यानं वापर केला आहे. त्यामुळे शिवसेना केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून बाहेर पडेल अशी सध्या तरी शक्यता नाही. आंध्र प्रदेशच्या स्थानिक राजकारणात भाजप वायएसआर काँग्रेसला जवळ करत असल्याने चंद्राबाबूंनी हा निर्णय घेतला आहे. त्याला स्थानिक राजकारणाची किनार आहे."
"महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपविरोधात मतप्रदर्शन करणं शिवसेना आणि त्यांचे नेते सातत्याने सुरूच ठेवतील. सध्या, सरकारमधून बाहेर पडल्याने पेचप्रसंग निर्माण होईल आणि तो त्यांना आता नको आहे. मात्र, 2019च्या निवडणुकीआधी काही दिवस शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता निश्चितच आहे", असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीची भूमिका काय?
2014च्या विधानसभा निवडणुकांवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारला बाहेरून पठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका देखील यावेळी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि राज्यसभा खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्याशीही बीबीसी मराठीनं संवाद साधला. मात्र, त्रिपाठी यांनी या विषयावर विशेष न बोलणं पसंत केलं.
त्रिपाठी सांगतात, "तेलगू देसम पक्षानं पाठिंबा काढल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आमची चर्चा झाली नाही. त्यावर पक्षात चर्चा करण्यात येईल. तसंच, सभागृह सध्या वारंवार गोंधळामुळे बंद पडत आहे. जर, सभागृह सुरू राहिलं तर या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा करता येईल. मात्र, सभागृहाचं कामकाज शांततेत सुरू राहिले तरच हे शक्य आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)