2019च्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार, मुख्यमंत्री म्हणतात काही बोलणार नाही!

2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. तशा आशयाचा ठराव काही वेळापूर्वीच शिवसेनेच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला.

मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणीत संजय राऊत यांनी ठराव मांडला. त्याला सर्वांनी हात उंचावून अनुमोदन दिलं.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा आज वरळी येथील वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात सुरू आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

दरम्यान शिवसेनेच्या या ठरावावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी ते पंतप्रधानांबरोबर स्वित्झर्लंडमधल्या दावोसला आहेत. तिथून एएनआयशी बोलताना ते म्हणाले, "ते अशा अनेक गोष्टी बोलत असतात. मला आत्ता याविषयी काही बोलायचं नाही. आमचं सध्या सरकार आहे आणि भाजप- शिवसेना सरकार पाच वर्षं पूर्ण करेल आणि पुढची टर्मही आमचीही असेल याची मला खात्री आहे."

आदित्य झाले नेते

याच वेळी आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ही घराणेशाही नाही, तर घरण्याची परंपरा आहे, असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंनी केला.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेतेपदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. आदित्य सध्या युवा सेनेचे अध्यक्ष आहेत.

मोदींवर जोरदार टीका

उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करताना म्हटलं:

  • मोदींनी अहमदाबादमध्ये पतंग उडवण्यापेक्षा श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवावा.
  • नितीन गडकरी बोलल्यावर माझी तळपायाची आग मस्तकात गेली. नौदलाला बोलले. नौदलात जे शौर्य आहे, ते 56 इंच छातीत नाही.
  • गाय मारणं पाप आहे, तसंच थापा मारणं पाप आहे.
  • भाजपचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही.
  • यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणुका लढेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढेल.
  • वल्लभभाई पटेल असते तर त्यांनी काश्मीर, पाकिस्तानचे सर्व प्रश्न संपविले असते. फक्त बोलत बसणाऱ्यांपैकी ते नव्हते. निवडणुका आल्यानंतर पाकिस्तानची आठवण येते.
  • जगातले नेते आले की मोदी त्यांना अहमदाबादलाच का घेऊन जाता? मुंबईला का नाही?
  • चंद्रकांत पाटील कर्नाटकात कानडीत गायले. त्यांची लॉटरी अमित शाहांमुळे लागली. त्यांनी महाराष्ट्रात राहण्यापेक्षा तिकडेच जावं.
  • जाहिरातबाजीचं हे सरकार खाली खेचावंच लागेल. यापेक्षा काँग्रेसचा गोंधळ बरा होता, असं म्हणायची वेळ आली आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)