इराकमध्ये बेपत्ता 39 भारतीयांची 'IS'कडून हत्या : सुषमा स्वराज

इराकमधून 2014मध्ये बेपत्ता झालेल्या 40 भारतीयांपैकी 39 भारतीयांची कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने हत्या केल्याचा खुलासा भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत केला.

इराकच्या मोसूल शहरातून गायब झालेल्यांबद्दल देशात फार अनिश्चितता होती. मात्र या बेपत्ता झालेल्या 40 जणांपैकी 39 जण आता जिवंत नाहीत, असं सुषमा यांनी स्पष्ट केलं.

मृतांपैकी 31 जण पंजाबचे, चार जण हिमाचल प्रदेशचे आणि उर्वरित पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत.

"यापैकी चाळीसावे हरजीत मसीह मुसलमान बनून तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मृतांच्या नातेवाईकांच्या DNA नमुन्यांची पडताळणी केल्यानंतर त्या 39 जणांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे," असं स्वराज यांनी सांगितलं.

"चारही राज्यांच्या सरकारांकडून DNAचे नमुने मागवण्यात आले होते. सगळ्यांत आधी संदीप नावाच्या मुलाचा DNA नमुना तपासण्यात आला होता. DNAचाच पुरावा आम्ही ओळख पटवण्यासाठी अंतिम म्हणून ग्राह्य धरला," असंही स्वराज म्हणाल्या.

मृतांची प्रेतं एक मोठी कबर खोदून काढण्यात आली, कारण एकाच कबरीत सगळ्यांना पुरण्यात आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)