You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॉग : तुम्ही बिकिनी राउंडशिवाय सौंदर्य स्पर्धा पाहाल का?
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकतील सगळ्यांत सुंदर स्त्री निवडण्याची 'मिस अमेरिका' नावाची जी स्पर्धा आहे ना, त्यात आता बिकिनी राउंड होणार नाही.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सौंदर्यवतींना आता त्यांच्या शारीरिक सौंदर्यावर जोखलं जाणार नाही.
या बिकिनी राउंडमध्ये स्पर्धकांना टू-पीस बिकिनी (ब्रा आणि पँटी) घालावी लागते. ही बिकिनी घालून त्यांना रँपवॉक करावा लागतो, आणि या रँपवॉकच्या आधारावर त्यांचं मूल्यांकन केलं जातं.
मागच्या वर्षी 'मिस अमेरिका' स्पर्धेच्या संचालक मंडळाच्या पुरुष सदस्यांचे काही ई-मेल लीक झाले होते. त्यात स्पर्धेत भाग घेणाऱ्या मॉडल्सविषयी अतिशय घाणेरड्या गोष्टी लिहिल्या होत्या. या प्रकारानंतर या पुरुष सदस्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
आता या स्पर्धेच्या संचालक मंडळात फक्त महिला आहेत. या मंडळाच्या अध्यक्ष, 1989 सालच्या विजेत्या, ग्रेचन कार्लसन यांनी घोषणा केली की, आता स्पर्धकांना त्यांच्या चातुर्य, आवडीनिवडी आणि तळमळीवर जोखलं जाईल.
पण जर या स्पर्धांचा उद्देश कोण जास्त सुंदर, हेच ठरवणं असेल तर 'बिकिनी राउंडला' कुणीही आक्षेप का घ्यावा? आता तर भारतातही असे राउंड काही नवे नाहीत.
1964 साली जेव्हा 'फेमिना' मॅगझीनने पहिल्यांदा 'मिस इंडिया' स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हाही स्विमसूट राउंड होताच की. फरक एवढाच, की तेव्हाचे स्विमसूट टू-पीसऐवजी वनपीस असायचे आणि त्यामुळे कमी अंगप्रदर्शन व्हायचं.
1994 साली जेव्हा सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांनी ही स्पर्धा जिंकली होती, तेव्हाही या स्वीमसूटचं स्वरूप बदललं नव्हतं.
अर्थात तेव्हा असा स्वीमसूट घालणंही फारच क्रांतिकारी होतं. तेव्हा सौंदर्य स्पर्धा लोकप्रिय व्हायचं हेही एक कारण होतं.
आज मॉडेल्सना अशा छोट्या कपड्यांत पाहणं नॉर्मल वाटू शकतं, पण 1980-90च्या दशकात जेव्हा टीव्हीने आपल्या घरच्या हॉलमध्ये प्रवेश केला नव्हता, तेव्हा महिलांना अशा कमी कपड्यात पाहणं फारच विशेष होतं.
फक्त मुलंच नाही, मुलींसाठीही ही एक अशी खिडकी होती जी बऱ्याचदा बंदच असायची.
कालाऔघात मार्केटची ताकद वाढत गेली आणि स्त्रियांच्या सौंदर्याला त्यांच्या शरीराच्या आकाराशी जोडलं गेलं. सौंदर्यस्पर्धांना या बदलांचं प्रतीक बनल्या नसत्या तर नवलच!
शेकडो लोकांसमोर स्टेजवर स्वीमसूट घालून रँपवॉक करणं, ज्याकडे टीव्ही पाहणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या नजरा खिळल्या असतात, मग सौंदर्यांचे मापदंड ठरवू लागल्या.
स्वीमसूटचे तुकडे होऊन टू-पीस बिकिनी झाली. स्त्रीदेहाचं असं प्रदर्शन तिला फक्त एक उपभोग्य वस्तू म्हणून दाखवत अशा वादाला तोंडही फुटलं.
सौंदर्यस्पर्धाच कशाला, 2000 पासून अशा प्रकारच्या बिकिनीचं मुख्य मीडियामध्ये मुक्तहस्ते प्रदर्शन होऊ लागलं सिनेमात आणि संगीत व्हीडिओमध्ये आता एक विशिष्ट फिगरच्या स्त्रियांना कमी कपड्यांत दाखवणं सर्वमान्य झालं.
'मिस इंडिया' स्पर्धाही सामान्य झाली. अशा धर्तीवर 'मिसेस इंडिया', 'मिस दिवा', 'मिस सुपरमॉडल' अशा आणखीही स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. एका तऱ्हेची फिगर लोकप्रिय ठरली आणि स्त्रियांचं शरीर तसंच असावं, हा विशिष्ट मापदंडही फिक्स झाला.
या नव्या मापदंडाने नव्या वादाला जन्म दिला आणि बिकिनी राउंडवर बंदी घालावी, अशी मागणी होऊ लागली.
2014 मध्ये 'मिस वर्ल्ड' स्पर्धेतून या राउंड बाद केला गेला आणि त्यानंतर दोन वर्षांनी 'मिस इंडिया' स्पर्धेतूनही हा राऊंड हद्दपार झाला.
यावर्षी #MeToo चळवळीनंतर अमेरिकेत यावरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर 'मिस अमेरिका' या स्पर्धेत बदल करण्याचं ठरलं.
पण याने खरंच काही फरक पडतो का? स्वीमसूट राउंडची ती खिडकी आता पार मोठी होऊन एक अख्खा दरवाजा झाला आहे. आणि एकच नाही तर असे अनेक दरवाजे आज आहेत.
आता कदाचित सौंदर्य स्पर्धांमध्ये स्त्रियांचं मूल्यांकन त्यांच्या शरीरावरून होणार नाही, पण खऱ्या आयुष्यात त्यांच्या शारीरिक सौंदर्यांवरून त्यांचं मूल्य ठरवण्याचे प्रकार कमी नाहीयेत.
या प्रश्नाची सुई गोलगोल फिरून आपल्यावरच येऊन थांबते. बिकिनी राउंड शिवाय आपण सौंदर्य स्पर्धा पाहू का? स्त्रियांच्या शरीरावरून त्यांचं मूल्य ठरवणं थांबवू शकू का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)